टार्गेट नेट रनरेटचे
By admin | Published: March 23, 2016 03:14 AM2016-03-23T03:14:11+5:302016-03-23T03:14:11+5:30
पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवल्यानंतर आत्मविश्वास उंचावलेल्या भारताला बुधवारी आयसीसी टी-२० विश्वकप स्पर्धेत बांगलादेशाच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल
बंगळुरू : पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवल्यानंतर आत्मविश्वास उंचावलेल्या भारताला बुधवारी आयसीसी टी-२० विश्वकप स्पर्धेत बांगलादेशाच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. या सामन्यात भारत सरस दिसत असला तरी मोठा विजय मिळवून नेट रनरेटमध्ये पुढे जाण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.
न्यूझीलंडविरुद्ध सलामीच्या लढतीत पराभव स्वीकारावा लागल्यानंतर भारताने त्यानंतर ईडन गार्डनवर पाकिस्तानविरुद्ध सरशी साधून पुनरागमन केले. बांगलादेशाविरुद्ध विजय मिळविण्यात यश आले, तर भारत उपांत्य फेरीच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकणार आहे. न्यूझीलंडविरुद्ध मोठ्या फरकाने पराभव स्वीकारावा लागल्यामुळे ‘नेट रनरेट’वर परिणाम झाला आहे. यात सुधारणा करण्यासाठी भारतीय संघापुढे बांगलादेशाविरुद्ध मोठ्या फरकाने विजय मिळविण्याचे लक्ष्य आहे.
दुसऱ्या बाजूचा विचार करता, बांगलादेश संघ स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येण्याच्या उंबरठ्यावर आहे. भारताविरुद्ध त्यांना विजय मिळविण्यात यश आले, तरी अंतिम चार संघांमध्ये स्थान मिळवण्यासाठी ‘नेट रनरेट’च्या गणितावर अवलंबून राहावे लागेल.
भारताची फलंदाजीची मजबूत आहे. विराट कोहलीला रोखणे बागंलादेशाच्या गोलंदाजांसाठी आव्हान ठरेल. शिखर धवन, सुरेश रैना व रोहित शर्मा यांचा फॉर्म भारतीय संघासाठी चिंतेचा विषय आहे. कोहलीच्या कामगिरीवर सर्वांची नजर असेल. सहज धावा वसूल करण्याच्या बाबतीत हा शैलीदार फलंदाज अन्य फलंदाजांच्या तुलनेत सर्वांत आघाडीवर आहे. रोहित, धवन व रैना हे सातत्याने अपयशी ठरत असल्यामुळे संघव्यवस्थापन अजिंक्य रहाणेला संधी देण्याबाबत विचार करू शकते. रहाणेला या स्पर्धेत अद्याप संधी मिळालेली नाही.
युवराजने पाकविरुद्धच्या लढतीत २४ धावांचे उपयुक्त योगदान देताना कोहलीसोबत ६१ धावांची भागीदारी केली होती. तो कामगिरीत सातत्य राखण्यास उत्सुक आहे. गोलंदाजी आक्रमण दर्जेदार भासत आहे; पण कर्णधार महेंद्रसिंग धोनी सिनिअर आॅफ स्पिनर्स हरभजन सिंगबाबत काय निर्णय घेतो, याबाबत उत्सुकता आहे. या स्पर्धेत खेळपट्ट्या फिरकीला अनुकूल असल्याचे चित्र आहे.
> प्रतिस्पर्धी संघ : भारत : महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), आर. आश्विन, जसप्रीत बुमराह, शिखर धवन, हरभजनसिंग, रवींद्र जडेजा, विराट कोहली, मोहंमद शमी, पवन नेगी, आशिष नेहरा, हार्दिक पंड्या, अजिंक्य रहाणे, सुरेश रैना, रोहित शर्मा व युवराजसिंग.
बांगलादेश : मशरफी मुर्तझा (कर्णधार), शाकीबुल हसन, अबू हैदर, अल अमीन हुसेन, महमदुल्ला, मोहंमद मिथुन, मुस्तफिजुर रहमान, नासीर हुसेन, नुरुल हसन, शब्बीर रहमान, सौम्या सरकार व तमीम इक्बाल.