टोकियोत पदकासाठी शक्ती पणाला लावेन!
By admin | Published: November 10, 2016 04:39 AM2016-11-10T04:39:25+5:302016-11-10T04:39:25+5:30
तब्बल ३२ वर्षानंतर आॅलिम्पिकच्या अॅथ्लेटिक्स प्रकारात पी. टी. उषानंतर भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मला लाभली ही माझ्यासाठी अभिमानास्पद बाब आहे
नागपूर : तब्बल ३२ वर्षानंतर आॅलिम्पिकच्या अॅथ्लेटिक्स प्रकारात पी. टी. उषानंतर भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मला लाभली ही माझ्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. रिओतील कामगिरी कारकीर्दीतील उत्तुंग कामगिरी म्हणावी लागेल. ३ हजार मीटर स्टीपलचेस प्रकारात अंतिम फेरीत स्थान मिळेल अशी अपेक्षा नव्हती पण मेहनतीच्या बळावर हे शक्य झाले. भारतासाठी मेडल न जिंकल्याची खंत आहे. टोकियोतील २०२० आॅलिम्पिकमध्ये पदकाचे स्वप्न नक्की पूर्ण होईल, असा आशावाद आॅलिम्पिक धावपटू ललिता बाबर हिने आज नागपुरात व्यक्त केला.
येथे सुरू असलेल्या ३२ व्या लोहमार्ग पोलीस क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात अतिथी म्हणून उपस्थित राहिल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना ललिता म्हणाली,‘ दुखापत ही खेळाडूंच्या आयुष्यातील अविभाज्य भाग आहे. दुखापत होणार नाही तोवर चांगला खेळाडू म्हणून ओळख निर्माण करता येत नाही. यातून अनेक चुकांची जाणीव होते. मी सातत्याने स्पर्धा खेळत असल्याने विश्रांतीची गरज वाटत होती. सध्या विश्रांती घेत आहे. आशियाई स्पर्धा आणि नंतर २०१७ च्या लंडन येथील विश्व स्पर्धेसाठी लवकरच सरावाला सुरुवात करणार आहे.’ डोपिंगबाबत ललिताचे मत जाणून घेतले असता ती म्हणाली,‘ याबद्दल खेळाडूंनी सावध असावे. दुखापत झाल्यास प्रशिक्षकांचा सल्ला घ्यावा. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच गोळ्या घ्यायला हव्या. यशस्वी वाटेवर वाटचाल करीत असताना अनेकांच्या पोटात ईर्षा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मल्ल नरसिंग यादव हा याचे उत्तम उदाहरण आहे.’ खेळाडूंना मिळणाऱ्या सोयीसुविधांवर भाष्य करताना ती म्हणाली, ‘सध्याच्या सुविधा समाधानकारक आहेत. मला स्वत:ला चांगल्या सुविधा मिळाल्यामुळे अॅथलेटिक्समधील माझा प्रवास चांगला सुरू आहे.’
महाराष्ट्र शासनातर्फे कविता राऊतसह आठ खेळाडूंना थेट नोकऱ्या दिल्याबद्दलच्या प्रश्नावर ललिता म्हणाली, आठही खेळाडूंना २०१४ च्या कामगिरीच्या आधारावर नोकरी मिळाली आहे. शासनाकडे नोकरीसाठी मी जानेवारी महिन्यात अर्ज केल्यामुळे आठ खेळाडूंच्या या यादीत माझा समावेश नव्हता. शासन माझ्या अर्जावर निश्चित विचार करेल.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला थेट नोकरीत सामावून घेण्याचे आश्वासन दिले आहे.
ज्येष्ठ धावपटू निवृत्तीकडे वाटचाल करीत असताना नव्या दमाच्या धावपटूंना कसब दाखविण्याची मोठी संधी असेल. पण युवा खेळाडूंनी कठोर मेहनत घ्यावी.
मी महाराष्ट्राकडून खेळत असताना रेल्वे पोलिसांचे प्रतिनिधित्व केले. माझ्या जुन्या सहकाऱ्यांचा उत्साह वाढविण्यासाठीच येथे आले आहे. रिओत माझा इव्हेंट १५ आॅगस्ट रोजी होता.
माझ्याकडून भारतीयांना पदकाची अपेक्षा होती. ऐनवेळी दुखापत झाल्याने अंतिम पाच जणांत स्थान मिळाले नाही याची खंत असल्याचे सातारा येथे जन्मलेल्या ललिताने सांगितले.