टीम इंडियाचा विजयोत्सव!

By admin | Published: October 15, 2015 12:02 AM2015-10-15T00:02:36+5:302015-10-15T00:02:36+5:30

पराभवाच्या गर्तेत अडकलेल्या टीम इंडियाने अखेर दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा दुसरा एकदिवसीय सामना २२ धावांनी जिंकला.

Team India triumph! | टीम इंडियाचा विजयोत्सव!

टीम इंडियाचा विजयोत्सव!

Next

इंदूर : पराभवाच्या गर्तेत अडकलेल्या टीम इंडियाने अखेर दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा दुसरा एकदिवसीय सामना २२ धावांनी जिंकला. या विजयाचा शिल्पकार ठरला तो कर्णधार महेंद्रसिंह धोनी. टीकेचे झोड उठल्यानंतर धोनीने ‘कॅप्टन्स इनिंग’ खेळून आपल्या बॅटनेच उत्तर दिले. या निकालानंतर भारतीयांना इंदुरात विजयोत्सव साजरा केला. पुनरागमन करून टीम इंडियाने आता ५ सामन्यांच्या मालिकेत १-१ने बरोबरी साधली आहे.
कर्णधार धोनीने नाबाद ९२ धावांची खेळी केली. त्याची ही खेळी आणि त्यानंतर गोलदांजांनी केलेल्या धमाल कामगिरीच्या जोरावर टीम इंडियाने हा सामना जिंकला. टीम इंडियाच्या ५० षटकांत ९ बाद २४७ धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा संघ ४३.४ षटकांत २२५ धावांवर तंबूत परतला.
होळकर स्टेडियमवर रंगलेल्या या सामन्यात आफ्रिकेला ४२ चेंडूंत २७ धावांची आवश्यकता होती. अशा वेळी भुवनेश्वर कुमारने ४४व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर इम्रान ताहीर (९) आणि चौथ्या चेंडूवर मोर्नी मोर्केलला बाद करून भारताला विजयाच्या उंबरठ्यावर आणले. भारताकडून भुवनेश्वर कुमार, अक्षर पटेल यांनी प्रत्येकी ३, तर हरभजनसिंगने २ बळी घेतले. आफ्रिकेची सुरुवात चांगली झाली. हाशीम आमला आणि डिकॉक यांनी पहिल्या गड्यासाठी ४० धावांची भागीदारी केली. आमलाला चकवून अक्षर पटेलने पहिला ‘ब्रेक थ्रू’ मिळवून दिला. त्यानंतर डिकॉक (३४) बाद झाला. मात्र, ड्युमिनी आणि प्लेसिस यांनी तिसऱ्या गड्यासाठी ८२ धावांची भागीदारी केली. पटेलने ही जोडी फोडली. ड्युमिनीला २४व्या षटकात पायचित करून त्याने आफ्रिकेला मोठा धक्का दिला. त्यानंतर डिव्हिलियर्स १९, तर मिलर शून्यावर बाद झाला. त्यामुळे भारतीय संघाने सामन्यावर वर्चस्वर मिळविले होते.
त्याआधी, धोनीने (नाबाद ९२) चौफेर फटकेबाजी करून ८६ चेंडूंत ७ चौकार आणि ४ षटकार ठोकले. ‘कॅप्टन कूल’ने तळाच्या फलंदाजांसोबत अखेरच्या १० षटकांत ८२ धावा वसूल केल्या. भारताच्या ४०व्या षटकाअखेर ७ बाद १६५ धावा होत्या; पण हरभजनसिंग (२२)ने धोनीसमवेत ५६ धावांची भागीदारी करून २०० धावा फळ्यावर लावल्या.
आघाडीच्या फळीत अजिंक्य रहाणे याने ६३ चेंडूंत ५१ धावांचे योगदान देऊन सलग दुसरे अर्धशतक नोंदविले. शिखर धवन (२३) व रहाणे यांनी नंतर दुसऱ्या गड्यासाठी ५६ धावांची भागीदारी केली. विराट कोहली १२ धावा काढून धावबाद झाला. रहाणेदेखील अर्धशतक पूर्ण करताच इम्रान ताहीरला स्विप शॉट मारण्याच्या नादात त्रिफळाबाद झाला. अमित मिश्राचे स्थान घेणाऱ्या अक्षर पटेलने (१३) भारताच्या डावात पहिला षटकार खेचला. तो स्टेनच्या चेंडूवर पायचित झाला. भुवनेश्वरने (१४) धोनीसोबत सातव्या गड्यासाठी ४१ धावा केल्या.(वृत्तसंस्था)
>>कमी धावसंख्येच्या सामन्यात भारताचा विजय
याच खेळपट्टीवर २०११मधील सामन्यात वीरेंद्र सेहवागच्या २२० धावांच्या जोरावर भारताने वेस्ट इंडीजविरुद्ध ४१८ धावांचा डोंगर उभारला होता़ २००८मध्ये युवराजने इंग्लडविरुद्ध १८१ धावांची खेळी केली होती़ त्यामुळे फलंदाजांचे नंदनवन म्हटल्या गेलेल्या या खेळपट्टीवर २४७ धावांचे आव्हान किरकोळ असे वाटत होते; पण खेळपट्टी दुसऱ्या डावात रंग बदलेल अशी अपेक्षा होती़, ती खरी ठरली़ भारताच्या फिरकीपटूंनी ५ बळी घेऊन विजय मिळवून दिला़
इंदूरच्या होळकर स्टेडियमवर यापूर्वी झालेल्या ३ सामन्यांमध्ये धावांचा पाऊस पडला होता़ या तिन्ही लढती भारताने जिंकल्या होत्या़ फलंदाजांचे नंदनवन असलेल्या या खेळपट्टीवर भारत अडीचशेच्या आत गारद झाला, तरी यंदा खेळपट्टीने रंग बदलले तरी सामन्यांचा निकाल मात्र कायम राहिला़ यापूर्वीचा इतिहास पाहिल्यावर धोनीने नाणेफेक जिंकून फलंदाजी घेतली़ तेव्हा ३००चा पल्ला गाठण्याच्या अपेक्षा ठेवल्या गेल्या़ पण, पाठोपाठ बळी पडत गेले, तेव्हा मागील सामन्याचा अनुभव लक्षात घेऊन प्रेक्षकांनी अफ्रिका ही धावसंख्या सहज पार करेल़ शेवटच्या १० षटकांत १०० धावा देणारे गोलंदाज इतका कमी धावसंख्येचे संरक्षण करू शकतील, असे कोणालाही वाटत नव्हते़
>>>>>धावफलक
भारत : रोहित त्रि. गो. रबाडा ३, धवन झे. ड्युमिनी गो. मोर्केल २३, रहाणे त्रि. गो. ताहीर ५१, कोहली धावबाद १२, धोनी नाबाद ९२, रैना झे. डिकॉक गो. मोर्केल ०, अक्षर पटेल पायचित गो. स्टेन १३, भुवनेश्वर त्रि. गो. ताहीर १४, हरभजनसिंग झे. डिकॉक गो. स्टेन २२, यादव झे. डिकॉक गो. स्टेन ४, मोहित नाबाद ०, अवांतर : १३, एकूण : ५० षटकांत ९ बाद २४७ धावा. गोलंदाजी : स्टेन १०-०-४९-३, रबाडा १०-१-४९-१, मोर्केल १०-०-४२-२, ड्युमिनी ९-०-५९-०, ताहीर १०-१-४२-२, बेहार्डियन १-०-४-०.
द. आफ्रिका : क्विंटन डी कॉक झे. मोहित गो. हरभजन ३४, हाशीम आमला यष्टीचित धोनी गो. पटेल १७, फाफ डू प्लेसिस झे. कोहली गो. पटेल ५१, जेपी ड्युमिनी पायचीत गो. पटेल ३६, एबी डीव्हिलियर्स झे. कोहली गो. मोहित १९, डेव्हिड मिलर झे. धोनी गो. भुवनेश्वर ०, फरहान बेहारडिन झे. धोनी गो. हरभजन १८, डेल स्टेन झे. कोहली गो. यादव १३, रबाडा नाबाद १९, इम्रान ताहीर झे. धोनी गो. भुवनेश्वर ९, मॉर्ने मॉर्केल झे. रैना गो. भुवनेश्वर ४, अवांतर ५, एकूण : ४३.३ षटकांत सर्व बाद २२५. गोलंदाजी : भुवनेश्वर ८.४-०-४१-३, यादव ८-०-५२-१, हरभजन १०-०-५१-२, पटेल १०-०-३९-३, मोहित ५-०-२१-१, रैना २-०-१८-०.
>>टर्निंग पॉइंट...
३३व्या षटकातील पहिल्या चेंडूवर मोहित शर्माच्या गोलंदाजीवर एबी डिव्हिलियर्सचा विराट कोहलीने डाव्या बाजूला हवेत झेप घेऊन झेल घेतला...

Web Title: Team India triumph!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.