तानिशा : गोव्याची ‘रायझिंग सिंधू’; आता लक्ष विश्व स्पर्धेच्या निवडीकडे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2019 07:25 PM2019-08-26T19:25:51+5:302019-08-26T19:26:49+5:30
तानिशाने रशियातील विश्व ज्युनियर स्पर्धेसाठीच्या निवडीवर दावा मजबूत केला आहे. तिच्या यशाचा आलेख पाहता तिला गोव्याची ‘रायझिंग सिंधू’ म्हणून संबोधले जात आहे.
सचिन कोरडे, पणजी : भारतीय बॅडमिंटन स्टार पी. व्ही. सिंधू हिने जागतिक बॅडमिंटन स्पर्धा जिंकून इतिहास रचला. तर दुसरीकडे, गोव्याच्या तानिशा क्रास्तो हिने भारतीय बॅडमिंटनच्या ज्युनिअर गटात सुवर्णपदकांची लयलूट करीत रविवारचा दिवस गाजवला. हा दिवस बॅडमिंटनसाठी खास ठरला. तानिशाचे सलग सुवर्णपदक भारतीय बॅडमिंटन निवडकर्त्यांचे लक्ष वेधणारे ठरले. त्यामुळे दोन्ही अखिल भारतीय मानांकन स्पर्धा जिंकून तानिशाने रशियातील विश्व ज्युनियर स्पर्धेसाठीच्या निवडीवर दावा मजबूत केला आहे. तिच्या यशाचा आलेख पाहता तिला गोव्याची ‘रायझिंग सिंधू’ म्हणून संबोधले जात आहे.
रशिया येथे होणाºया विश्व ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धेसाठी पंचकुला आणि बंगळुरू येथील अखिल भारतीय मानांकन स्पर्धा म्हणजे निवड चाचणीच होती. त्यामुळे या दोन्ही स्पर्धांतील कामगिरीवर निवडकर्त्यांचे खास लक्ष होते. पंचकुला येथील स्पर्धेत तानिशाने दुहेरी मुकूट पटकाविला होता. आता बंगळुरू येथील स्पर्धाही गाजवत तिने जागतिक स्पर्धेसाठी भारतीय संघातील आपले स्थान जवळपास निश्चित केले आहे.
बंगळुरू येथील स्पर्धेत तानिशाने मुलींच्या दुहेरी आणि मिश्र दुहेरी गटात सुवर्णमय कामगिरी केली. तानिशा आणि आदिती भट्ट या जोडीने अव्वल मानांकित त्रिशा ज्योली आणि वर्षिणी व्ही. एस. या जोडीचा २१-१५, २१-२३, २१-१७ ने पराभव केला. सामन्यात शेवटच्या ५७ व्या मिनिटाला त्यांनी बाजी मारली. मिश्र दुहेरी गटात, तानिशाने ईशान भटनागर याच्यासोबत खेळताना शानदार प्रदर्शन केले. त्यांनी नवनीथ बोक्का आणि साहिथी बंदी या जोडीचा अवघ्या २८ मिनिटांत फडशा पाडला. त्यांनी हा सामना २१-१४, २१-१५ ने
जिंकला.