टीम इंडिया ‘हरा रे’
By admin | Published: June 19, 2016 04:32 AM2016-06-19T04:32:58+5:302016-06-19T04:32:58+5:30
झिम्बाब्वेविरुद्ध एकदिवसीय मालिकेत निर्विवाद वर्चस्व मिळवल्यानंतर टीम इंडियाला टी२० मालिकेच्या पहिल्याच सामन्यात यजमानांविरुद्ध २ धावांनी पराभव पत्करावा लागला.
हरारे : झिम्बाब्वेविरुद्ध एकदिवसीय मालिकेत निर्विवाद वर्चस्व मिळवल्यानंतर टीम इंडियाला टी२० मालिकेच्या पहिल्याच सामन्यात यजमानांविरुद्ध २ धावांनी पराभव पत्करावा लागला. झिम्बाब्वेने प्रथम फलंदाजी करताना १७० धावा उभारल्यानंतर भारताला निर्धारित षटकात ६ बाद १६८ धावा काढता आल्या.
हरारे स्पोर्टस् क्लब मैदानावर झालेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकून महेंद्रसिंग धोनीने यजमान झिम्बाब्वेला प्रथम फलंदाजीस निमंत्रित केले. अडखळत्या सुरुवातीनंतर सातव्या क्रमांकावरील एल्टन चिगंबुरा याने केलेल्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर झिम्बाब्वेने निर्धारित षटकांत आव्हानात्मक मजल मारली.
या आव्हानाचा पाठलाग करताना भारताला पहिल्या षटकातील पहिल्याच चेंडूवर मोठा धक्का बसला. एकदिवसीय मालिकेचा हीरो ठरलेला लोकेश राहुल डोनाल्ड तिरीपानोच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. यानंतर मनदीप संग (३१) आणि अंबाती रायडू (१९) यांनी डाव सावरला. रायडू आणि मनदीप ठराविक अंतराने बाद झाल्यानंतर अनुभवी मनीष पांडेने (४८) झुंजार खेळी करून भारताच्या आशा कायम ठेवल्या होत्या.
त्याने ३५ चेंडंूत १ चौकार व ३ षटकारांसह खेळी सजवली. तो बाद झाल्यानंतर केदार जाधव (१९), अक्षर पटेल (१८) आक्रमणाच्या नादात बाद झाले. अखेरच्या षटकात ८ धावांची गरज असताना अक्षर बाद झाला, तर शेवटच्या चेंडूवर ४ धावांंची आवश्यकता असताना फिनिशर धोनीला (नाबाद १९) केवळ एक धाव घेता आली. चामू चिबाबा (२/१३) आणि तौराई मुझरबानी (२/३१) यांनी अचूक मारा केला.
तत्पूर्वी, चिगंबुराच्या नाबाद ५४ धावांच्या जोरावर यजमानांनी आव्हानात्मक मजल मारली. त्याने २६ चेंडूंत १ चौकार आणि तब्बल ७ षटकारांचा तडाखा दिला. त्याचवेळी माल्कम वॉलर (३०), हॅमिल्टन मसाकद्झा (२५) यांनीही दमदार फटकेबाजी केली. भारताकडून जसप्रीत बुमराहने २४ धावांत २ बळी घेत झिम्बाब्वेला रोखण्याचा प्रयत्न केला, तर रिषी धवन, अक्षर आणि युजवेंद्र चहल यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. (वृत्तसंस्था)
लक्षवेधी...
- झिम्बाब्वेचा भारताविरुध्द सलग दुसरा टी२० विजय आहे. या आधी १९ जुलै २०१५ रोजी झिम्बाब्वेने भारताविरुद्ध याच मैदानावर
बाजी मारली.
- या सामन्यात टीम इंडियाकडून ५ खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये पदार्पण केले.
- सर्वोत्तम फिनिशर म्हणून
ओळखला जाणारा महेंद्रसिंग धोनी अखेरच्या चेंडूवर चौकार मारण्यात अपयशी ठरला
- अखेरच्या षटकात रिषी धवनने २ चेंडू निर्धारित खेळल्याने सामना झिम्बाब्वेच्या बाजूने झुकला.
संक्षिप्त धावफलक
झिम्बाब्वे : २० षटकांत ६ बाद १७० धावा (एल्टन चिगुंबरा नाबाद ५४, माल्कम वॉलर ३०; जसप्रीत बुमराह २/२४) वि.वि. भारत : २० षटकांत ६ बाद १६८ धावा : (मनीष पांडे ४८, मनदीप सिंग ३८; चामू चिबाबा २/१३, तौराई मुझरबानी २/३१).