लक्ष्य मालिका विजयाचे
By admin | Published: June 13, 2016 06:09 AM2016-06-13T06:09:51+5:302016-06-13T06:09:51+5:30
युवा भारतीय संघ यजमान झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेत क्लीन स्वीप करण्याच्या दिशेने वाटचाल करण्यास उत्सुक आहे.
हरारे : सलामी लढतीत शानदार विजय मिळवणारा धोनी ब्रिगेडच्या नेतृत्वाखालील युवा भारतीय संघ यजमान झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेत क्लीन स्वीप करण्याच्या दिशेने वाटचाल करण्यास उत्सुक आहे. उभय संघांदरम्यान आज, सोमवारी दुसरी लढत होणार आहे.
भारताने सलामी लढतीत झिम्बाब्वेविरुद्ध प्रत्येक विभागात सरस कामगिरी केली. कामगिरीत सातत्य राखण्याचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा निर्धार आहे. युवा जसप्रीत बुमराहने चार बळी घेत झिम्बाब्वेचा डाव १६८ धावांत गुंडाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावली, तर सलामीवीर लोकेश राहुलने पदार्पणाच्या लढतीत नाबाद शतकी खेळी केली. आॅगस्ट महिन्यात कसोटी मालिकेसाठी विंडीजला जाणाऱ्या संघात समावेश असलेला राहुल या मालिकेत मोठी खेळी करीत आपले मनोधैर्य उंचावण्यास उत्सुक आहे. अंबाती रायडूने राहुलला योग्य साथ देताना १२० चेंडूंत ५ चौकारांच्या मदतीने ६२ धावा फटकावल्या. (वृत्तसंस्था)
>अम्बाती रायडूने गाठला हजार धावांचा पल्ला
युवा भारतीय फलंदाज अंबाती रायडूने झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेतील सलामी लढतीत आंतरराष्ट्रीय वन-डे क्रिकेटमध्ये वैयक्तिक एक हजार धावांचा पल्ला गाठला. झिम्बाब्वेविरुद्ध नाबाद ६२ धावांची खेळी करताना रायडूने हा पराक्रम केला. डावातील ४८ वी धाव घेतल्यानंतर रायडूने कारकिर्दीत एक हजार धावा पूर्ण केल्या. त्याने ३२ सामन्यांत २९ डावांत ही कामगिरी केली. त्याच्या खात्यावर आता १०१४ धावांची नोंद आहे. सर्वांत वेगवान एक हजार धावांचा पल्ला गाठण्याच्या शर्यतीत रायडू भारतीय फलंदाजांमध्ये संयुक्तपणे चौथ्या स्थानी आहे. रायडूने लोकेश राहुलच्या (नाबाद १००) साथीने झिम्बाब्वेविरुद्ध पहिल्या वन-डे लढतीत भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.
>मला माझ्या क्षमतेवर विश्वास होता : लोकेश
झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेतील पहिली लढत आणि आपल्या पदार्पणाच्या वन-डे लढतीत शतकी खेळी करणारा भारतीय फलंदाज लोकेश राहुल कामगिरीमुळे खूश आहे. मला माझ्या क्षमतेवर विश्वास होता, अशी प्रतिक्रिया शतकवीर राहुलने व्यक्त केली. लढतीनंतर बोलताना राहुल म्हणाला, ‘ही निश्चितच चांगली कामगिरी होती. शतकी खेळीमुळे माझा आत्मविश्वास उंचावण्यास मदत झाली. मी त्यासाठी कसून मेहनत घेतली आहे. झिम्बाब्बेविरुद्धच्या लढतीत चांगली कामगिरी करण्याची संधी होती आणि त्या संधीचा लाभ घेण्यात यशस्वी ठरल्यामुळे आनंद झाला. झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेत कामगिरीत सातत्य राखण्याच्या निर्धाराने सहभागी झालो आहे.