टीम इंडिया ‘सफाया’ करण्यास सज्ज

By admin | Published: January 22, 2017 04:33 AM2017-01-22T04:33:26+5:302017-01-22T04:33:26+5:30

मालिकेत निर्विवाद आघाडी घेणाऱ्या टीम इंडियाने उद्या (रविवारी) ईडन गार्डन्सवर इंग्लंडला पुन्हा मात देत ३ सामन्यांच्या वन डे मालिकेत पाहुण्यांचा सफाया करण्याची

Team India is ready to "wipe out" | टीम इंडिया ‘सफाया’ करण्यास सज्ज

टीम इंडिया ‘सफाया’ करण्यास सज्ज

Next

कोलकाता : मालिकेत निर्विवाद आघाडी घेणाऱ्या टीम इंडियाने उद्या (रविवारी) ईडन गार्डन्सवर इंग्लंडला पुन्हा मात देत ३ सामन्यांच्या वन डे मालिकेत पाहुण्यांचा सफाया करण्याची तयारी चालविली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आयोजनाआधी इंग्लंडला क्लीन स्वीप देण्याची ही मोठी संधी असेल.
या दौऱ्यात इंग्लंडने अद्याप विजयाचे खाते उघडलेले नाही. कसोटी मालिकेत सफाया झाल्यानंतर वन डेतही विजय मिळविता आला नाही. कटकच्या दुसऱ्या वन डेत युवराजसिंग आणि महेंद्रसिंह धोनी या जोडीच्या दणकेबाज फलंदाजीमुळे पाहुण्यांना १५ धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. इयोन मोर्गनचा संघ कटकमध्ये ३८२ धावांचे कठीण लक्ष्य गाठताना तसेच पुण्यात ३५१ धावा उभारून विजयाच्या दारात पोहोचूनदेखील पराभूत झाला.
मोर्गनने कटकमध्ये स्वत: ८१ चेंडूंत १०२ धावा ठोकल्या; पण युवीच्या दीडशतकी व धोनीच्या शतकी खेळीपुढे त्याची खेळी झाकोळली गेली. या मालिकेचा शोध ठरलेल्या केदार जाधवने पुण्यात ७६ चेंडूंत १२० धावा ठोकल्या, तर कटकमध्ये युवराज-धोनीने चमक दाखवून चॅम्पियन्ससाठी उपयुक्तता सिद्ध केली. तिसऱ्या सामन्यात सलामीवीराची समस्या निकाली काढण्यासाठी अपयशी शिखर धवनच्या जागी अजिंक्य रहाणेला संधी मिळण्याची शक्यता आहे. दुसरा सलामीवीर के. एल. राहुल हादेखील कसोटीतील कामगिरीची वन डेत पुनरावृत्ती करू शकला नाही. दोन्ही वन डेत त्याच्या आठ आणि पाच धावा होत्या. रोहित शर्मा जखमेमुळे बाहेर आहे. अन्य फलंदाजांचा क्रम कायम राहील. विराट गोलंदाजीत बदल
करू शकतो. हार्दिक पांड्याने कटकमध्ये ६० धावा मोजल्या,
पण गडी बाद केला नव्हता. दुसरीकडे, उमेश यादवची जागा घेणाऱ्या भुवनेश्वरने मात्र डेथ ओव्हरमध्ये
संयमी मारा केला. मागच्या सामन्यात ७४७ धावांचा पाऊस पडल्याने
दोन्ही संघांच्या गोलंदाजांमध्ये दहशत आहे. (वृत्तसंस्था)

त्याचे श्रेय आयपीएलला : भुवी
डेथ ओव्हरमध्ये प्रभावी मारा करण्याचे श्रेय आयपीएलला जाते, असे वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारचे मत आहे. तो म्हणाला, ‘आयपीएलमध्ये डेथ ओव्हरमध्ये गोलंदाजी करताना मी अनुभवी बनलो.’ सनरायजर्स हैदराबादसाठी मागच्या सत्रात भुवीने १७ सामन्यांत २३ गडी बाद केले. आयपीएलमध्ये माझा संघ डेथ ओव्हरमध्ये माझ्यावर विसंबून होता असे सांगून कटक सामन्याबद्दल तो म्हणाला, ‘पाच षटकांत विजयाचे पारडे आमच्याकडे झुकवायचे होते. कशी गोलंदाजी करायची, याचा अनुभव असल्याने टिच्चून मारा केल्याने आत्मविश्वास उंचावला.’

आम्ही सकारात्मक : राय
मालिकेत आम्ही एकही सामना जिंकलो नाही. पण, त्यामुळे आत्मविश्वास ढळलेला नसून आम्ही सकारात्मक असल्याचे मत इंग्लंडचा सलामीवीर जेसन राय याने व्यक्त केले. सध्याची वन डे मालिका चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दृष्टीने सकारात्मक असल्याचे संकेत त्याने दिले. आम्ही तिसऱ्या सामन्याचा शेवटही सकारात्मक करणार; पण आमच्या दृष्टीने ही चॅम्पियन्सची तयारी आहे. आम्ही साडेतीनशेवर धावा करू शकलो, ही सकारात्मक बाजू आहे. आमच्या संघात काहीही चुकीचे नाही. सराव चांगलाच आहे. कुठल्याही आव्हानांना तोंड देण्यास आम्ही सज्ज आहोत. वैयक्तिक कामगिरीमुळे भारताला मोक्याच्या क्षणी विजय मिळाला, असेही रायने नमूद केले.

इंग्लंडसाठी बेन स्टोक्सने फलंदाजीत कमाल केली; पण गोलंदाजीत दोन्ही सामन्यांत त्याने भरपूर धावा मोजल्या. आदिल राशीदचे स्थान घेणारा लियॉम प्लंकेट यानेदेखील दहाच्या सरासरीने धावा दिल्या. इंग्लंडचा सलामीवीर अ‍ॅलेक्स हेल्स उजव्या हाताला जखम झाल्याने बाहेर आहे. जॉनी बेयरेस्टो याने त्याचे स्थान घेतले.

उभय संघ यातून निवडणार
भारत : विराट कोहली (कर्णधार), के. एल. राहुल, शिखर धवन, युवराजसिंग, महेंद्रसिंह धोनी, केदार जाधव, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, रविचंद्रन आश्विन, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, अजिंक्य रहाणे, मनीष पांडे, उमेश यादव, अमित मिश्रा.
इंग्लंड : इयोन मोर्गन (कर्णधार), जेसन रे, ज्यो रुट, जोस बटलर, बेन स्टोक्स, मोईन अली, ख्रिस व्होक्स, डेव्हिड विले, लियॉम प्लंकेट, जॅक बॉल, सॅम बिलिंग्स, लियॉम डॉसन, जॉनी बेयरस्टो, आदिल राशीद.

Web Title: Team India is ready to "wipe out"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.