टीम इंडिया विजयासाठी खेळणार

By admin | Published: October 1, 2015 10:49 PM2015-10-01T22:49:13+5:302015-10-01T22:49:13+5:30

पाहुण्या द. आफ्रिकेविरुद्धच्या दीर्घ मालिकेला आज शुक्रवारपासून सुरुवात होत असून, पहिल्या टी-२० सामन्याद्वारे टीम इंडिया विजयी श्रीगणेशा करण्याच्या इराद्याने उतरणार आहे.

Team India will play for victory | टीम इंडिया विजयासाठी खेळणार

टीम इंडिया विजयासाठी खेळणार

Next

धरमशाला : पाहुण्या द. आफ्रिकेविरुद्धच्या दीर्घ मालिकेला आज शुक्रवारपासून सुरुवात होत असून, पहिल्या टी-२० सामन्याद्वारे टीम इंडिया विजयी श्रीगणेशा करण्याच्या इराद्याने उतरणार आहे.
भारत ‘अ’कडून दिल्लीत द. आफ्रिकेला सराव सामन्यात पराभवाचा धक्का बसल्यानंतर हिमाचल प्रदेश क्रिकेट संघटनेच्या हिरव्यागार मैदानावर थंड वातावरणात पाहुण्या संघाच्या वेगवान गोलंदाजांना वातावरणाची साथ मिळण्याची शक्यता आहे. कसोटी क्रिकेटला अलविदा केल्यानंतर महेंद्रसिंह धोनी तीन महिन्यांनी मैदानावर परतला. ही मालिका भारतात पुढील वर्षी आयोजित टी-२० विश्वचषकाच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जाते. संघात श्रीनाथ अरविंदसारख्या नवख्या खेळाडूंचा समावेश असून, धोनीची नजर त्याची कामगिरी पारखण्यावर असेल. तीन टी-२० सामन्यांशिवाय भारताला या मालिकेत पाच वन डे आणि चार कसोटी सामनेदेखील खेळायचे आहेत.
ही मालिका अर्थात दोन्ही संघांतील फलंदाजांसाठी चढाओढ असेल. आफ्रिकेकडे कर्णधार फाफ डू प्लासिस व एबी डिव्हिलियर्ससारखे फलंदाज आहेत. शिवाय हाशिम अमला, डेव्हिड मिलर आणि जे. पी. ड्युमिनी आहेत. आफ्रिकेचे बरेच खेळाडू आयपीएलमध्ये असल्याने भारतातील परिस्थिती त्यांना नवी नाही. डुप्लासिस स्वत: धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपरकिंग्सकडून खेळतो. भारताविरुद्ध अनेक सामने खेळलेला मायकेल हसी या संघाच्या कोचिंग स्टाफमध्ये आहे. तोदेखील आयपीएलमध्ये धोनीचा सहकारी राहिला. भारताची भिस्तदेखील फलंदाजांवर राहील. शिखर धवन जखमेतून सावरून बांगलादेशविरुद्ध शतक ठोकून फॉर्ममध्ये परतला.
---------------
हेड-टू- हेड
भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये २००६ ते १४ दरम्यान आठ टी-२० सामने झाले आहेत. यांमध्ये भारताने ६ लढतींमध्ये विजय नोंदविला असून २ सामन्यांत भारताला पराभव पत्करावा लागला आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आतापर्यंत भारताकडून टी-२० मध्ये फक्त सुरेश रैनाच शतकी (१०१ धावा, २ मे २०१० रोजी ग्रोस इजलेट येथे) खेळी करू शकला आहे. त्याने ६० चेंडूंत ९ चौकार व ५ षटकार ठोकले होते. विराट कोहलीने नाबाद ७२, रोहित शर्माने ५३, महेंद्रसिंह धोनीने ४५, अजिंक्य रहाणेने ३२ धावा केल्या आहेत.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताकडून आर. आश्विनने २०११-१४ दरम्यान सर्वाधिक ६
विकेट घेतल्या आहेत. सुरेश रैनाने २००६-१४ दरम्यान ३ बळी घेतले आहेत.
भारताविरुद्ध दक्षिण आफ्रिकेकडून आतापर्यंत एबी डिव्हिलियर्सने ६३, जेपी ड्युमिनीने नाबाद ४५, फाफ डु प्लेसिसने ६५, डेव्हिड मिलरने नाबाद २३ धावा केल्या आहेत.
-----------
एचपीसीए मैदानावर दवबिंदूंचा परिणाम होऊ शकतो. हे टाळण्यासाठी सामन्याच्या वेळी चार सुपर सोपर्स सज्ज ठेवण्यात आल्याची माहिती क्युरेटर एस. चौहान यांनी दिली. ही खेळपट्टी जलद असल्याने फलंदाज व गोलंदाजांना समान संधी असेल. ४० षटकांत खेळपट्टीचे स्वरूप मात्र बदलणार नाही. मैदानावर ७५ यार्डांची हिरवीगार सीमारेषा आहे.
-----------
वेगवान गोलंदाज ही द. आफ्रिका संघाची ताकद असली, तरी सामना जिंकून देणारे फिरकीपटूदेखील आहेत. इम्रान ताहीर, जेपी ड्युमिनी आणि एडी लेई यांच्या खांद्यावर फिरकीची जबाबदारी असेल. खेळपट्टी वेगवान असल्याने टी-२० साठी आदर्श असेल.
- फाफ डु प्लेसिस,
कर्णधार द. आफ्रिका
------------
उभय संघ यातून निवडणार
भारत : महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), श्रीनाथ अरविंद, आर. आश्विन, स्टुअर्ट बिन्नी, शिखर धवन, हरभजनसिंग, विराट कोहली, भुवनेश्वर कुमार, अमित मिश्रा, अक्षर पटेल, अजिंक्य रहाणे, सुरेश रैना, अंबाती रायुडू,
मोहित शर्मा आणि रोहित शर्मा.
दक्षिण आफ्रिका : फाफ डु प्लेसिस (कर्णधार), काइल एबोट, हाशिम अमला, फरहान बेहार्डियेन, क्वींटन डिकॉक, मर्चंट डिलांगे, एबी डिव्हिलियर्स,
जेपी ड्युमिनी, इम्रान ताहिर, एडी लेइ, डेव्हिड मिलर, एल्बी मोर्कल, ख्रिस मॉरिस, कागिसो रबाडा आणि खाया झोंडो.

Web Title: Team India will play for victory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.