टीम इंडिया झिम्बाब्वेत दाखल
By admin | Published: June 10, 2016 03:49 AM2016-06-10T03:49:13+5:302016-06-10T03:49:13+5:30
१६ सदस्यांचा भारतीय संघ ११ जूनपासून झिम्बाब्वेविरुद्ध सुरू होणाऱ्या मर्यादित षटकांची मालिका खेळण्यासाठी हरारेला पोहोचला आहे.
हरारे : महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील युवा खेळाडूंचा भरणा असलेल्या १६ सदस्यांचा भारतीय संघ ११ जूनपासून झिम्बाब्वेविरुद्ध सुरू होणाऱ्या मर्यादित षटकांची मालिका खेळण्यासाठी हरारेला पोहोचला आहे. गुरुवारपासून टीम इंडियाच्या सराव सत्रास सुरुवात झाली.
या दौऱ्यासाठी राष्ट्रीय निवडकर्त्यांनी काही युवा व अननुभवी खेळाडूंना संधी दिली आहे. उद्या, शनिवारपासून सुरू होणाऱ्या या झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेत प्रत्येकी ३ एकदिवसीय व टी-२० सामने होणार असून, सर्व सामने हरारे येथे पार पडतील.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) ट्विटरवरून टीम इंडिया झिम्बाब्वेला पोहोचल्याची माहिती दिली. त्याव्यतिरिक्त बीसीसीआयने माहिती दिली की, ‘हरारे येथील स्पोर्टस् कॉम्प्लेक्समध्ये सकाळी साडेनऊ ते १२ वाजेपर्यंत टीम इंडिया सराव करेल.’ झिम्बाब्वे विरुद्ध पहिला एकदिवसीय सामना ११ जूनला होणार असून, त्यानंतर १३ व १५ जूनला अनुक्रमे दुसरा व तिसरा एकदिवसीय सामना खेळला जाईल. यानंतर १०, २० व २२ जूनला टी-२० सामना खेळविण्यात येईल. (वृत्तसंस्था)
>संघात जागा निश्चित करणार : पांड्ये
झिम्बाब्वे दौऱ्यापासूनच आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या मनिष पांड्येने उद्या शनिवारपासून सुरू होणाऱ्या एकदिवसीय व टी-२० मालिकेत चमकदार कामगिरी करून टीम इंडियामध्ये जागा निश्चित करणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. हरारे येथेच गतवर्षी जुलैमध्ये पांड्येने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.
पांड्येने सांगितले की,
‘हा दौरा माझ्यासाठी पुन्हा एकदा नवी सुरुवात असेल. गतवर्षी आम्ही येथे याच काळात आलो होतो आणि झिम्बाब्वेविरुद्धच मी पदार्पण केले होते. त्यामुळे पुन्हा एकदा त्या आठवणींना उजाळा देता येईल.’ त्याचप्रमाणे, ‘झिम्बाब्वेविरुद्ध पहिल्या सामन्यात केलेली खेळी खास होती. मला मिळालेल्या संधीचे मी सोने केले होते. ही खूप चांगली सुरुवात होती आणि यामुळे माझा आत्मविश्वास वाढला,’ असेही पांड्येने सांगितले.
>‘युवा ब्रिगेड’वर विशेष लक्ष : बांगर
झिम्बाब्वे दौऱ्यात स्थानिक परिस्थितीशी एकरूप होण्याचे आमच्या युवा खेळाडूंपुढे आव्हान आहे. कमी वेळेत त्यांनी येथील परिस्थितीशी जुळवून घ्यावे, असे टीम इंडियाचे प्रमुख कोच संजय बांगर यांनी म्हटले आहे.
भारतीय संघातील युवा खेळाडूंसाठी झिम्बाब्वे दौरा अतिशय महत्त्वपूर्ण असल्याचे सांगून ४३ वर्षांचे बांगर म्हणाले, ‘युवा खेळाडूंच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीस सुरुवात होणार असल्याने चांगल्या कामगिरीचा दूरगामी परिणाम कारकिर्दीवर पडेल. संघात असलेले अनेक जण झिम्बाब्वेत कधीच खेळले नाहीत. कमीत कमी वेळेत परिस्थितीशी एकरूप होऊन कामगिरी करणे हे अवघड आव्हान असेल. आम्हाला थेट वन-डे खेळायचा आहे.’
झिम्बाब्वेच्या या दौऱ्यात असलेल्या खेळाडूंपैकी केवळ पाचजण २०१५ मध्ये येथे येऊन गेले आहेत. भारताने ३-० ने मालिका जिंकली होती. विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन आणि रविचंद्रन अश्विन यांना विश्रांती देण्यात आल्याने अनेक नवख्या चेहऱ्यांना स्थान मिळाले.
सर्वाधिक अनुभवी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हाच आहे. त्याने २७५ वन-डे आणि ६८ टी-२० सामने खेळले आहेत. अन्य सदस्य मात्र एकूण ८३ वन-डे आणि २८ टी-२० सामने खेळले आहेत. यजुवेंद्र चहल, फैज फझल, मनदीपसिंग, करुण नायर आणि जयंत यादव हे एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळले नाहीत. आमचे खेळाडू क्षेत्ररक्षणात तरबेज असून, फलंदाजी आणि गोलंदाजीही सरस असल्याचे बांगर यांचे मत आहे.