टीम इंडिया बॅकफूटवर
By Admin | Published: March 27, 2017 01:08 AM2017-03-27T01:08:48+5:302017-03-27T01:08:48+5:30
आॅफस्पिनर नॅथन लियोनने तिसऱ्या सत्रात केलेल्या अचूक माऱ्याच्या जोरावर आॅस्ट्रेलियाने रविवारी दुसऱ्या दिवशी वर्चस्व गाजवले
धरमशाला : आॅफस्पिनर नॅथन लियोनने तिसऱ्या सत्रात केलेल्या अचूक माऱ्याच्या जोरावर आॅस्ट्रेलियाने रविवारी दुसऱ्या दिवशी वर्चस्व गाजवले आणि यजमान भारताला चौथ्या व अखेरच्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात आघाडी मिळविण्याच्या आशेला मोठा हादरा दिला. भारताने दुसऱ्या दिवसअखेर पहिल्या डावात ६ बाद २४८ धावांची मजल मारली होती. भारताला आॅस्ट्रेलियाची पहिल्या डावातील धावसंख्या गाठण्यासाठी अद्याप ५२ धावांची गरज आहे. भारताने अखेरच्या सत्रात ९५ धावा वसूल केल्या, पण चार महत्त्वाचे बळी गमावले. भारताची आशा आता गेल्या लढतीतील शतकवीर वृद्धिमान साहा (नाबाद १०) व रवींद्र जडेजा (नाबाद १६) यांच्या कामगिरीवर अवलंबून आहे.
फॉर्मात असलेला लोकेश राहुल (६०) व चेतेश्वर पुजारा (५७) यांनी झळकावलेल्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने चहापानाच्या विश्रांतीपर्यंत २ बाद १५३ धावांची मजल मारली होती. त्यानंतर लियोनच्या भेदक माऱ्यापुढे तिसऱ्या सत्रात सुरुवातीच्या पाच षटकांत भारताने दोन विकेट गमावल्या. त्यानंतरही भारत सावरू शकला नाही. कर्णधार अजिंक्य रहाणे (४६) व रविचंद्रन आश्विन (३०) यांनी काही काळ आशा कायम राखल्या. पण हे दोन्ही फलंदाज पाच धावांच्या अंतरात माघारी परतल्यानंतर भारताच्या पहिल्या डावात आघाडी मिळविण्याच्या आशा धूसर झाल्या.
धावफलक
आॅस्ट्रेलिया पहिला डाव : ३००.
भारत पहिला डाव : राहुल झे. वॉर्नर गो. कमिन्स ६०, विजय झे. वेड गो. हेजलवूड ११, पुजारा झे. हँड्सकोम्ब गो. लियोन ५७, रहाणे झे. स्मिथ गो. लियोन ४६, नायर झे. वेड गो. लियोन ०५, आश्विन पायचित गो. लियोन ३०, साहा खेळत आहे १०, जडेजा खेळत आहे १६. अवांतर : १३. एकूण : ९१ षटकांत ६ बाद २४८. गडी बाद क्रम : १-२१, २-१०८, ३-१५७, ४-१६७, ५-२१६, ६-२२१. गोलंदाजी : हेजलवूड १८-६-४०-१, कमिन्स २१-५-५९-१, लियोन २८-५-६७-४, ओकिफे २४-४-६९-०.
कमिन्ससोबत राहुलचा ‘वाद’
यापूर्वी दुसऱ्या सत्रात राहुलने आपली विकेट बहाल केली. अर्धशतकी खेळीदरम्यान राहुलवर कुठलेही दडपण जाणवत नव्हते. राहुलने मालिकेत पाचव्यांदा अर्धशतकी खेळी केली. त्याने १२४ चेंडूंना सामोरे जाताना ९ चौकार व १ षटकार लगावला.
कमिन्ससोबत पहिल्या व दुसऱ्या सत्रात त्याचा वाद झाला. कमिन्सच्या आखूड टप्प्याच्या माऱ्याला खेळताना राहुलने आपल्या तंत्राचा योग्य वापर केला. अखेर राहुलच्या संयमाचा बांध फुटला आणि त्याच्या मिसटाइम झालेला पूलचा फटका डेव्हिड वॉर्नरच्या हातात विसावला.
फटका चुकीचा होता : राहुल
जोश हेजलवूड व पॅट कमिन्स यांचा सकाळचा स्पेल माझ्या कसोटी कारकिर्दीतील सर्वांत ‘कठीण’ स्पेल होता आणि मी मारलेला पुलचा फटका खराब होता, अशी प्रतिक्रिया भारताचा सलामीवीर फलंदाज लोकेश राहुलने व्यक्त केली.
राहुलने प्रतिस्पर्धी संघाच्या वेगवान गोलंदाजांची प्रशंसा करताना म्हटले की, ‘पहिल्या सत्रात हेजलवूड व कमिन्स यांनी तिखट मारा केला. अशी गोलंदाजी मी आजवरच्या कसोटी कारकिर्दीत खेळलो नाही. ते अचूक दिशा व टप्पा राखून मारा करीत होते आणि चेंडू वेगाने स्विंग करीत होते.’
राहुलने कमिन्सच्या गोलंदाजीवर खेळलेला पुलचा फटका टीकेचे कारण ठरला. कारण त्या वेळी तो ६० धावांवर खेळत होता आणि त्याला मोठी खेळी करण्याची संधी होती.
राहुल म्हणाला, ‘निश्चितच हा फटका खेळताना चूक झाली. खेळपट्टीवर बराच वेळ घालविल्यानंतर कमिन्सविरुद्ध हा फटका खेळू शकतो, असे मला वाटले. माझा हेतू चांगला होता, पण फटका चुकीचा होता.’
राहुल पुढे म्हणाला, ‘दुसऱ्या डावात मी त्यात यशस्वी होईल, अशी आशा आहे. दुसऱ्या डावात सकारात्मक विचाराने फलंदाजी करणार आहे. चांगल्या सुरुवातीचा लाभ घेता न आल्याची खंत नाही. मोठी खेळी करता न आल्यामुळे थोडा निराश आहे. संघासाठी अधिक धावा फटकावण्याची संधी होती. सलामीवीर
म्हणून खेळपट्टीवर अधिक वेळ घालवताना मोठी धावसंख्या उभारणे आवश्यक होते.
रहाणेला स्वीपच्या फटक्यापासून
रोखण्यास प्रयत्नशील होतो : लियोन
भारतीय कर्णधार अजिंक्य रहाणेला स्वीपचा फटका मारण्यापासून रोखल्यामुळे चौथ्या व निर्णायक कसोटी सामन्यात त्याला बाद करण्यात मदत झाली, अशी प्रतिक्रिया आॅस्ट्रेलियाचा आॅफस्पिनर नॅथन लियोनने व्यक्त केली. दुसऱ्या दिवसअखेर या कसोटी सामन्यात उभय संघांना समान संधी असल्यामुळे लियोनने आनंद व्यक्त केला. लियोन म्हणाला, ‘वेगामध्ये परिवर्तन आणि अचूक टप्प्यावर मारा केल्यामुळे रहाणेला रोखण्यात यश आले आणि दुसऱ्या दिवशी अखेरच्या सत्रात चार बळी घेता आले.’ लियोनने आपल्या योजनेबाबत सांगितले की, ‘सर्व काही योजनेनुसार घडले. रहाणे माझ्या गोलंदाजीवर स्वीपच्या फटक्याचा अधिक वापर करीत असतो.
एन्ड बदलल्यानंतर केली कमाल
लियोनने आतापर्यंत ६७ धावांच्या मोबदल्यात चार बळी घेतले आहेत. लियोनने एन्ड बदलल्यानंतर चेंडूला अधिक उसळी मिळायला लागली. त्याच्या अशाच एका उसळलेल्या चेंडूवर पुजारा बाद झाला.
रवींद्र जडेजाचे दुहेरी यश
टीम इंडियाची दारोमदार तिसऱ्या दिवशी आता साहाव्यतिरिक्त रवींद्र जडेजाच्या कामगिरीवर अवलंबून आहे. जडेजाने रविवारी मनोधैर्य उंचावणारी खेळी केली. जडेजाने ओकिफे व लियोनच्या गोलंदाजीवर षटकार लगावत आपला निर्धार स्पष्ट केला. कसोटी क्रिकेटमध्ये एक हजार धावा व १०० बळी अशी दुहेरी कामगिरी करणारा तो दहावा भारतीय खेळाडू ठरला आहे.
चेतेश्वर पुजाराची शानदार खेळी
पुजाराने कारकिर्दीतील १५ वे अर्धशतक झळकावले. विजय सकाळच्या सत्रात झटपट माघारी परतल्यानंतर, पुजारा व राहुल यांनी दुसऱ्या विकेटसाठी ८७ धावांची भागीदारी केली. त्यानंतर पुजाराने रहाणेसोबत तिसऱ्या विकेटसाठी ४९ धावांची भर घातली. पुजाराने १५१ चेंडूंना सामोरे जाताना ६ चौकार लगावले.
पुजाराने पुढे सरसावत ओकिफे व लियोनच्या गोलंदाजीवर काही आकर्षक फटके लगावले. मिडविकेट सीमारेषेवर चौकार ठोकत त्याने अर्धशतक पूर्ण केले. त्यापूर्वी त्याने हेजलवूड व ओकिफेच्या गोलंदाजीवर कव्हरमधून मारलेले चौकार आकर्षक होते.