टीम 'अजिंक्य'ने धो डाला, वन डेत झिम्बाब्वेला व्हाईटवॉश
By admin | Published: July 14, 2015 04:12 PM2015-07-14T16:12:44+5:302015-07-14T20:17:40+5:30
महाराष्ट्राच्या केदार जाधवचे दमदार शतक व मनिष पांडेने दिलेली त्याला दिलेली मोलाची साथीमुळे झिम्बाब्वेविरुद्धच्या तिस-या एकदिवसीय सामन्यात भारताने ५० षटकांत २७६ धावा केल्या आहेत.
ऑनलाइन लोकमत
हरारे, दि. १४ - केदार जाधवचे दमदार शतक व गोलंदाजांचा अचूक मा-याच्या आधारे तिस-या एकदिवसीय सामन्यात भारताने झिम्बाब्वेवर ८३ धावांनी विजय मिळवत मालिकेत निर्भेळ यश मिळवले.
तिस-या एकदिवसीय सामन्यात झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने दिलेल्या २७७ धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या झिम्बाब्वेची सुरुवात चांगली नव्हती. सलामीवीर हॅमिल्टन मसकद्जा हा अवघ्या ७ धावांवर बाद झाला. यानंतर चामू चिभाभाने ८२ धावांची झुंजार खेळी करत झिम्बाब्वेच्या विजयाच्या आशा पल्लवित केल्या. मात्र रेगिस चकाब्वाचा (२७ धावा) अपवाद वगळता एकाही फलंदाजाने त्याला साथ दिली नाही. ३ बाद ९७ अशा स्थितीत असलेला झिम्बाब्वेचा संपूर्ण संघ अवघ्या १९३ धावांमध्येच तंबूत परतला. रिचर्ड मुतुंबार्मीने २२, एल्टन चिंगुबूरा १० तर सिकंदर रझाने १३ धावांची खेळी केली.झिम्बाब्वेचा तळाचा एकही फलंदाज दोन आकडी धावाही करु शकला नाही. भारतातर्फे स्टुअर्ट बिन्नीने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. तर हरभजन सिंग, मोहित शर्मा ,अक्षर पटेल यांन प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. मुरली विजयने एक विकेट घेतली.
दरम्यान प्रथम फलंदाजी करणा-या भारताची सुरुवातही चांगली नव्हती. सलामीवीर कर्णधार अजिंक्य रहाणे व मुरली विजय ही जोडी अवघ्या ३३ धावांवरच माघारी परतली. यानंतर रॉबिन उथप्पा (३१ धावा) व मनिष तिवारी (१० धावां) हेदेखील झटपट परतल्याने भारताची अवस्था ४ बाद ९० अशी झाली. मात्र त्यानंतर महाराष्ट्राच्या केदार जाधवने मनिष पांडेच्या साथीने भारताच्या डावाला आकार दिला. आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पदार्पण करणा-या मनिष पांडेने पहिल्याच सामन्यात ७१ धावांची खेळी केली. तर केदार जाधवने नाबाद १०५ धावा केल्या. झिम्बाब्वेतर्फे नेव्हिले मेजिवाने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. तर चिमू चिभाबा, प्रॉस्पर उत्सेया, हॅमिल्टन मस्कद्जा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतल्या.
महेंद्रसिंग धोनी, विराट कोहलीसारख्या ज्येष्ठ खेळाडूंची अनुपस्थितीत भारतीय संघ झिम्बाब्वे दौ-यावर गेला होता व या संघाची धूरा अजिंक्य रहाणेकडे सोपवण्यात आली होती. अजिंक्यच्या संघाने झिम्बाब्वेत घवघवीत यश मिळवत निवड समितीचा विश्वास सार्थ ठरवला आहे.