टीम इंडिया ‘नोबॉल’वर आऊट

By Admin | Published: April 1, 2016 04:02 AM2016-04-01T04:02:22+5:302016-04-01T04:02:22+5:30

मोक्याच्यावेळी मिळालेल्या जीवदानाचा फायदा घेत लिंडेल सिमन्सने केलेली तडाखेबंद फलंकाजी आणि आंद्रे रसेलने केलेली तुफानी फटकेबाजी या जोरावर वेस्ट इंडिजने टी२० विश्वचषक

Team India out on 'noball' | टीम इंडिया ‘नोबॉल’वर आऊट

टीम इंडिया ‘नोबॉल’वर आऊट

googlenewsNext

- शिवाजी गोरे/रोहित नाईक,  मुंबई

मोक्याच्यावेळी मिळालेल्या जीवदानाचा फायदा घेत लिंडेल सिमन्सने केलेली तडाखेबंद फलंकाजी आणि आंद्रे रसेलने केलेली तुफानी फटकेबाजी या जोरावर वेस्ट इंडिजने टी२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करताना यजमान भारताविरुद्ध ७ विकेट्सने रोमांचक विजय मिळवला. विध्वंसक फलंदाज ख्रिस गेलला स्वस्तात बाद केल्यानंतरही भारतीयांना विजय मिळवण्यात अपयश आले. विशेष म्हणजे दोन वेळा सिमन्सला नोबॉलवर मिळालेल्या जीवदानाचा मोठा फटका भारताला बसला. दुसऱ्यांदा अंतिम फेरी गाठलेल्या वेस्ट इंडिजला जगज्जेतेपदासाठी इडन गार्डन्सवर रविवारी बलाढ्य इंग्लंड विरुध्द लढावे लागेल.
भारताने दिलेल्या १९३ धावांच्या भल्यामोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना विंडिजला सुरुवातीलाच धक्का बसला. जसप्रीत बुमराहने धोकादायक गेलचा त्रिफळा उडवल्यानंतर भारतीय पाठिराख्यांनी सामना जिंकल्याच्या अंदाजात जल्लोष केला. मात्र सिमन्स व रसेल यांनी निर्णायक फटकेबाजी करताना भारतीयांच्या हातातील सामना अक्षरश: हिसकावून घेतला.
भारताच्या डावात विराट कोहलीला चार जीवदान मिळाले आणि त्याने विंडिजला त्याची शिक्षा दिली. नेमकी तीच बाब सिमन्ससह घडली. ६व्या आणि १४ व्या षटकांत अनुक्रमे रविचंद्रन अश्विन व हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर सिमन्स बाद झाला. परंतु दोन्ही चेंडू नोबॉल ठरल्याने त्याने याचा पुरेपुर फायदा उचलत विजयी खेळी केली. शिवाय बुमराह टाकत असलेल्या १८व्या षटकात सिमन्सचा झेल घेताना जेडेजाचा पाय सीमारेषेला स्पर्श झाल्याने पुन्हा एकदा सिमन्सला जीवदान मिळाले आणि त्याने रसेलसह अखेरपर्यंत टिकून राहत संघाला अंतिम फेरीत नेले. सिमन्सने ५१ चेंडूत ७ चौकार व ५ षटकारांची आतषबाजी करत नाबाद ८२ धावांचा तडाखा दिला. तर रसेलने केवळ २० चेंडूत ३ चौकार व ४ षटकार खेचताना नाबाद ४३ धावा कुटल्या. शिवाय सलामीवीर जॉन्सन चार्ल्सनेही आक्रमक ५२ धावा काढताना संघाच्या विजयाचा पाया रचला.
तत्पूर्वी, मुंबईकर सलामीवीर रोहित शर्मा व अजिंक्य रहाणे यांनी केलेली आक्रमक सुरुवात आणि संघाचा आधारस्तंभ विराट कोहलीने झळकावलेल्या शानदार नाबाद अर्धशतकाच्या जोरावर भारताने प्रथम फलंदाजी करताना २ बाद १९२ धावा उभारल्या. विशेष म्हणजे संपुर्ण स्पर्धेत राखीव खेळाडूंमध्ये बसल्यानंतर निर्णायक उपांत्य लढतीत मिळालेल्या संधीचे रहाणेने सोने केले. कोहलीने ४७ चेंडूत ११ चौकार व १ षटकार ठोकताना नाबाद ८९ धावा कुटताना विंडिजला मजबूत चोप दिला. अत्यंत सावध सुरुवात केल्यानंतर रोहित - रहाणे यांनी जिबरदस्त हल्ला चढवून ६ व्या षटकात भारताची बिनबाद ५५ अशी धमाकेदार सुरुवात केली. सॅम्युअल बद्रीने रोहितला पायचीत पकडून यजमानांना पहिला धक्का दिला. रोहितने ३१ चेंडूत प्रत्येकी ३ चौकार व षटकार ठोकत ४३ धावा फटकावल्या. यानंतर रहाणेने कोहलीसह ६६ धावांची भागीदारी करुन भारताला सावरले.
दरम्यान, ९व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर कोहलीला धावबाद करण्याची नामी संधी ड्वेन ब्रावोने गमावली आणि त्याची मोठी किंमत विंडिजला मोजावी लागली. रहाणे ३५ चेंडूत ४० धावांची खेळी करुन परतला. यानंतर धोनी - कोहली यांनी जिथे एक धाव मिळते त्या ठिकाणी दोन धावा पळताना विंडिजला क्षेत्ररक्षणाचे धडेच दिले. त्यातच कोहलीची फटकेबाजी आणि त्याला मिळालेले चार जीवदान यामुळे विंडिजचे खेळाडू पुर्णपणे हतबल झाले. कोहली - धोनी यांनी तिसऱ्या विकेटसाठी नाबाद ६४ धावांची भागीदारी केली.

धावफलक
भारत : रोहित शर्मा पायचीत गो. बद्री ४३, अजिंक्य रहाणे झे. ब्रावो गो. रसेल ४०, विराट कोहली नाबाद ८९, महेंद्रसिंग धोनी नाबाद १५. अवांतर - ५. एकूण : २० षटकांत २ बाद १९२ धावा. गोलंदाजी : आंद्रे रसेल ४-०-४७-१; सॅम्युअल बद्री ४-०-२६-१; कार्लोस ब्रेथवेट ४-०-३८-०; सुलेमान बेन ४-०-३६-०; ड्वेन ब्रावो ४-०-४४-०.
वेस्ट इंडिज : जॉन्सन चार्ल्स झे. रोहित गो. कोहली ५२, ख्रिस गेल त्रि. गो. बुमराह ५, मार्लन सॅम्युअल्स झे. रहाणे गो. नेहरा ८, लेंडल सिमन्स नाबाद ८२, आंद्रे रसेल नाबाद ४३. अवांतर - ६. एकूण : १९.४ षटकांत ३ बाद १९६ धावा. गोलंदाजी : आशिष नेहरा ४-०-२४-१; जसप्रीत बुमराह ४-०-४२-१; रविंद्र जडेजा ४-०-४८-०; रविचंद्रन अश्विन २-०-२०-०, हार्दिक पांड्या ४-०-४३-०; विराट कोहली १.४-०-१५-१.

Web Title: Team India out on 'noball'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.