टीम इंडियाचा मौके पे चौका
By admin | Published: February 23, 2015 01:16 AM2015-02-23T01:16:59+5:302015-02-23T01:20:17+5:30
सलामीवीर शिखर धवनची सर्वाेत्कृष्ट खेळी (१३७) आणि अजिंक्य रहाणेचा हल्लाबोल (७९) यांच्या बळावर तगड्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय संघ
मेलबर्न : सलामीवीर शिखर धवनची सर्वाेत्कृष्ट खेळी (१३७) आणि अजिंक्य रहाणेचा हल्लाबोल (७९) यांच्या बळावर तगड्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय संघ जिंकला तो ‘शान से’. उल्लेखनीय म्हणजे, विश्वचषकाच्या इतिहासात आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताला विजयाची चव चाखता आली नव्हती. मात्र, रविवारच्या सामन्यात धोनी सेनेने मौके पे चौका मारला. त्यांनी आफ्रिकेवर तब्बल १३० धावांनी मात केली. या विजयामुळे भारतीयांना फटाके उडवण्याचा ‘मौका’ मिळाला.
शिखर धवनची दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विक्रमी खेळी आणि त्याच्या विराट कोहली (४६), अजिंक्य रहाणे (७९) यांच्यासोबत शतकी भागीदाऱ्यांमुळे भारताने निर्धारीत ५० षटकांत ७ बाद ३०७ धावा केल्या होत्या. तीनशे धावांच्या डोंगरामुळेच आफ्रिकेवर सुरुवातीपासून दबाव होता आणि ते त्यातून शेवटपर्यंत बाहेर पडू शकले नाही. त्यांचा संघ ४०.२ षटकांत १७७ धावांत गारद झाला. याबरोबरच भारताने विश्वचषकात सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. धावांचा विचार करता हा भारताचा तिसरा सर्वात मोठा विजय आहे. १४६ चेंडूंत १६ चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने १३७ धावा करणारा शिखर धवन हा सामनावीर ठरला. भारताकडून आश्विनने ३, मोहम्मद शमी आणि मोहित शर्मा यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.
लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या आफ्रिकेची सुरुवात खराब झाली. क्विंटन डी कॉक (७), हाशिम आमला (२२) हे झटपट बाद झाले. तेव्हा त्यांची धावसंख्या ४० एवढी होती.कर्णधार डिव्हिलीयर्स (३०) आणि फाफ डू प्लेसिस (५५) यांनी तिसऱ्या गड्यासाठी ६८ धावांची भागीदारी केली. मात्र, मोहित शर्माच्या शानदार थ्रोने डिव्हिलीयर्सची खेळी संपुष्टात आली आणि येथूनच आफ्रिकन संघाची पडझड सुरू झाली. मोहितने आक्रमक सलामीवीर आमला आणि प्लेसिस यांना तर कॉक आणि डेल स्टेन यांना शमीने तंबूत पाठवले. रवींद्र जडेजाने ताहिरला पायचित करीत आफ्रिकेचा डाव संपवला. पार्नेल १७ धावांवर नाबाद राहिला.
त्याआधी, कर्णधार धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय फलंदाजांनी सार्थ ठरवला. धवनने कारकिर्दीतील सातवे शतक पूर्ण केले. धवनसोबत विराट कोहली, आणि अजिंक्य रहाणे यांने अर्धशतकी खेळी करीत मोठे योगदान दिले.सलामवीर रोहित शर्मा शून्यावर बाद झाला. सुरेश रैना (६), महेंद्रसिंग धोनी (१८) तर रवींद्र जडेजा दोन धावांवर धावचित झाला. (वृत्तसंस्था)