टीम इंडिया जोमात, झिम्बाब्वेविरुद्धची मालिका खिशात
By admin | Published: July 12, 2015 04:32 PM2015-07-12T16:32:17+5:302015-07-12T20:34:56+5:30
कर्णधार अजिंक्य रहाणे व मुरली विजयच्या दमदार सुरुवातीनंतरही झिम्बाब्वेच्या गोलंदाजांना भारताला २७१ धावांवर रोखण्यात यश आले.
ऑनलाइन लोकमत
हरारे, दि. १२ - मुंबईकर अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली झिम्बाब्वे दौ-यावर गेलेल्या भारतीय संघाने एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत दिमाखदार विजय मिळवला आहे. दुस-या एकदिवसीय सामन्यात भारताने झिम्बाब्वेचा ६२ धावांनी पराभव करत भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे.
झिम्बाब्वे विरुद्ध भारतामधील दुस-या एकदिवसीय सामन्यात झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारतातर्फे अजिंक्य रहाणे व मुरली विजय ही जोडी सलामीला उतरली. या जोडीने भारताला शतकी सलामी करुन दिली. भारताच्या ११२ धावा झाल्या असताना अजिंक्य रहाणे ६३ धावांवर बाद झाला. मुरली विजय ७२ धावांवर बाद झाला त्यावेळी भारताच्या २ बाद १५९ धावा झाल्या होत्या. अंबाटी रायडू व मनिष तिवारी या जोडीने ४४ धावांची भागीदार रचत भारताला २०० चा टप्पा गाठून दिला. त्यानंतर रॉबिन उथप्पा १३, स्टुअर्ट बिन्नी २५ व केदार जाधव १६ धावांर बाद झाल्याने भारताला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. शेवटच्या १० षटकांत भारताला फक्त ७२ धावाच करता आल्या. झिम्बाब्वेचा गोलंदाज नेव्हिले मेजिवाने सर्वाधिक चार विकेट घेत भारतीय फलंदाजीला सुरुंग लावला.
पहिल्या वन डेत भारतीय गोलंदाजांचा खरपूस समाचार घेणारे झिम्बाब्वेचे फलंदाज आजच्या सामन्यात सपशेल अपयशी ठरले. सलामीची जोडी अवघ्या २३ धावांवर फुटली. झिम्बाब्वेचे तीन फलंदाज अवघ्या ४३ धावांमध्येच तंबूत परतले. सलामीवीर चामू चिभाभाचा (७२ धावा) अपवाद वगळता अन्य एकही फलंदाज भारतासमोर तग धरु शकला नाही. झिम्बाब्वेचा डाव ४९ षटकांत २०९ धावांवर संपुष्टात आला. भारतातर्फे भुवनेश्वर कुमारने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. तर हरभजन सिंगने १० षटकात २९ धावा देत एक विकेट घेतल्या. भारतीय गोलंदाजांच्या अचूक मा-याने झिम्बाब्वेच्या फलंदाजांना लगाम लावला.