टीम इंडियाला आघाडी घेण्याची संधी
By admin | Published: October 17, 2015 10:38 PM2015-10-17T22:38:20+5:302015-10-17T22:38:20+5:30
महेंद्रसिंह धोनीने नेतृत्वाला साजेशी खेळी करीत द. आफ्रिकेविरुद्ध विजय नोंदवित दुसऱ्या सामन्यातील विजयासह मालिकेत बरोबरी साधून दिली. आज रविवारी येथे होणाऱ्या
तिसरी वन-डे आज : भारतापुढे द. आफ्रिकेला नमविण्याचे आव्हान
राजकोट : महेंद्रसिंह धोनीने नेतृत्वाला साजेशी खेळी करीत द. आफ्रिकेविरुद्ध विजय नोंदवित दुसऱ्या सामन्यातील विजयासह मालिकेत बरोबरी साधून दिली. आज रविवारी येथे होणाऱ्या तिसऱ्या सामन्यात विजयासह मालिकेत आघाडी नोंदविण्याचे टीम इंडियाचे प्रयत्न राहतील; पण त्यासाठी द. आफ्रिकेचा प्रतिकार मोडीत काढून वर्चस्व मिळविण्याचे कठीण आव्हान भारतापुढे असेल.
टी-२० मालिका ०-२ ने गमविल्यानंतर पहिला वन डे गमविताच टीकेची झोड उठली होती. अशास्थितीत भारताने इंदूरचा सामना २२ धावांनी जिंकून आत्मविश्वास परत मिळविला. हाच आत्मविश्वास कायम राखून भारत आघाडी घेण्याचे प्रयत्न करणार आहे.
इंदूरमध्ये धोनीने नाबाद ९२ धावा ठोकून एकट्याच्या बळावर विजय मिळवून दिला. अन्य फलंदाज अपयशीच ठरले होते. शिखर धवन आणि विराट कोहली यांची बॅट अद्याप तळपलेली नाही. धोनीने खेळपट्टीवर किल्ला लढविला नसता, तर भारताला २०० पर्यंतदेखील मजल गाठता आली नसती.
गोलंदाजीत मात्र सुधारणा दिसत आहे. भुवनेश्वर कुमार आणि अक्षर पटेल यांनी चांगला मारा करीत बळी घेतले. हरभजननेदेखील अप्रतिम मारा केला होता. गोलंदाजीशिवाय तळाच्या स्थानाला फलंदाजी करीत धावा खेचण्यासाठी भज्जी, भुवनेश्वर हे उपयुक्त ठरू शकतात. द. आफ्रिकेचा परदेशी भूमीवर फार चांगला रेकॉर्ड राहिला हे भारतीय संघाने ध्यानात ठेवायला हवे. राजकोटचा सामना जिंकून आघाडी मिळविण्याचे पाहुण्या संघाचे प्रयत्न असतील. हाशिम अमला, कर्णधार एबी डिव्हिलियर्स, क्विंटन डिकॉक, जेपी ड्यूमिनी आणि डेव्हिड मिलर हे धावा काढण्यात सक्षम आहेत. मधल्या फळीत बेहार्डियन वरबाडा हे त्यांना साथ देऊ शकतात. एबीने दोन सामन्यांत १२३ आणि डू प्लेसिसने ११३ धावा केल्या. याशिवाय ड्यूमिनी हा फलंदाजी-गोलंदाजीत भारतीयांची परीक्षा घेऊ शकतो. गोलंदाजीत फिरकीपटू इम्रान ताहीर; तसेच वेगवान डेल स्टेन हे मुख्य शस्त्र आहेत. स्टेनने मागच्या सामन्यात भारताचे महत्त्वाचे तीन गडी बाद
केले होते. रविवारी कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचा त्याचा
इरादा राहील. त्यामुळे राजकोटमध्ये धोनीला वेगळ्या डावपेचांसह
उतरावे लागेल. (वृत्तसंस्था)
राजकोट रैनासाठी ‘लकी’
डावखुरा फलंदाज सुरेश रैना याच्यासाठी राजकोटचे स्टेडियम ‘लकी’ आहे. २०१३ मध्ये इंग्लंडविरुद्ध याच मैदानावर त्याने शानदार शतक ठोकले होते. धोनीने इंदूरमध्ये झुंजार खेळी करीत टीकाकारांची बोलती बंद केली. रैनालादेखील आज रविवारी अशी संधी राहील. दोन वर्षांआधी रैनाने येथे ४९ चेंडूंवर सात चौकारांसह ५० धावा ठोकल्या होत्या. रहाणेनेदेखील ४७ धावा केल्या, पण भारताने तो सामना गमावला होता. २८ हजार क्षमतेच्या या स्टेडियमवर भारताने एकमेव वन डे इंग्लंडविरुद्धच खेळला. द. आफ्रिकेविरुद्ध रविवारी या मैदानावर खेळला जाणारा दुसरा आंतरराष्ट्रीय सामना असेल. ही खेळपट्टी फलंदाजांना पूरक असल्याने गोलंदाजांना संघर्ष करावा लागेल, अशी चिन्हे आहेत.
खेळाच्या मैदानात राजकारण आणू नका, असे भारतीय जनता पक्ष म्हणतो. मात्र, याची सुरुवात त्यांनीच केली आहे. या सामन्याची तिकिटे कोणाला विकली आहेत, हे त्यांनी जाहीर करावे. सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने भारतीय जनता पक्षाच्या लोकांनाच फक्त तिकिटे दिली आहेत.
- हार्दिक पटेल,
पाटीदार समाजाचे नेते
‘राजकोट’वर आंदोलनाचे सावट : खेळाडूंच्या गाड्या अडविण्याचा इशारा
येथील माधवराव शिंदे स्टेडियमवर रविवारी होणाऱ्या भारत-दक्षिण आफ्रिकेदरम्यानच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यावर पाटीदार समाजाच्या आरक्षणाच्या आंदोलनाचे सावट आहे. या
आंदोलनाचे प्रमुख हार्दिक पटेल यांनी स्टेडियमकडे जाणाऱ्या खेळाडूंच्या गाड्या अडविण्याचा इशारा
दिला आहे.
राजकोट शहराबाहेर खांडेरी गावाच्या हद्दीत असलेल्या या सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमकडे जाणारा रस्ता पाटीदार समाजाचे कार्यकर्ते रोखणार असल्याचा इशारा हार्दिक पटेल यांनी दिला आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सामन्याची तिकिटे पाटीदार समाजाला विकण्यात आलेली नाहीत.
या इशाऱ्यानंतर पोलिसांनी स्टेडियमसह शहरातील सुरक्षाव्यवस्थेत वाढ केली आहे. सामना व्यवस्थित पार पडावा, यासाठी तीन मानवविरहित हवाई निरीक्षण करणारी वाहने व ९० सीसी टीव्ही कॅमेऱ्यांची नजर असेल.
या पार्श्वभूमीवर, सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने हा सामना व्यवस्थित पार पडावा, यासाठी कंबर कसली आहे. सचिव निरंजन शहा म्हणाले, की या सामन्यासाठी २,५०० पोलीस तैनात करण्यात आले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हार्दिक पटेल यांच्या समर्थकांनी या सामन्याची सुमारे १०,००० तिकिटे विकत घेतली आहेत.
हार्दिक पटेलच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर खबरदारी म्हणून शनिवारी रात्री १० वाजेपासून राजकोटमधील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.
प्रतिस्पर्धी संघ
भारत - महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), रविचंद्रन आश्विन, स्टुअर्ट बिन्नी, शिखर धवन, विराट कोहली, भुवनेश्वर कुमार, अक्षर पटेल, अजिंक्य रहाणे, सुरेश रैना, अंबाती रायुडू, मोहित शर्मा, रोहित शर्मा, उमेश यादव, गुरकिरतसिंग मान आणि अमित मिश्रा.
दक्षिण आफ्रिका - एबी डीव्हिलियर्स (कर्णधार), हाशिम अमला, क्विंटन डीकॉक, फाफ डू प्लेसिस, जीन पॉल ड्युमिनी, डेव्हिड मिलर, फरहान बेहरदीन, ख्रिस मॉरिस, खाया जोंदो, अॅरोन फांगिसो, इम्रान ताहिर, मोर्ने मॉर्केल, केली एबोट आणि कागिसो रबादा.
हेड टू हेड...
दोन्ही संघामध्ये आत्तापर्यंत ७३ सामने झाले आहेत. भारतीय संघाने २७ तर द. आफ्रिकेने ४३ सामने जिंकले आहेत. तर तीन सामन्यांचा निकाल लागलेला नाही.