युवराजचा फॉर्म व पावसावर टीम इंडियाची नजर
By admin | Published: June 25, 2017 12:01 AM2017-06-25T00:01:36+5:302017-06-25T00:01:36+5:30
पहिला सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर आज (रविवारी) विंडीजविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या वन-डे लढतीत भारतीय संघाची नजर युवराज सिंगचा फॉर्म व पाऊस यावर राहणार आहे.
पोर्ट आॅफ स्पेन : पहिला सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर आज (रविवारी) विंडीजविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या वन-डे लढतीत भारतीय संघाची नजर युवराज सिंगचा फॉर्म व पाऊस यावर राहणार आहे.
पहिली लढत पावसामुळे रद्द करण्यात आली. भारताने ३९.२ षटकांत ३ बाद १९९ धावांची मजल मारली असता पावसाचा व्यत्यय निर्माण झाला. त्यानंतर खेळ शक्य झाला नाही. शिखर धवनची ८७, तर पुनरागमन करणाऱ्या अजिंक्य रहाणेची ६२ धावांची खेळी भारतीय डावाचे वैशिष्ट्य ठरले. वातावरण कुणाच्या हातात नसते, पण विराट कोहलीला चिंता आहे ती युवराज सिंगच्या फॉर्मची. युवराजला गेल्या काही सामन्यांमध्ये लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत पाकविरुद्धच्या लढतीत अर्धशतकी खेळी केल्यानंतर युवराजने श्रीलंकेविरुद्ध ७, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नाबाद २३, पाकविरुद्ध अंतिम लढतीत २२ आणि वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या वन-डे सामन्यात ४ धावा केल्या.
युवराजच्या कौशल्य व अनुभवावर कुणाला शंका नाही, पण ३५ वर्षीय युवराजवर वयाचा प्रभाव जाणवत आहे. त्याचे क्षेत्ररक्षण चांगले होत नसून कर्णधार कोहली डावखुरा फिरकीपटू म्हणून त्याचा उपयोग करून घेणे आवश्यक समजत नाही.
माजी भारतीय कर्णधार आणि अंडर-१९ संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविडने अलीकडेच संघव्यवस्थापनाने युवराज २०१९ च्या विश्वकप स्पर्धेत खेळणार किंवा नाही, याचा निर्णय घेण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. विश्वकप स्पर्धेला केवळ दोन वर्षांचा कालावधी शिल्लक असून कोहलीला युवराजबाबत लवकरच निर्णय घ्यावा लागणार आहे. डावखुरा आक्रमक फलंदाज ऋषभ पंत संधीची प्रतीक्षा करीत आहे. अशा स्थितीत युवराज आपले स्थान सुरक्षित असल्याचे मानू शकत नाही. दुखापतग्रस्त मनीष पांडे फिट झाल्यानंतर ५० षटकांच्या क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा स्वत:ला सिद्ध करण्यास उत्सुक असेल. पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द झालेल्या पहिल्या लढतीत खेळलेल्या संघात भारतीय संघ बदल करणार नसल्याचे संकेत मिळत आहेत. ही लढत त्याच मैदानावर खेळली जाणार आहे.
अर्धशतकी खेळीमुळे रहाणेचा आत्मविश्वास उंचावला असेल. पुढील वन-डे मालिकेत रोहित शर्माच्या पुनरागमनानंतर आपल्याला स्थान सोडावे लागणार असल्याची रहाणेला चांगली कल्पना आहे. रहाणे व धवन यांनी सलामीला १३२ धावांची भागीदारी केली. धवनला के. एल. राहुल दुखापतग्रस्त झाल्यामुळे पुनरागमनाची संधी मिळाली. त्याने त्याचा पुरेपूर लाभ घेतला. धवनने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत सर्वाधिक धावा फटकावताना ‘गोल्डन बॅट’चा पुरस्कार पटकावला. विंडीजमध्ये त्याने कामगिरीत सातत्य राखले तर त्याच्यासाठी व संघासाठी ते फायद्याचे ठरेल. भारतीय संघ पूर्ण लढत खेळण्यास इच्छुक राहील. कारण मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये चायनामन गोलंदाज कुलदीप यादवच्या क्षमतेची चाचणी घेण्याची संधी मिळेल. कुलदीपला पहिल्या लढतीत रवींद्र जडेजाच्या स्थानी पदार्पणाची संधी मिळाली होती.
जडेजाला चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत चांगली कामगिरी करता आली नाही, पण तो आताही भारतातील नंबर वन डावखुरा गोलंदाज आहे. वेस्ट इंडिजविरुद्धची मालिका युवा खेळाडूंची चाचणी घेण्यासाठी सर्वोत्तम संधी आहे.
भारत :- विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, अजिंक्य रहाणे, युवराज सिंग, महेंद्रसिंह धोनी, हार्दिक पांड्या, केदार जाधव, रविचंद्रन आश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक आणि उमेश यादव.
वेस्ट इंडिज :- जेसन होल्डर (कर्णधार), जोनाथन कॉर्टर, मिगुलएल कमिन्स, अल्जारी जोसेफ, जेसन मोहम्मद, किरन पॉवेल, केसरिक विल्यम्स, देवेंद्र बिशू, रोस्टन चेज, शाई होप, एविन लुईस, अॅश्ले नर्स व रोवमॅन पॉवेल.