टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धा वेस्ली सो ने जिंकली; अधिबन तिसऱ्या स्थानी
By Admin | Published: January 31, 2017 09:04 AM2017-01-31T09:04:58+5:302017-01-31T09:05:28+5:30
अमेरिकेचा ग्रँडमास्टर वेस्ली सो याने विक अॅन झी (हॉलंड) येथे सुरू असलेल्या ७९वी टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेतील 'अ' गटातील जेतेपद पटकावले.
>केदार लेले
हॉलंड, दि. ३१ - अमेरिकेचा ग्रँडमास्टर वेस्ली सो याने विक अॅन झी (हॉलंड) येथे सुरू असलेल्या ७९वी टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेतील 'अ' गटातील जेतेपद पटकावले. जेतेपद पटकावण्यासाठी तेराव्या आणि शेवटच्या फेरीत त्याला केवळ एका बरोबरीची गरज होती.
जर का कार्लसन, अरोनियन आणि वेई यांनी जर त्यांचे डाव जिंकले असते तर मात्र वेस्ली सो, कार्लसन, अरोनियन आणि वेई यांना टाय ब्रेक खेळावा लागला असता! पण, जर वेस्ली सो तेराव्या आणि शेवटच्या सामन्यात पराभूत झाला असता तर मात्र त्याच्या जेतेपदाच्या आशा संपुष्टात आल्या असत्या.
शनिवारी झालेल्या बाराव्या फेरीनंतर वेस्ली सो त्याच्या सर्वात जवळच्या प्रतिर्स्पध्यांपेक्षा (कार्लसन, अरोनियन आणि वेई) अर्ध्या गुणाने आघाडीवर होता. तेराव्या आणि शेवटच्या फेरीत मध्ये सर्व बुद्धिबळ प्रेमींच्या नजरा नेपोम्नियाची वि. वेस्ली सो, मॅग्नस कार्लसन वि. सर्जी कॅराकिन, आंद्रेकिन वि. अरोनियन आणि वेई वि. वॉएटशेक यांच्या सामन्यांकडे लागल्या होत्या. सर्वप्रथम वेस्ली सो याने नेपोम्नियाची चा पराभव केला आणि वेस्ली सो याचे 'अ' गटातील विजेतेपद सुनिश्चित झाले!
मॅग्नस कार्लसन द्वितिय; अधिबन भास्करन ह्यास संयुक्त तिसरे स्थान
मॅग्नस कार्लसन आणि सर्जी कॅराकिन यांच्यातील लढत बरोबरीत सुटली आणि मॅग्नस कार्लसनचे दुसरे स्थान निश्चित झाले!
प्रथमच ‘अ’ गटात खेळणाऱ्या भारताच्या अधिबन याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला! रोमहर्षक झालेल्या सामन्यात अधिबन याने काळ्या मोहऱ्यांनी खेळताना रिचर्ड रॅपोर्ट वर विजय मिळवला. चार विजय, सात बरोबरी आणि दोन पराभव अशा उत्कृष्ट कामगिरी साधत अधिबन भास्करन याने 7.5 गुणांनिशी संयुक्त तिसरे स्थान प्राप्त केले.
पेंटेला हरिकृष्ण पराभूत!
तेराव्या आणि शेवटच्या फेरीत ल्युक फ़ॅन वेली ने भारताच्या पेंटेला हरिकृष्ण वर खळबळजनक विजय मिळवला. पेंटेला हरिकृष्णचा हा या स्पर्धेतील दुसरा पराभव ठरला. या पराभावामुळे नवव्या स्थानावर फेकला गेला. पण जर का त्याने ल्युक फ़ॅन वेली वर विजय मिळवला असता तर त्याने संयुक्त चौथे स्थान मिळवले असते! शेवटच्या फेरीत पेंटेला हरिकृष्ण याला पराभव स्वीकारावा लागला हे काहीस दुखःदच!
सुपर ग्रँडमास्टर स्पर्धांमध्ये आपले स्थान भक्कम करण्यासाठी पेंटेला हरिकृष्ण याला चांगलीच जय्यत तयारी करावी लागणार आहे!