टेलरचे विक्रमी शतक
By admin | Published: February 23, 2017 01:12 AM2017-02-23T01:12:45+5:302017-02-23T05:50:40+5:30
रॉस टेलरच्या विक्रमी १७ व्या शतकी खेळीच्या बळावर न्यूझीलंडने दुसऱ्या वन डेत द. आफ्रिकेचा सहा
ख्राईस्टचर्च : रॉस टेलरच्या विक्रमी १७ व्या शतकी खेळीच्या बळावर न्यूझीलंडने दुसऱ्या वन डेत द. आफ्रिकेचा सहा धावांनी पराभव करीत दोन सामन्यांची मालिका १-१ अशी बरोबरीत सोडविली.
टेलरच्या ११० चेंडूंतील आठ चौकारांसह काढलेल्या नाबाद १०२ धावांमुळे न्यूझीलंडने ४ बाद २८९ धावा उभारल्या. द. आफ्रिका संघ ड्वेन प्रिटोरियसच्या झटपट अर्धशतकामुळे (२६ चेंडंूत ५० धावा) विजयी लक्ष्यापर्यंत पोहोचला. पण, ९ बाद २८३ धावा करूनदेखील त्यांना पराभवाचे तोंड पाहावे लागले. द. आफ्रिकेचा सलग १२ विजयांचा क्रम खंडित झाला. द. आफ्रिकेकडून क्विंटन डिकॉकने ५७ आणि एबी डिव्हिलियर्सने ४५ धावा केल्या. या संघाने २१४ धावांत आठ फलंदाज गमविल्यानंतर विजयाची आशा सोडून दिली होती. (वृत्तसंस्था)
पण, यजमान संघाच्या खराब क्षेत्ररक्षणाचा आणि कमकुवत माऱ्याचा त्यांना लाभ झाला. ट्रेन्ट बोल्टने ४९ व्या षटकांत अखेरच्या चेंडूवर प्रिटोरियसची दांडी गूल केली. आफ्रिकेला विजयासाठी सहा चेंडूत १५ धावा हव्या होत्या. तथापि, त्यांना सहा धावा कमी पडल्या. बोल्टने ६३ धावांत तीन आणि मिशेल सेंटनरने ४६ धावांत दोन गडी बाद केले.
टेलरने डावातील अखेरच्या चेंडूवर चौकार ठोकून १७ वे शतक गाठले. यादरम्यान त्याने सहकारी नॅथन अॅस्टलचा देशाकडून सर्वाधिक १६ शतकांचा विक्रम मोडला.
या खेळीदरम्यान ६००० धावांचा पल्ला गाठणारा टेलर न्यूझीलंडचा चौथा फलंदाज बनला. कर्णधार केन विलियम्सनसोबत त्याने तिसऱ्या गड्यासाठी १०४, अष्टपैलू जिमी नीशाम(नाबाद ७१)सोबत पाचव्या गड्यासाठी १२३ धावांची भागीदारी केली.