टीम इंडियाचा जमैकात कसून सराव
By admin | Published: July 29, 2016 03:20 AM2016-07-29T03:20:39+5:302016-07-29T03:20:39+5:30
कडक ऊन्ह आणि दमट वातावरणाशी एकरूप होता यावे, यादृष्टीने टीम इंडियाने गुरुवारी सकाळी सबिना पार्कमध्ये नेटवर अनेक तास घाम गाळला. सर्वच खेळाडूंनी सरावासह
जमैका : कडक ऊन्ह आणि दमट वातावरणाशी एकरूप होता यावे, यादृष्टीने टीम इंडियाने गुरुवारी सकाळी सबिना पार्कमध्ये नेटवर अनेक तास घाम गाळला. सर्वच खेळाडूंनी सरावासह कठोर व्यायामदेखील केला.
नियमित व्यायामानंतर खेळाडूंनी नेटमध्ये फलंदाजी आणि गोलंदाजीत हात आजमावला. रिद्धिमान साहा याने विशेषत: यष्टिरक्षण करण्यास पसंती दिली. मुरली विजय हा देखील जखमी अंगठ्यातून सावरलेला दिसला. त्याने हलका सराव केला.
डावखुरा फलंदाज शिखर धवन याने सर्वाधिक वेळ फलंदाजी केली. नंतर त्याने नेटवर थ्रोचे धडे घेतले. दुसऱ्या कसोटीसाठी वापरण्यात येणारी खेळपट्टी तीन दिवसांआधीच हिरवीगार दिसत आहे. कठोर सरावामुळे वातावरणाशी एकरूप होण्यास मदत होईल, असे फिरकीपटू अमित मिश्रा याने सरावानंतर सांगितले. येथे आधीच्या तुलनेत अधिक कडक ऊन आणि दमटपणा असल्याचे मिश्राचे मत होते. सामना सुरू होण्यास वेळ असल्याने मैदान कर्मचारी गवत काढतात का, याकडे भारतीय संघ व्यवस्थापनाचे लक्ष लागले आहे. (वृत्तसंस्था)