टीम इंडियाची काट्याची टक्कर

By admin | Published: February 21, 2015 11:52 PM2015-02-21T23:52:52+5:302015-02-21T23:52:52+5:30

पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर मिळालेल्या मोठ्या विजयामुळे आत्मविश्वास दुणावलेला भारतीय संघ उद्या रविवारी विश्वचषकात द. आफ्रिकेविरुद्ध विजय मिळविण्यास सज्ज झाला आहे.

Team India's bite collision | टीम इंडियाची काट्याची टक्कर

टीम इंडियाची काट्याची टक्कर

Next

पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर मिळालेल्या मोठ्या विजयामुळे आत्मविश्वास दुणावलेला भारतीय संघ उद्या रविवारी विश्वचषकात द. आफ्रिकेविरुद्ध विजय मिळविण्यास सज्ज झाला आहे.
भारत आफ्रिकेकडून १९९२, १९९९ आणि २०११ मधील विश्वचषक स्पर्धेत पराभूत झाला होता. त्यामुळे या सामन्यामध्ये भारत विजयासाठी प्राण पणाला लावणार. धोनी उद्या नाणेफेक जिंकून काय निर्णय घेतो, याकडे लक्ष लागले असेल. स्पर्धेतील साखळी सामना असल्याने अतिमहत्त्व असणार नाही. पण ‘ब’ गटात हा सामना जिंकणारा संघ अव्वल स्थानावर राहील. एमसीजीवर होणाऱ्या या सामन्यात डिव्हिलियर्सच्या अनुभवी संघाला धोनीच्या नेतृत्वाखालील
युवा संघाच्या तुलनेत विजयाचा प्रबळ दावेदार मानले जात आहे.
खेळाडूंचा विचार केल्यास आफ्रिकेचा संघ बलाढ्य वाटतो. झिम्बाब्वेविरुद्ध ६२ धावांनी मिळविलेल्या विजयात आफ्रिकेचे आघाडीचे सहा फलंदाज अपयशी ठरले. तरीही ड्युमिनी आणि डेव्हिड मिलर यांनी सामन्याचे चित्र पालटवण्यात मोलाची भूमिका वठविली. आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथ याने भारताच्या भक्कम फलंदाजीविरुद्ध द. आफ्रिकेची सर्वोत्तम गोलंदाजी असा
सामना होण्याची शक्यता वर्तविली असली तरी, डिव्हिलियर्सच्या नेतृत्वाखालील दिग्गज फलंदाजांपुढे भारताच्या अनुभवहीन माऱ्याची परीक्षा राहणार आहे.
डिव्हिलियर्सने ३१ चेंडंूत जलद शतकाची नोंद केली. विराटने गत सामन्यात २२ वे वन डे शतक ठोकले, शिवाय सुरेश रैना आणि शिखर धवन यांनीदेखील फॉर्म परत मिळाल्याचे संकेत दिले; तरीही या तिघांना प्रतिस्पर्धी माऱ्याला चाणाक्षपणे खेळावेच लागेल. डेल स्टेन आणि मॉर्केलसारखे सर्वोत्कृष्ट गोलंदाज एमसीजीच्या धावपट्टीवर टीम इंडियाची ५० षटके परीक्षा घेणार आहेत. व्हर्नोन फिलॅण्डर हादेखील उपयुक्त गोलंदाज सोबतीला राहील. आधी सचिन विरुद्ध स्टेन अशी लढत गाजायची.
उद्या कोहलीविरुद्ध स्टेन ही लढत कशी गाजेल, हे पाहणे रंजक ठरेल. भारतीयांना इम्रान ताहिरचे लेगस्पिन चेंडू खेळण्यास अडचण जाऊ नये. टीम इंडिया काहीबाबतीत चिंतेत आहे. याशिवाय ‘डेथ ओव्हर’मध्ये विकेट फेकण्याची चिंता आहेच. गेल्या सामन्यात २३ धावांत भारताचे पाच गडी बाद झाले होते.
याशिवाय हाशीम अमला, फाफ डू प्लेसिस, डिव्हिलियर्स, मिलर आणि ड्युमिनी यांना बाद करण्याचेही आव्हान राहील. उमेश यादव, मोहीत शर्मा आणि मोहम्मद शमी यांनी पाकविरुद्ध अनियंत्रित मारा केला. ही बेशिस्त टाळण्याचेही तिघांपुढे मोठे आव्हान राहील. रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन या फिरकी गोलंदाजांवर भारताला आशा
आहेत. भारतीय फिरकीपटूंनी २०
षटके शिस्तबद्ध मारा करीत आफ्रिकेच्या फलंदाजांंवर वर्चस्व गाजविल्यास, सामन्याचे चित्र
पालटू शकते.

धोनीने केली खेळपट्टीची पाहणी
महेंद्रसिंह धोनीने सराव सत्रानंतर बारकाईने मुख्य खेळपट्टीची पाहणी केली. त्यानंतर खेळपट्टीवर हिरवळ कमी असल्याचे निरक्षण त्याने नोंदविले.

या मैदानावरील कामगिरी
४रोहित शर्माने या मैदानावर १८ जानेवारी २0१५ रोजी आॅस्ट्रेलियाविरूद्ध १३९ चेंडूत ९ चौकार व ४ षटकारांच्या सहाय्याने १३८ धावांची खेळी केली होती.
४एबी डी. विलियर्सने या मैदानावर २१ नोव्हेंबर २0१४ रोजी आॅस्ट्रेलियाविरूद्ध ८८ चेंडुत ६ चौकारांच्या सहाय्याने ९१ धावांची खेळी केली होती.

भारत : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार/यष्टीरक्षक), रवीचंद्रन अश्विन, स्टुअर्ट बिन्नी, शिखर धवन, रविंद्र जडेजा, विराट कोहली, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, अक्षर पटेल, अजिंक्य रहाणे, सुरेश रैना, अंबाती रायडू, इशांत शर्मा, रोहित शर्मा, उमेश यादव.

दक्षिण आफ्रिका : एबी डिव्हिलियर्स (कर्णधार), हाशिम आमला (उपकर्णधार), कायले अ‍ॅबॉट, फरहान बेहार्डीन, क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), जीन पॉल डुमीनी, फा डू प्लेसिस, इमरान ताहीर, डेव्हिड मिलर, मॉर्ने मॉर्केल, वॅन पार्नेल, अ‍ॅरोन फंगिसो, वेर्नोन फिलेंडर, रिली रोसोवू, डेल स्टेन

एक दिवसीय लढतींमध्ये भारत व दक्षिण आफ्रिका यांच्यात ७० लढती झाल्या असून २५ सामन्यांमध्ये भारताने तर ४२ सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेने विजय नोंदविलेला आहे. ३ सामन्यांचा निकाल लागला नाही.
विश्वचषक स्पर्धेत हे दोन्ही संघ तीन वेळा समोरासमोर ठाकले आहे पण भारताला तिन्ही वेळेस पराभव पत्करावा लागला आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात विजय मिळविल्यास
टीम इंडियाचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल़ त्यामुळे आम्ही या सामन्यासाठी विशेष तयारी केली आहे़
- विराट कोहली, उपकर्णधार

टी-टू आणि टी-३ लेन!
मेलबर्न शहरात वाहतुकीची कोंडी होऊ नये, यासाठी वेगवेगळ्या लेन्स तयार करण्यात आल्या आहेत. या लेन्सना टी-टू आणि टी-३ लेन अशी नावे देण्यात आली. टी-२ लेनवरून दोन किंवा त्यापेक्षा कमी संख्येने असलेल्या व्यक्ती मोटारबाईक, सायकल किंवा कार यांना परवानगी आहे. टी-३ लेनवरून तीन वा त्यापेक्षा अधिक व्यक्तींंचा समावेश असलेली वाहने धावू शकतात. ज्या मार्र्गावर तीन लेन्स आहेत त्यातील एका लेनचा वापर विशेष व्यक्तींंसाठी असतो. सरकारने ही व्यवस्था वाहतूक नियंत्रित करण्यासाठी केली आहे.

Web Title: Team India's bite collision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.