अव्वल दहामध्ये कायम राहण्याचे लक्ष्य : बोपन्ना
By Admin | Published: February 20, 2016 02:35 AM2016-02-20T02:35:25+5:302016-02-20T02:35:25+5:30
रिओ आॅलिम्पिकमध्ये सानिया मिर्झाच्या जोडीदाराविषयीच्या चर्चेदरम्यानच भारतीय टेनिस स्टार रोहन बोपन्ना याने जूनमध्ये होणाऱ्या फ्रेंच ओपनपर्यंत रँकिंगमध्ये टॉप-१0 मध्ये राहणे
नवी दिल्ली : रिओ आॅलिम्पिकमध्ये सानिया मिर्झाच्या जोडीदाराविषयीच्या चर्चेदरम्यानच भारतीय टेनिस स्टार रोहन बोपन्ना याने जूनमध्ये होणाऱ्या फ्रेंच ओपनपर्यंत रँकिंगमध्ये टॉप-१0 मध्ये राहणे हे आपले लक्ष्य असल्याचे स्पष्ट केले आहे.
लिएंडर पेस याने याआधीच सानियाचा आपण आदर्श जोडीदार असू, असे स्पष्ट केले होते. याविषयी बोपन्ना म्हणाला, ‘‘मी रियोआधी सर्वच स्पर्धा खेळणार आहे. त्यात दुबई, इंडियन वेल्स, माँटे कार्लो, रोम आणि फ्रेंच ओपन या स्पर्धांचा समावेश आहे. माझे लक्ष्य हे फ्रेंच ओपनपर्यंत अव्वल दहामध्ये राहणे हे आहे. त्यानंतर दुहेरी व मिश्र दुहेरीत कोण कोणाचा जोडीदार आहे हे पाहता येईल. रिओला अजून खूप वेळ बाकी आहे.’’
रिओ आॅलिम्पिकचे क्वॉलिफिकेशन ६ जूनला येणाऱ्या रँकिंगवर अवलंबून असेल. तसेच फ्रेंच ओपन १६ मे ते ५ जूनदरम्यान होणार आहे. जोडीदाराविषयी अंदाज लावणे अशक्य असल्याचे बोपन्नाने म्हटले.
दुहेरी रँकिंगमध्ये ५२ व्या स्थानावर घसरलेल्या पेसने बोपन्ना याने आॅलिम्पिकआधी आपल्यासोबत खेळण्यास नकार दिल्याचा दावा केला होता. यावर प्रतिक्रिया विचारल्यानंतर बोपन्ना आपला सध्याचा जोडीदार फ्लोरिन मर्जियासोबत खेळून खूश आहोत असे सांगितले.
बोपन्ना म्हणाला, ‘‘पुढील महिन्यात होणाऱ्या इंडियन वेल्स स्पर्धेसाठी संयुक्त रँकिंग ५0 असायला हवी. त्यामुळे मी लिएंडरसोबत खेळू शकत नाही. प्रत्येकाला फ्रेंच ओपनआधी आपले गुण वाचवावे लागतील आणि मी तेच करीत आहे. आॅलिम्पिकआधी अनेक समीकरणे बनतील. रिओेत जाण्यासाठी पुरुष एकेरी आणि मिश्र दुहेरीत पात्र ठरावे लागणार आहे याचे आपल्याला भान ठेवावे लागेल. मार्ग अजून खूप दूर आहे.’’
विशेष म्हणजे लंडन आॅलिम्पिकप्रमाणेच भारत दोन पुरुष दुहेरीचा संघ उतरवणार का याविषयी निश्चित झालेले नाही. त्यातच भारताला मिश्र दुहेरीत पदकाची आशा आहे आणि भारताकडे मिश्र दुहेरीसाठी जगातील नंबर वन खेळाडू सानिया मिर्झा संघात असणार आहे.(वृत्तसंस्था)