कर्णधाराचा आदर्श घ्यावा

By admin | Published: August 13, 2014 01:30 AM2014-08-13T01:30:10+5:302014-08-13T01:30:10+5:30

कटू आठवणी बरोबर घेत भारतीय संघाने मंगळवारी जेव्हा मँचेस्टर शहर सोडले, तेव्हा तेथील वातावरण कुंद आणि थंड होते

Take the ideal of the captain | कर्णधाराचा आदर्श घ्यावा

कर्णधाराचा आदर्श घ्यावा

Next

लंडन : कटू आठवणी बरोबर घेत भारतीय संघाने मंगळवारी जेव्हा मँचेस्टर शहर सोडले, तेव्हा तेथील वातावरण कुंद आणि थंड होते. पण लंडनला मात्र उल्हासदायक वातावरणाने त्यांचे स्वागत केले. हॉटेलमध्ये आराम करता -करता धोनी ब्रिगेडला ४८ तासांहून जास्त वेळ आपल्या कामगिरीचे विवेचन करण्यास मिळाला आहे.
लॉर्ड्सवर अनपेक्षितपणे मिळालेल्या विजयाने भारताला १-0 अशी स्वप्नवत आघाडी मिळाली. पण साउथॅम्पटन आणि मँचेस्टरला भारताचे हे स्वप्न मोडले आणि त्याची जागा १-२ अशी दु:स्वप्नाने घेतली. आता या ओझ्याखालून मालिका बरोबरीत आणण्याची जबाबदारी भारतीय संघाची आहे. पण, पुन्हा मूळ प्रश्न समोर उभा राहतो, भारतीय फलंदाज खेळपट्टीवर उभे राहून चांगली कामगिरी करणार का?
आमचे तळाचे फलंदाज चांगली कामगिरी करीत आहेत, पण आमच्या आघाडीच्या फलंदाजांना त्यांच्या लौकिकाप्रमाणे कामगिरी करता येत नाही. एखाद्या खेळाडूचा बॅड पॅच समजू शकतो; परंतु सर्वच जण अपयशी ठरत असतील तर आम्हाला फलंदाजीत सुधारणा करण्याची गरज आहे, असे दिसते, असे मत कर्णधार धोनीने चौथ्या कसोटीनंतर म्हंटले होते.
तिसऱ्या कसोटीनंतर भारतीय गोलंदाजांना मायकेल होल्डींग यांच्याबरोबर जेवण करण्याचा योग आला. यावेळी त्याने सांगितलेले ‘अनुभवाचे बोल’ भारताचे नशीब बदलू शकले नाहीत. विराट कोहलीसुध्दा इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनबरोबर डिनरला गेला होता. त्यानेही आपल्या फलंदाजीतील उणिवांबद्दल वॉनकडून टिप्स घेतल्या. पण त्याचा त्याला काहीच उपयोग झाला नाही. भक्कम सलामी ही मोठ्या धावसंख्येचा पाया असतो, पण दुर्दैवाने भारताच्या गेल्या आठ कसोटी सामन्यात एकदाही अर्धशतकी सलामी मिळालेली नाही. मुरली विजय थोड्या फार आत्मविश्वासाने फलंदाजी करीत आहे, पण शिखर धवनने तीन कसोटीतील ६ डावात २0.३३ च्या सरासरीने धावा केल्या आहेत. चौथ्या कसोटीत त्याच्याऐवजी गौतम गंभीरला खेळविण्यात आले. परंतु दोन्ही डावात तो फेल गेला, शिवाय तो इंग्लंडच्या जलदगती गोलंदाजांसमोर चाचपडताना दिसत होता. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारातील परिपूर्ण फलंदाज म्हणून ज्याला गणले जात होते, तो उपकर्णधार विराट कोहलीने तर साफ निराशा केली. या मालिकेत तो जेम्स अ‍ॅडरसनचा बकरा ठरला आहे. अँडरसनने विराटला ३0 बॉल टाकले आणि यात तो ४ वेळा बाद झाला. ८ डावात १३.५0 च्या सरासरीमुळे त्याच्या तंत्रावर मोठे प्रश्नचिन्ह लावले आहे. कोहलीप्रमाणेच पुजाराकडूनही मोठा भ्रमनिरास झाला आहे. शेवटच्या २ कसोटीत त्याने २४, २, 0 आणि ७ अशा धावा केल्या आहेत. त्याचे तंत्र भक्कम असले तरी त्याच्याकडे एकाग्रतेचा अभाव असल्यामुळे चांगल्या सुरवातीनंतरही मोठी खेळी करण्यास त्याला अपयश आले आहे. या सर्वात उजवा ठरतो तो कर्णधार धोनी. त्याच्याकडे भलेही तंत्र नसेल, त्याच्याकडे कसोटीच्या दर्जाचे फटके नसतील, पण त्याच्याकडे आहे फायटींग स्पिरीट. आघाडी फळी ढासळत असताना एकाकी योध्द्याप्रमाणे तो लढत होता. ३ अर्धशतकांसह मालिकेत २६७ धावा करणाऱ्या धोनीचे ३३.३७ ची सरासरी इतरांपेक्षा सरस ठरते.

Web Title: Take the ideal of the captain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.