टीम इंडिया कुठलेही लक्ष्य गाठण्यास सक्षम : स्मिथ
By Admin | Published: February 21, 2015 02:26 AM2015-02-21T02:26:21+5:302015-02-21T02:26:21+5:30
रविवारी खेळल्या जाणाऱ्या लढतीच्या निमित्ताने दक्षिण आफ्रिकेची गोलंदाजी आणि भारतीय फलंदाजी यांच्यादरम्यान चुरस अनुभवायला मिळणार आहे, असे मत दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथने व्यक्त केले.
मेलबर्न : महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ कुठलेही लक्ष्य गाठण्यास सक्षम असून, विश्वकप स्पर्धेत उभय संघांदरम्यान रविवारी खेळल्या जाणाऱ्या लढतीच्या निमित्ताने दक्षिण आफ्रिकेची गोलंदाजी आणि भारतीय फलंदाजी यांच्यादरम्यान चुरस अनुभवायला मिळणार आहे, असे मत दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथने व्यक्त केले. गतविजेत्या भारतीय संघाला रविवारी मेलबर्न मैदानावर दक्षिण आफ्रिकेच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. स्मिथ म्हणाला, ‘२०१३ नंतर अन्य संघांच्या तुलनेत भारतीय संघाने लक्ष्याचा पाठलाग करीत अधिक विजय मिळविले आहेत. त्यामुळे ते कुठलेही लक्ष्य गाठण्यास सक्षम आहेत. महेंद्रसिंह धोनी व विराट कोहली संघसहकाऱ्यांमध्ये हा विश्वास निर्माण करतील. भारताच्या आघाडीच्या फळीत शिखर धवन, रोहित शर्मा व विराट कोहली यांचा समावेश आहे. गेल्या दोन वर्षांत वन-डे क्रिकेटमध्ये हे तिन्ही फलंदाज कमालीचे यशस्वी ठरले आहेत. (वृत्तसंस्था)