टीम इंडियाचा ‘अश्वमेध’ सुसाट

By admin | Published: February 14, 2017 12:19 AM2017-02-14T00:19:15+5:302017-02-14T00:19:15+5:30

पाटा खेळपट्टीवर भारतीय गोलंदाजांनी संयम दाखवित सोमवारी पाचव्या दिवशी संपलेल्या एकमेव कसोटी सामन्यात बांगलादेशचा २०८ धावांनी पराभव

Team India's 'Ashwamedh' suasat | टीम इंडियाचा ‘अश्वमेध’ सुसाट

टीम इंडियाचा ‘अश्वमेध’ सुसाट

Next

हैदराबाद : पाटा खेळपट्टीवर भारतीय गोलंदाजांनी संयम दाखवित सोमवारी पाचव्या दिवशी संपलेल्या एकमेव कसोटी सामन्यात बांगलादेशचा २०८ धावांनी पराभव केला आणि १९ व्या कसोटी सामन्यापर्यंत अपराजित राहण्याचा पराक्रम नोंदविला. भारतीय कर्णधार विराट कोहलीला सामनावीरचा पुरस्कार देण्यात आला.
भारताने बांगलादेशपुढे विजयासाठी ४५९ धावांचे कठीण आव्हान ठेवले होते. लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशचा दुसरा डाव १००.३ षटकांत २५० धावांत संपुष्टात आला. भारताचा मायदेशातील यंदाच्या मोसमातील हा आठवा कसोटी विजय ठरला. भारताने एमकेव अनिर्णीत सामना राजकोटमध्ये इंग्लंडविरुद्ध खेळला होता. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने सलग सहाव्या मालिकेत विजय मिळविला. २०१५ मध्ये श्रीलंकेविरुद्ध या मोहिमेची सुरुवात झाली होती. भारतीय संघ १९ कसोटी सामन्यांपासून अपराजित आहे. यापूर्वी आॅगस्ट २०१५ मध्ये गॉल येथे श्रीलंकेविरुद्ध भारताला अखेरचा पराभव स्वीकारावा लागला होता. (वृत्तसंस्था)
आयसीसी क्रमवारीत नवव्या क्रमांकावर असलेला बांगलादेश संघ या लढतीत चार दिवस व दोन सत्र झुंज देईल, याचा कुणी विचार केला नव्हता. बांगलादेशने दोन्ही डावात एकूण २३० षटके फलंदाजी केली.
बांगलादेशला पराभव टाळण्यासाठी अखेरच्या दोन सत्रांत ५८ षटके खेळायची होती; पण उपाहारानंतर ईशांतने चांगला स्पेल करताना पाहुण्या संघाच्या आशेवर पाणी फेरले.
ईशांतने सुरुवातीला शब्बीर रहमानला (२२) पायचित केल्यानंतर महमुदुल्लाहला पूलचा फटका मारण्यास प्रवृत्त केले. महमुदुल्लाह फाईन लेग सीमारेषेवर तैनात असणाऱ्या भुवनेश्वरकडे झेल देत माघारी परतला आणि बांगलादेशचा पराभव निश्चित झाला.
कर्णधार मुशफिकर रहीम (२३) चुकीचा फटका खेळून बाद झाला. महमुदुल्लाहसोबत त्याने पाचव्या विकेटसाठी ५९ धावांची भागीदारी केली.
मेहदी हसन मिराजला (२३) जडेजाने माघारी परतविले. तैजुल इस्लामला (६) बाद करीत जडेजाने डावातील चौथा बळी घेतला. अश्विनने तास्किन अहमदला पायचित करीत भारताला विजयावर शिक्कामोर्तब करून दिले.
भारतीय गोलंदाजही प्रशंसेस पात्र आहेत. खेळपट्टीकडून कुठल्याही प्रकारची मदत नसताना संयम दाखवित त्यांनी प्रतिस्पर्धी संघाला दोनदा गारद केले.
फिरकीपटू रवींद्र जडेजाने ३७ षटकांत ७८ धावांत ४, तर आर. अश्विनने ३०.३ षटकांत ७३ धावांत ४ बळी घेतले. ईशांत शर्माने १३ षटकांत ४० धावांच्या मोबदल्यात दोन फलंदाजांना माघारी परतविले.
भारतीय खेळाडूंनी विजयाचा जल्लोष न करता विजयाची आठवण म्हणून काही खेळाडूंनी बेल्स घेतल्या. विशेष म्हणजे सामन्याच्या पाचव्या दिवशीही खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल होती.
धावफलक
भारत प. डाव ६ बाद ६८७ (घोषित). बांगलादेश प. डाव ३८८. भारत दु. डाव ४ बाद १५९ (घोषित). बांगलादेश दुसरा डाव :- तामिम इक्बाल झे. कोहली गो. अश्विन ०३, सौम्या सरकार झे. रहाणे गो. जडेजा ४२, मोमिनुल हक झे. रहाणे गो. अश्विन २७, महमुदुल्लाह झे. भुवनेश्वर गो. ईशांत ६४, शाकिब-अल-हसन झे. पुजारा गो. जडेजा २२, मुशफिकर रहीम झे. जडेजा गो. अश्विन २३, शब्बीर रहमान पायचित गो. ईशांत २२, मेहदी हसन मिराज झे. साहा गो. जडेजा २३, कामरूल इस्लाम रब्बी नाबाद ०३, तैजुल इस्लाम झे. राहुल गो. जडेजा ०६, तास्किन अहमद पायचित गो. अश्विन ०१. अवांतर (१४). एकूण १००.३ षटकांत सर्वबाद २५०. बाद क्रम : १-११, २-७१, ३-७५, ४-१०६, ५-१६२, ६-२१३, ७-२२५, ८-२४२, ९-२४९, १०-२५०. गोलंदाजी : भुवनेश्वर ८-४-१५-०, अश्विन ३०.३-१०-७३-४, ईशांत १३-३-४०-२, उमेश १२-२-३३-०, जडेजा ३७-१५-७८-४.

Web Title: Team India's 'Ashwamedh' suasat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.