हैदराबाद-मुंबईमध्ये ‘टशन’
By Admin | Published: May 17, 2015 01:24 AM2015-05-17T01:24:33+5:302015-05-17T01:24:33+5:30
आयपीएल-८च्या अखेरच्या साखळी सामन्यात परस्परांविरुद्ध खेळतील तेव्हा उभय संघांना प्ले आॅफसाठी ‘करा किंवा मरा’ या इराद्यानिशी उतरावे लागेल.
हैदराबाद : सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स संघ रविवारी आयपीएल-८च्या अखेरच्या साखळी सामन्यात परस्परांविरुद्ध खेळतील तेव्हा उभय संघांना प्ले आॅफसाठी ‘करा किंवा मरा’ या इराद्यानिशी उतरावे लागेल. दोन्ही संघांना विजय मिळविणे गरजेचे आहे.
उभय संघांचे १३ सामन्यांत प्रत्येकी १४ गुण असल्याने, प्ले आॅफसाठी अखेरचा सामना जिंकणे क्रमप्राप्त झाले आहे. सनरायझर्स सलग विजयांसह लयमध्ये होता; पण काल पावसाच्या व्यत्ययात आरसीबीने त्यांना ६ गड्यांनी पराभूत केले. ११ षटकांत सनरायझर्सने ३ बाद १३५ धावा केल्यानंतर पुन्हा पावसाने हजेरी लावली. त्यानंतर आरसीबीला ६ षटकांत ८१ धावांचे लक्ष्य देण्यात आले होते. गेल ३५ आणि कोहलीच्या नाबाद ४४ धावांच्या बळावर हा सामना आरसीबीने खेचून नेला. डेव्हिड वॉॅर्नर, शिखर धवन, मोझेस हेन्रिक्स, इयोन मोर्गन, लोकेश राहुल हे सर्व जण फलंदाजीत सनरायझर्ससाठी चांगले योगदान देत आहेत. डेल स्टेन, ट्रेंट बोल्ट, भुवनेश्वर कुमार, कर्ण शर्मा आणि अष्टपैलू मोझेस हेन्रिक्स हे गोलंदाजीत प्रभावी ठरले. डेथ ओव्हरमध्ये भुवनेश्वरने अप्रतिम मारा केला आहे.
मुंबईने मागच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा ५ धावांनी पराभव केला होता. ४ बाद ७९ अशा नाजूक स्थितीतून मुंबईने ३ बाद १७१ धावा उभारल्या. त्यात हार्दिक पांड्याने ३१ चेंडूंत नाबाद ६१ धावा ठोकल्या होत्या. केकेआरला वानखेडेवर मुंबईने ७ बाद १६६ असे रोखले. मुंबई संघात लेंडल सिमन्स, रोहित शर्मा आणि किरोन पोलार्डसारखे आक्रमक फलंदाज आणि लसिथ मलिंगा व हरभजन सिंगसारखे अनुभवी गोलंदाज आहेत. हे खेळाडू सामना फिरवू शकतात. मुंबई संघ अनेक सामन्यांत संघर्ष करताना दिसला. प्ले आॅफमध्ये धडक द्यायची झाल्यास या संघाला सांघिक खेळी करावीच लागेल, अशी स्थिती आहे. (वृत्तसंस्था)
मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कर्णधार), लसिथ मलिंगा, किएरॉन पोलार्ड, अंबाती रायडू, हरभजन सिंग, आदित्य तरे, जसप्रीत बुमराह, मर्चंट दी लांगे, पवन सुयाल, श्रेयश गोपाल, लैंडल सिमेन्स, प्रग्यान ओझा, मिचेल मैक्क्लेनघन, अभिमन्यू मिथून, एडेन ब्लीझार्ड, अक्षय वखारे, नितीश राणा, सिध्देश लाड, हार्दिक पांड्या, जगदीश सुचिथ, उन्मुक्त चंद, विनयकुमार, पार्थिव पटेल, बेन हिल्फेनहॉस आणि कॉलीन मुन्रो
डेव्हीड वॉर्नर (कर्णधार), शिखर धवन, डेल स्टेन, भुवनेश्वर कुमार, इशांत शर्मा, मोइसेस हेन्रीक्स, लोकेश राहुल, परवेझ रसूल, नमन ओझा, आशिष रेड्डी, रिकी भूल, चामा मिलिंद, कर्ण शर्मा, केन विलियम्स, केव्हीन पिटरसन, इओन मॉर्गन, रवी बोपारा, टे्रंट बोल्ट, प्रवीण कुमार, हनुमा विहारी, प्रशांत पद्मनाभन, सिद्धार्थ कौल आणि बिपुल शर्मा.