खेळपट्टीबाबत चर्चा निरर्थक : कोहली
By admin | Published: November 25, 2015 12:00 AM2015-11-25T00:00:27+5:302015-11-25T00:00:27+5:30
खेळपट्टीवरून होणारी चर्चा निरर्थक आणि डोक्याबाहेरची असल्याने मी द. आफ्रिकेविरुद्ध मालिकेत अशा चर्चेपासून स्वत:ला हेतुपुरस्सर दूर ठेवल्याचे मत कर्णधार विराट कोहली याने व्यक्त केले.
नागपूर : खेळपट्टीवरून होणारी चर्चा निरर्थक आणि डोक्याबाहेरची असल्याने मी द. आफ्रिकेविरुद्ध मालिकेत अशा चर्चेपासून स्वत:ला हेतुपुरस्सर दूर ठेवल्याचे मत कर्णधार विराट कोहली याने व्यक्त केले.
पत्रकारांशी बोलताना विराट म्हणाला,‘भारतात विकेटवरून इतके स्तोम का माजविले जाते हे कळायला मार्ग नाही. क्रिकेटला अनुकूल नसलेल्या खेळपट्टीवर उभय संघ खेळायला तयार नसतील तर ती बातमी होऊ शकते. पण माझा संघ खेळपट्टीच्या स्थितीवर चर्चा करीत नाही. ज्यांना करायची असेल त्यांनी खुशाल चर्चा करावी. खेळपट्टीच्या आधारे संघाची निवडही करीत नाही. पाच दिवसांच्या खेळात कोणत्या दिवशी पिचचे स्वरूप कसे असेल हे लक्षात घेत नाही.’
जामठा स्टेडियमची खेळपट्टी फिरकीला अनुकूल राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने सामना सुरू होण्याआधी अंतिम अकरा खेळाडू निवडण्याचे संकेत कोहलीने दिले. कसोटीत परिस्थितीनुसार दोन अष्टपैलू खेळाडू असावेत. त्यातील एक अष्टपैलू फिरकीपटू तसेच दुसरा वेगवान गोलंदाज असलेला अष्टपैलू खेळाडू हवा. यामुळे संयोजन फिट बसते. पण मी मात्र संघातील संयोजनाचा खुलासा उद्याच करेन, असे कोहलीने हसून सांगितले.
पाच वर्षांआधी द. आफ्रिकेचा कर्णधार हशिम अमला याने याच मैदानावर २५३ धावा ठोकल्या होत्या. याविषयी विचारताच कोहली म्हणाला,‘ आम्ही कुठल्या एका खेळाडूला टार्गेट करणार नाही. एखाद्या मालिकेत विरोधी संघ कर्णधाराला टार्गेट करते कारण तो डावपेच आखतो. आम्ही देखील असे केले आहे. पण यावेळी करणार नाही. महत्त्वाचे खेळाडू मालिकेत धावा काढू शकले नाहीत, हे या मालिकेत स्पष्ट झाले.’ (क्रीडा प्रतिनिधी)
वर्षभरात आॅफ स्पिनर रवींद्रन अश्विन यशस्वी ठरण्याचे कारण काय असे विचारताच कोहली म्हणाला, ‘तो बेसिक्सवर अधिक लक्ष देतो, खूप प्रयोग करीत नाही. लंकेत त्याने यशस्वी कामगिरी केली शिवाय सध्या सर्वाधिक प्रभावी मारा करीत आहे. तो ‘कॅरम बॉल’ अभावानेच टाकतो. अश्विन नैसर्गिक गोलंदाजीला चिकटून राहतो. चेंडू टाकतेवेळी ताकद लावत असल्याने ज्या खेळपट्टीवर इतर गोलंदाज संघर्ष करतात त्या खेळपट्टीवर देखील अश्विनचे चेंडू उसळी घेऊ शकतात.’