विजयाचे खाते उघडण्यास टीम इंडिया उत्सुक

By Admin | Published: January 20, 2015 12:20 AM2015-01-20T00:20:39+5:302015-01-20T00:20:39+5:30

वन-डे सामन्यांच्या तिरंगी मालिकेत मंगळवारी इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या लढतीत विजयी मार्गावर परतण्याच्या निर्धाराने मैदानात उतरणार आहे.

Team India eager to open the winner's account | विजयाचे खाते उघडण्यास टीम इंडिया उत्सुक

विजयाचे खाते उघडण्यास टीम इंडिया उत्सुक

googlenewsNext

ब्रिस्बेन : आॅस्ट्रेलियाविरुद्ध सलामीच्या लढतीत पराभव स्वीकारावा लागल्यामुळे निराश झालेला भारतीय संघ केलेल्या चुकांपासून बोध घेऊन वन-डे सामन्यांच्या तिरंगी मालिकेत मंगळवारी इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या लढतीत विजयी मार्गावर परतण्याच्या निर्धाराने मैदानात उतरणार आहे.
उभय संघांना सलामीला यजमान संघाकडून पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे उभय संघ मंगळवारच्या लढतीत विजयाचे खाते उघडण्यास उत्सुक आहेत. आॅस्ट्रेलियाने शुक्रवारी सिडनीमध्ये इंग्लंडचा ३ गडी राखून पराभव केल्यानंतर रविवारी मेलबोर्नमध्ये भारताविरुद्ध ४ गडी राखून सरशी साधली.
पहिल्या लढतीत बोनस गुणांसह विजय मिळविणाऱ्या आॅस्ट्रेलियाने २ लढतींत ९ गुणांची कमाई केली आहे. भारताला सलामी लढतीत थोड्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला. भारतातर्फे भुवनेश्वर कुमार व अक्षर पटेल यांनी चांगली गोलंदाजी करून आॅस्ट्रेलियाच्या धावगतीवर अंकुश राखला. कसोटी मालिकेत दुय्यम दर्जाची गोलंदाजी असल्याची टीका झाल्यानंतर भारतीय संघासाठी ही सकारात्मक बाब आहे. भुवनेश्वरला फिटनेसच्या कारणास्तव पहिल्या ३ कसोटी सामन्यांत खेळता आले नव्हते. चौथ्या कसोटी सामन्यात त्याला सूर गवसला नाही. ५ दिवसांच्या विश्रांतीनंतर आणि नेटमध्ये कसून सराव केल्यानंतर रविवारी भुवनेश्वरने चांगला मारा केला. आॅस्ट्रेलियात प्रथमच खेळत असलेला फिरकीपटू अक्षर पटेलनेही छाप सोडली. कर्णधार महेंद्रसिंह धोनीने त्याच्यावर विश्वास व्यक्त करताना अखेरच्या षटकांमध्ये त्याच्याकडे चेंडू सोपविला.
त्यानंतर धोनीने डेथ ओव्हर्समध्ये पटेलला प्रथम पसंती मिळण्याची शक्यता असल्याचे म्हटले होते; पण त्यासाठी त्याला सातत्याने चांगला मारा करावा लागेल. मंगळवारी खेळल्या जाणाऱ्या लढतीत सर्वांची नजर भुवनेश्वर व पटेल यांच्यावर राहील. या दोन्ही गोलंदाजांकडून पुन्हा एकदा अचूक गोलंदाजीची अपेक्षा आहे. धोनीला गेल्या सामन्यातील शतकवीर रोहित शर्माकडून पुन्हा एकदा मोठ्या खेळीची आशा आहे. शर्माचा फॉर्म कायम राहिला, तर भारताची सलामीच्या जोडीबाबतची समस्या काहीअंशी सुटेल. दुसऱ्या टोकाकडून शिखर धवनला अद्याप सूर गवसलेला नाही. मधल्या फळीवरील दडपण कमी करण्यासाठी अजिंक्य रहाणे व विराट कोहली यांना अनुक्रमे तिसऱ्या व चौथ्या क्रमांकांवर फलंदाजी करताना धावा कराव्या लागतील. रवींद्र जडेजाच्या अनुपस्थितीत अखेरच्या षटकांमध्ये वेगाने धावा फटकावण्याचे दडपण कर्णधार धोनीवर असेल. गेल्या काही वर्षांत वन-डे क्रिकेटमध्ये इंग्लंडविरुद्ध भारताची कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. २०११च्या दौऱ्यात भारताला एकही सामना जिंकता आला नव्हता; पण त्यानंतर १५ पैकी १२ सामन्यांत भारताने विजय मिळविला. त्यांपैकी ४ सामने इंग्लंडमध्ये खेळले गेले आहेत.
दुसऱ्या बाजूचा विचार करताना अ‍ॅलिस्टर कुकच्या स्थानी नवा कर्णधार इयोन मॉर्गनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या इंग्लंड संघाकडे नवी व्यूहरचना आखण्याचा व अमलात आणण्यासाठी वेळ उरलेला नाही. सराव सत्रामध्ये इंग्लंडने माजी स्टार अष्टपैलू अ‍ॅण्ड्य्रू फ्लिन्टॉफची मदत घेतली. त्यामुळे संघाचा आत्मविश्वास उंचावला असेल. फ्लिन्टॉफ येथे बिग बॅश लीगमध्ये खेळत आहे. केव्हिन पीटरसनही या स्पर्धेसाठी येथे आहे; पण मदतीसाठी त्याला पाचारण करण्यात आलेले नाही.(वृत्तसंस्था)

वन डेत धावा काढत असल्याचे समाधान : रैना
विश्वचषकाआधी वन डे क्रिकेटमध्ये धावा काढत असल्याचे समाधान वाटते, असे टीम इंडियाचा फलंदाज सुरेश रैना याचे मत आहे. आॅस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचे दोन कसोटी सामने अनिर्णीत राहिले नसते, तर मालिकेतील अपयशामुळे निराशा झाली असते, असेही तो म्हणाला.
रैनाने तिरंगी मालिकेच्या पहिल्या सामन्यात आॅस्ट्रेलियाविरुद्ध अर्धशतकी खेळी केली.

प्रतिस्पर्धी संघ
भारत :- महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), शिखर धवन, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, विराट कोहली, अंबाती रायुडू, सुरेश रैना, स्टुअर्ट बिन्नी, अक्षर पटेल, आर. आश्विन, रवींद्र जडेजा, ईशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार, मोहंमद शमी, उमेश यादव, धवल कुलकर्णी, मोहित शर्मा.
इंग्लंड :- इयोन मोर्गन (कर्णधार), मोईन अली, जेम्स अँडरसन, गॅरी बॅलन्स, इयान बेल, रवी बोपारा, स्टुअर्ट ब्रॉड, जोस बटलर, स्टीव्हन फिन, अ‍ॅलेक्स हेल्स, ख्रिस जॉर्डन, जो रुट, जेम्स टेलर, जेम्स ट्रेडवेल, ख्रिस वोक्स.

 

Web Title: Team India eager to open the winner's account

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.