कोहलीच्या नेतृत्वाखाली ‘टीम इंडिया’ मजबूत

By admin | Published: January 9, 2017 01:02 AM2017-01-09T01:02:07+5:302017-01-09T01:02:07+5:30

स्टीव्हन स्मिथच्या नेतृत्वाखालील टीम आॅस्ट्रेलिया २३ फेब्रुवारीपासून भारतात खेळल्या जाणाऱ्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेबाबत विचार करीत आहे.

Team India 'strong under the leadership of Kohli | कोहलीच्या नेतृत्वाखाली ‘टीम इंडिया’ मजबूत

कोहलीच्या नेतृत्वाखाली ‘टीम इंडिया’ मजबूत

Next

सिडनी : स्टीव्हन स्मिथच्या नेतृत्वाखालील टीम आॅस्ट्रेलिया २३ फेब्रुवारीपासून भारतात खेळल्या जाणाऱ्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेबाबत विचार करीत आहे. कोहलीच्या नेतृत्वाखालील ‘टीम इंडिया’ मजबूत असून त्यांना मायदेशात पराभूत करणे सोपे नाही, याची कल्पना आॅस्ट्रेलिया संघाला आहे. संघाचा कर्णधार दस्तूरखुद्द स्टीव्हन स्मिथने अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
आॅस्ट्रेलियाने अलीकडे मायदेशात पाकिस्तानचा ३-० ने धुव्वा उडवला, पण कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या टीम इंडियाविरुद्ध भारतात खेळण्याचे आव्हान सोपे नाही, असे स्मिथने म्हटले आहे. आॅस्ट्रेलियासाठी २०१३ चा भारत दौरा निराशाजनक ठरला. त्यावेळी त्यांना ०-४ ने पराभव स्वीकारावा लागला होता.
स्मिथ पुढे म्हणाला, ‘आमच्या संघातील काही खेळाडूंना भारतात खेळण्याचा अनुभव आहे. आॅस्ट्रेलिया आणि भारत येथील खेळपट्ट्यांमध्ये मोठा फरक असतो.’
आॅस्ट्रेलियाचे प्रशिक्षक डॅरन लीमन म्हणाले, ‘भारतात आॅस्ट्रेलियन फलंदाजांसाठी खेळपट्टीवर तळ ठोकणे महत्त्वाचे ठरेल. इंग्लंड संघामध्ये त्याची उणीव भासली. इंग्लंडचा कर्णधार कुकनेही दौऱ्यानंतर याची कबुली दिली.’
भारताविरुद्धच्या मालिकेसाठी संघाच्या संयोजनाबाबत विचारले असता प्रशिक्षकांनी खुलासा करण्याचे टाळले, पण अनुभवी सलामीवीर शॉन मार्शचा संघात समावेश होण्याचे संकेत मिळत आहेत. (वृत्तसंस्था)
लीमन म्हणाले, ‘भारतात सर्वोत्तम संघ खेळविण्यात येईल. संघात हा खेळेलच हे आताच सांगणे कठीम आहे. परिस्थिती कशी राहील, त्यावर संघाची निवड अवलंबून राहील.’
भारतविरुद्ध पहिला कसोटी सामना पुणे येथे २३ फेब्रुवारीपासून खेळल्या जाणार आहे. (वृत्तसंस्था)

आम्ही सिडनी कसोटी सामन्यात १३५ षटके फलंदाजी केली. भारतात आम्हाला १५० पेक्षा अधिक षटके खेळपट्टीवर तळ ठोकून मोठी धावसंख्या उभारावी लागेल. युवा खेळाडूंचा समावेश असलेल्या संघापुढे हे मोठे आव्हान राहील. खेळाडू फिट असल्यामुळे त्यांनी खेळपट्टीवर अधिक वेळ राहयला हवे. -डॅरेन लीमन, प्रशिक्षक

हा दौरा खडतर राहणार आहे. भारताविरुद्ध आम्हाला चमकदार कामगिरी करावी लागेल. आमच्या संघातील खेळाडूंना या दौऱ्याच्या निमित्ताने बरेच काही शिकण्याची संधी मिळणार आहे. २०१३ मध्ये भारत दौरा करणाऱ्या संघात स्मिथचा समावेश होता. दोन्ही देशातील खेळपट्ट्यांमध्ये मोठा फरक असतो. -स्टिव्हन स्मिथ, कर्णधार

...त्यासाठी चांगली कामगिरी करावी लागेल : डेव्हीड वॉर्नर

फॉर्मात असलेल्या भारताला आगामी कसोटी मालिकेत पराभूत करण्यासाठी परिस्थितीसोबत जुळवून घेत चांगली फलंदाजी करावी लागेल आणि २० बळी घ्यावे लागतील, अशी प्रतिक्रिया आॅस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नरने व्यक्त केली.
आॅस्ट्रेलियाने अलीकडे कसोटी मालिकेत पाकिस्तानचा ३-० ने धुव्वा उडवला. या चमकदार कामगिरीमुळे आॅस्ट्रेलिया संघाचा आत्मविश्वास उंचावलेला आहे, पण या संघाने आशियात सलग ९ कसोटी सामने गमावले आहेत. १९६० च्या दशकातील अखेरच्या वर्षांपासून त्यांना येथे केवळ एक मालिका जिंकता आली आहे.
वॉर्नर म्हणाला,‘आम्हाला सकारात्मक विचार करावा लागेल. येथे प्रदीर्घ वेळ फलंदाजी करण्याचा प्रयत्न करावा लागेल. सामना जिंकण्यासाठी २० बळी घेणे आवश्यक आहे. परिस्थितीसोबत लवकर जुळवून घेणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यासाठी कुठली सबब देता येणार नाही. फलंदाजी, गोलंदाजी किंवा क्षेत्ररक्षण या सर्वच विभागात छाप सोडणे आवश्यक आहे. एक योजना अपयशी ठरली तर दुसरी योजना तयार ठेवणे गरजेचे आहे.’
आॅस्ट्रेलियासाठी हा दौरा सोपा नाही. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ मायदेशात गेल्या १८ कसोटी सामन्यांपासून अपराजित आहे. अलीकडेच भारताने इंग्लंडचा ४-० ने पराभव केला. त्यात दोन सामन्यांत डावाच्या फरकाने विजय मिळवला.
वॉर्नर म्हणाला, आमचा संघ इंग्लंडच्या कामगिरीपासून प्रेरणा घेईल. इंग्लंडने पाचपैकी तीन कसोटी सामन्यांत चारशेपेक्षा अधिक धावा फटकावल्या.’

Web Title: Team India 'strong under the leadership of Kohli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.