तमिळनाडू उपांत्य फेरीत
By admin | Published: December 24, 2015 11:52 PM2015-12-24T23:52:07+5:302015-12-24T23:52:07+5:30
राजगोपाल सतीश याने केलेल्या झुंजार नाबाद ३४ धावांच्या जोरावर तमिळनाडूने विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेची उपांत्य फेरी गाठताना उत्तर प्रदेश विरुद्ध अवघ्या एका धावाने नाट्यमयरीत्या विजय मिळविला.
बंगळुरू : राजगोपाल सतीश याने केलेल्या झुंजार नाबाद ३४ धावांच्या जोरावर तमिळनाडूने विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेची उपांत्य फेरी गाठताना उत्तर प्रदेश विरुद्ध अवघ्या एका धावाने नाट्यमयरीत्या विजय मिळविला.
एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या या लढतीत नाणेफेक जिंकून उत्तर प्रदेशने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र लक्ष्मीपती बालाजी आणि रविचंद्रन आश्विन या अनुभवी गोलंदाजांनी टीच्चून केलेल्या माऱ्याच्या जोरावर तमिळनाडूने उत्तर प्रदेशचा डाव ४८.२ षटकांत १६८ धावांत गुंडाळला. तमिळनाडू सहज बाजी मारेल, असे चित्र होते. परंतु, उत्तर प्रदेशने देखील कडवा प्रतिकार करताना अखेरपर्यंत तमिळनाडूला विजयासाठी झुंजविले.
लक्ष्याचा पाठलाग करताना तमिळनाडूला पहिल्याच षटकात धक्का बसला. दिनेश कार्तिक भोपळाही न फोडता परतल्यानंतर लगेच सलामीवीर अभिनव मुकुंदही परतला. यामुळे बॅकफूटवर आलेल्या तमिळनाडूवर उत्तर प्रदेशने जबरदस्त दडपण टाकले आणि त्यांचा अर्धा संघ ८१ धावांवर परतला. या वेळी बाबा इंद्रजीत (४८) आणि विजय शंकर (२२) यांनी सहाव्या विकेटसाठी ३७ धावांची भागीदारी करून संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र शंकरला पीयूष चावलाने बाद केल्यानंतर इंद्रजित अर्धशतकापासून केवळ २ धावा दूर असताना धावबाद झाला. या वेळी उत्तर प्रदेशचा विजय निश्चित मानला जात होता. मात्र सतीशने अखेरपर्यंत टिकून राहताना तमिळनाडूला नाट्यमय विजय मिळवून दिला. भुवनेश्वर कुमार आणि पीयूष चावला यांनी प्रत्येकी ३ बळी घेताना उत्तर प्रदेशला विजयाच्या समीप आणले होते. मात्र सतीशने त्यांच्या हातातील सामना हिसकावला. तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना अडखळत्या सुरुवातीनंतर रिंकू सिंगने केलेल्या शानदार ६० धावांच्या जोरावर उत्तर प्रदेशने १६८ धावांची मजल मारली. विशेष म्हणजे ७ बाद १४५ अशी अवस्था झाल्यावर उत्तर प्रदेशने १६० चा टप्पा पार केला.
संक्षिप्त धावफलक :
उत्तर प्रदेश : ४८.२ षटकांत सर्व बाद १६८ धावा (रिंकू सिंग ६०, पीयूष चावला २९; लक्ष्मीपती बालाजी ३/३२, रविचंद्रन आश्विन २/२७).
तमिळनाडू : ४१.३ षटकांत ९ बाद १६९ धावा (बाबा इंद्रजित ४८, आर. सतीश नाबाद ३४, मुरली विजय ३३; भुवनेश्वर कुमार ३/२५, पीयूष चावला ३/४५)