टीम इंडियाची कामगिरी विश्वविजेत्याला साजेशी
By admin | Published: February 23, 2015 11:58 PM2015-02-23T23:58:29+5:302015-02-23T23:58:29+5:30
भारतीय संघ वर्ल्ड चॅम्पियन संघाला साजेशी कामगिरी करीत आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या लढतीत नाणेफेक जिंकण्यापासून खेळाच्या प्रत्येक
भारतीय संघ वर्ल्ड चॅम्पियन संघाला साजेशी कामगिरी करीत आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या लढतीत नाणेफेक जिंकण्यापासून खेळाच्या प्रत्येक विभागात भारतीय संघाने वर्चस्व गाजवले. शिखर धवनला सूर गवसला आणि दक्षिण आफ्रिकेसाठी सर्व मार्ग बंद झाले. दक्षिण आफ्रिका संघाला मी दावेदार म्हणून बघत होतो; पण भारताविरुद्धच्या लढतीत त्यांची कामगिरी पाहिल्यानंतर माझ्या मनात शंका निर्माण झाली. त्यांच्याही मनात असाच विचार आला असेल. भारतीय संघाचा विचार करता टीम इंडियाला आॅस्ट्रेलियात जवळजवळ दोन महिने घालविण्याचा लाभ मिळत आहे. भारतीय संघाला येथील परिस्थितीची चांगली माहिती झाली आहे.
भारतीय संघाची फलंदाजी सकारात्मक भासत आहे. माझ्या मते अजिंक्य रहाणे परिपूर्ण फलंदाज आहे. मला त्याची फलंदाजी बघताना आनंद मिळतो. ज्या वेळी भारतीय संघ फलंदाजी करीत होता, त्या वेळी एकही कमकुवत बाब निदर्शनास आली नाही. २०१२ नंतर महेंद्रसिंह धोनी ‘स्लॉग ओव्हर्स’साठी उपयुक्त खेळाडू ठरत आहे. माझ्या मते या कालावधीत त्याने दमदार स्ट्राइक रेट राखताना किमान ७७ षटकार ठोकले आहेत. त्यानंतरही त्याच्याविरुद्ध गोलंदाजी करताना फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाला सर्कलमध्ये ठेवण्यात येत आहे. धोनी आखूड टप्प्याच्या चेंडूवर पुल व हुकचे फटके सहज खेळतो; तरी गोलंदाज त्यापासून धडा घेत नाहीत, हे विशेष. धोनी सहजपणे प्रतिस्पर्धी संघासाठी कुठलीच संधी ठेवत नाही.
भारतीय संघ क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरला त्या वेळी फिरकीपटूंनी चमकदार कामगिरी केली. मला उमेश यादव, मोहम्मद शमी आणि मोहीत शर्मा यांचा स्पेल विशेष आवडला. त्यांना त्यांची जबाबदारी चांगली ठाऊक आहे. त्यांनी तळाच्या फलंदाजांविरुद्ध बाऊन्सरचा चांगला वापर केला. दक्षिण आफ्रिका संघाच्या कामगिरीमुळे निराश झालो. भारतीय संघ प्रतिष्ठेच्या स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करतो, कारण खेळाडूंना स्वत:वर विश्वास आहे. खेळाडूंना माहीत आहे, की आपण चॅम्पियन आहोत. मेलबर्न मैदानावर सामना असला तरी ही लढत मुंबई, दिल्ली किंवा कोलकाता येथे होत असल्याचा भास होत होता. एक खेळाडू म्हणून अशा वातावरणात प्रेरणा मिळते. भारताने पहिल्या लढतीत अॅडलेडमध्ये पाकिस्तानचा पराभव केला आणि त्यानंतर जेतेपदाचा दावेदार असलेल्या दक्षिण आफ्रिका संघावर १३० धावांनी विजय मिळविला. या दोन विजयांमुळे भारतीय संघाचे मनोधैर्य निश्चितच उंचावले असेल.
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारण्याचा सकारात्मक निर्णय घेतला. याच मैदानावर इंग्लंडने नाणेफेक जिंकून यजमान संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. यावरून त्यांची नकारात्मक वृत्ती दिसून आली. खेळपट्टी ‘ग्रीन टॉप’ नसेल तर कर्णधाराने नेहमीच प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घ्यावा, असा मित्रत्वाचा सल्ला मी सर्व कर्णधारांना देतो. (टीसीएम)