आॅलिम्पिकसाठी ग्रामस्तरावर ‘लक्ष्य’

By admin | Published: October 16, 2016 04:20 AM2016-10-16T04:20:48+5:302016-10-16T04:20:48+5:30

महाराष्ट्राला राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवून देणारे बरेचसे खेळाडू ग्रामीण भागातील आहेत. हे ध्यानात घेऊन २०२० नंतरच्या आॅलिम्पिकसाठी

'Target' at the village level for the Olympics | आॅलिम्पिकसाठी ग्रामस्तरावर ‘लक्ष्य’

आॅलिम्पिकसाठी ग्रामस्तरावर ‘लक्ष्य’

Next

महाराष्ट्राला राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवून देणारे बरेचसे खेळाडू ग्रामीण भागातील आहेत.
हे ध्यानात घेऊन २०२० नंतरच्या आॅलिम्पिकसाठी आम्ही ग्रामपंचायत स्तरावर लक्ष केंद्रित करणार
आहोत, अशी माहिती राज्याच्या क्रीडा व युवक सेवा संचलनालयाचे सहसंचालक नरेंद्र सोपल आणि उपसंचालक माणिक ठोसरे यांनी ‘लोकमत संवाद’मध्ये दिली. ग्रामीण खेळाडू आॅलिम्पिकपर्यंत
पोहोचावा, याकरिता ट्रॅक तयार करण्यात येईल. यासाठी क्रीडामंत्र्यांच्या आदेशानुसार राज्यपातळीवर स्पोर्ट्स मॅपिंग करण्यात आले असून, त्याअंतर्गत संपूर्ण राज्याचा डेटा तयार करण्यात आला आहे, असेही सोपल यांनी सांगितले.

खेळाडूंनी देशाला आॅलिम्पिक; तसेच महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदके जिंकून द्यावीत, यासाठी राज्य सरकार ‘मिशन २०२०’; तसेच इतर अनेक चांगल्या योजना राबवित असल्याचे सोपल यांनी सांगितले. शासनाने केवळ चांगल्या योजना आखल्या म्हणजे आॅलिम्पिक व इतर महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये देशाला
पदके जिंकून देणारे खेळाडू तयार होतात, असे अजिबातही नाही. शासनाने चांगल्या योजना प्रभावीपणे राबविणे आवश्यक असण्याबरोबरच पालकांसह सर्वसामान्य नागरिकांचाही सकारात्मक सहभाग असल्याशिवाय महाराष्ट्रातूनच काय, जगातील कुठल्याही भागातून आॅलिम्पिक पदकविजेते खेळाडू घडणे शक्य नाही, याकडे ठोसरे यांनी लक्ष वेधले.
सोपल व ठोसरे यांनी राज्याच्या क्रीडाक्षेत्राची आतापर्यंतची वाटचाल आणि भविष्यातील योजनांची माहिती दिली. १९७२मध्ये शिक्षण विभागांतर्गत क्रीडाविभागाची स्थापना झाली. १९८२मध्ये हा विभाग स्वतंत्रपणे कार्यरत झाला. सध्या राज्यात ८ विभागांना प्रत्येकी एक उपसंचालक आहे. आता तालुका-जिल्हा आणि विभागीय पातळ्यांवर संकुले होण्याआधी शाळा-महाविद्यालयांना मैदानासाठी विनंत्या कराव्या लागायच्या. ही स्थिती आता मागे पडली असून, संबंधित भागातील लोकप्रिय खेळांचे मैदान तिथे व्हावे, यासाठी शासन प्रयत्नशील आहे, असे सोपल यांनी नमूद केले.
क्रीडासंस्कृती जोपासणाऱ्या देशांमध्ये मुलांची केवळ आवड बघून नव्हे, तर स्पोर्ट्स सायन्सच्या आधारे त्यांची शारीरिक, मानसिक क्षमता कोणत्या खेळासाठी आदर्श आहे, याची चाचणी घेऊन त्यांचा खेळ निश्चित केला जातो. आपल्याकडे किती जणांना हे माहीत आहे, असा सवाल उपस्थित करून ठोसरे म्हणाले, ‘या स्पर्धेच्या युगात यश मिळविण्यासाठी स्पोर्ट्स सायन्सची मदत अनिवार्य झाली आहे. खेळाडूने मैदानावर घाम गाळणे आवश्यक आहेच. त्याबरोबरच लॅबमध्ये खेळाडूच्या शारीरिक आणि मानसिक स्थितीचा अभ्यास करून, त्याची कामगिरी उंचावण्याचा प्रयत्न केला जातो.’

शिवछत्रपती क्रीडासंकुल खेळ अन् खेळाडूंसाठीच
म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडासंकुल हे सरावासाठी अत्याधुनिक सुविधा; तसेच जवळच निवास आणि भोजनाची दर्जेदार सुविधा असलेले देशातील एकमेव क्रीडासंकुल आहे. अलीकडील काळात
क्रीडासंकुलात होणाऱ्या स्पर्धांच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे. माझ्याकडे क्रीडासंकुलाची जबाबदारी आल्यापासून त्याचा खेळ आणि खेळाडूंसाठीच पुरेपूर वापर करण्याकडे भर दिला असल्याचे ठोसरे यांनी सांगितले.
ते म्हणाले, ‘‘१५३ एकर क्षेत्रफळाच्या संकुलात आता नियमानुसार आणखी मोठे बांधकाम करणे शक्य नाही. संकुलाची स्वच्छता, लॅण्डस्केपिंग, सुरक्षा या गोष्टींकडे जातीने लक्ष दिले जाते. खेळाडूंची निवास, भोजन व्यवस्थेचा नियमितपणे आढावा घेतला जातो. खेळाडूंचा सराव, निवास आणि भोजन व्यवस्था इतकीच जबाबदारी असल्याचे आम्ही मानत नाही. स्वत: खेळाडू असल्याने खेळाडूंच्या समस्यांची मला जाण आहे. खेळाडूंच्या प्रगतीबाबत त्याचे मार्गदर्शक, क्रीडा प्रबोधिनीचे प्राचार्य व पालक यांच्यासोबत नियमित संवाद साधला जातो. खेळाडूला उद्भवणाऱ्या समस्येचे लवकर निराकरण करण्याचा संकुल व्यवस्थापनाचा प्रयत्न असतो.’’
१९९४मध्ये येथे राष्ट्रीय स्पर्धा झाली. २००८च्या राष्ट्रकुल युवा स्पर्धेनंतर शिवछत्रपती क्रीडासंकुलाने कात टाकली. संकुलाच्या मेन्टेनन्ससाठी महिन्याला ६० ते ६५ लाख रुपये खर्च येतो. यासाठी शासनाकडून अपुरा निधी मिळतो. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धा, कॉर्पोरेट स्पर्धा, विविध संस्था, संघटना, कंपन्यांच्या बैठका यातून इतर निधी जमवला जातो.

असे आहे ‘मिशन २०२०’
२०२०च्या टोकियो आॅलिम्पिकमध्ये राज्याच्या खेळाडूंनी देशाला किमान २० पदके जिंकून द्यावीत, या उद्देशाने ‘मिशन २०२०’ आखण्यात आले आहे.
या अंतर्गत कृती आराखडा तयार करून निवड झालेल्या खेळाडूंना देश-विदेशात अद्ययावत प्रशिक्षण सुविधा, मार्गदर्शन, आहारशास्त्र, क्रीडा मानसशास्त्र, स्पोर्ट्स मेडीसिन आदी सुविधा पुरविण्यात येतील. यासाठी खेळाडूंची प्राथमिक यादी निवडण्यात आली आहे.

क्रीडासंकुलांची जबाबदारी स्थानिक पातळीवर
राज्यातील काही तालुका क्रीडासंकुलांची दुरवस्था झाली असून, त्यासाठी क्रीडा संचलनालयाला जबाबदार धरणे योग्य नाही. तेथे असभ्य वर्तन करणारे हे स्थानिक असतात. तालुका संकुले उभारल्यानंतर, त्याकडे लक्ष ठेवण्याची जबाबदारी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची आहे.

लोकसहभागाशिवाय क्रीडासंस्कृती बहरणे अशक्य
क्रीडाक्षेत्रामध्ये जगात अव्वल असलेल्या देशांचे नागरिक क्रीडासंस्कृतीची दैनंदिन आयुष्यात जोपासना करतात. क्रीडासंस्कृतीचा अंगीकार केल्यामुळे त्यांचा जगात दबदबा आहे. या देशांकडे बघितल्यास आपल्याकडे क्रीडासंस्कृतीचे रोपटे आता कुठे मूळ धरत आहे, असेच म्हणावे लागेल.

महाराष्ट्रातून आॅलिम्पिक पदकविजेते तयार होण्यासाठी केवळ शासनाच्या योजना पुरेशा नाहीत. शासन तसेच प्रशासनाला लोकसहभागाची साथ लाभल्याशिवाय आपल्याकडे क्रीडासंस्कृती बहरणे अशक्य असल्याचे ठाम प्रतिपादन ठोसरे यांनी केले.

Web Title: 'Target' at the village level for the Olympics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.