Badminton World Ranking, Tasnim Mir: १६ वर्षाच्या तसनीमने रचला इतिहास! केला सायना, सिंधूलाही न जमलेला भीमपराक्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2022 01:40 PM2022-01-14T13:40:28+5:302022-01-14T13:41:23+5:30
मूळची गुजरातची असलेल्या तसनीमने बॅटमिंटन क्रमवारीत मोठ्या विक्रमाला गवसणी घातली.
Badminton World Ranking: गुजरातची १६ वर्षीय बॅडमिंटनपटू तसनीम मीर हिने एक मोठा पराक्रम केला. ऑलिम्पिक पदकविजेता बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि पीव्ही सिधू यांनाही जी कामगिरी करता आली नाही, तो कारनामा १६ वर्षांच्या तसनीमने केला. तसनीम ही १९ वर्षाखालील गटातील बॅडमिंटनपटू आहे. तिने अंडर-१९ महिला एकेरीच्या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावण्याचा विक्रम केला आहे.
ज्यूनियर गटात खेळताना सायना नेहवाल, पीव्ही सिंधू यांच्यासमवेत अनेक स्टार महिला बॅडमिंटनपटूंना हा पराक्रम करता आला नव्हता. तसनीम मात्र असा पराक्रम करणारी पहिली महिला भारतीय बॅडमिंटनपटू ठरली. ज्युनियर गटाची जागतिक क्रमवारी २०११ साली सुरू झाली. त्यावेळी सायना या गटात पात्र नव्हती तर सिंधूचा सर्वोत्तम क्रमांक दुसरा होता. तसनीमने मात्र अव्वल स्थान पटकवण्याचा पराक्रम केला.
"ऑलिम्पिक स्पर्धेत पदक मिळवायचंय"
ज्युनियर बॅडमिंटन क्रमवारीत अव्वल स्थानी विराजमान झाल्यानंतर तसनीम मीर म्हणाली की मी खुप आनंदी आहे. पीव्ही सिंधू आणि सायना नेहवाल यांच्याप्रमाणेच देशाचं नाव उंचावण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. वरिष्ठ गटात भारताकडून ऑलिम्पिक पदक जिंकण्यासाठी मी प्रयत्न करत आहे. मी माझा सराव करत आहे.