टीम इंडियाचं मालिका विजयाचं लक्ष्य, निर्णायक सामन्याला थोड्याच वेळात सुरूवात
By admin | Published: July 6, 2017 05:57 PM2017-07-06T17:57:07+5:302017-07-06T17:57:07+5:30
वेस्ट इंडिजकडून चौथ्या एकदिवसीय सामन्यात दारुण पराभवानंतर टीम इंडियावर चौफेर टीका झाली. टीकेचे लक्ष्य ठरलेला भारतीय संघ आज पाचव्या आणि अखेरच्या वन डेमध्ये
Next
>ऑनलाइन लोकमत
किंग्स्टन, दि. 6 - वेस्ट इंडिजकडून चौथ्या एकदिवसीय सामन्यात दारुण पराभवानंतर टीम इंडियावर चौफेर टीका झाली. टीकेचे लक्ष्य ठरलेला भारतीय संघ आज पाचव्या आणि अखेरच्या वन डेमध्ये यजमान वेस्ट इंडीजला धूळ चारून मालिका खिशात घालण्याच्या निर्धाराने उतरणार आहे.
चौथ्या सामन्यात 190 धावांचा पाठलाग करणारा भारत भक्कम फलंदाजीच्या बळावर सहज विजय नोंदवेल, असे वाटले होते. तथापि, मंद खेळपट्टीवर संघाला 11 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. सर्वाधिक टीकेचा सामना करावा लागला तो महेंद्रसिंह धोनीला. त्याने 114 चेंडू खेळून केवळ 54 धावा केल्या. मोठा फटका मारण्याच्या नादात तो बाद झाल्याने ‘फिनिशर’च्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह लागले आहे. रवींद्र जडेजा हादेखील मोक्याच्या क्षणी बाद होताच तळाच्या फलंदाजांच्या नाकर्तेपणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला.
मालिकेत रहाणे आणि धवन जोडीनेच धावा केल्या. रहाणेची चार सामन्यांत तीन अर्धशतके आणि एक शतक आहे. फलंदाजांच्या चुकीच्या फटकेबाजीचा खरपूस समाचार घेणारा कर्णधार विराट कोहली मधल्या फळीत काही बदल करेल, असे संकेत आहेत. मागच्या सामन्यात संधी मिळालेला दिनेश कार्तिक अपयशी ठरला, तरी बाहेर बसण्याची शक्यता कमी आहे. युवराजसिंग हा निवडीसाठी उपलब्ध असेल का, हादेखील प्रश्न आहे. केदार जाधवला अनेकदा संधी देण्यात आली; मात्र त्याच्या कामगिरीत सातत्याचा अभाव जाणवला.
मागच्या विजयामुळे विंडीजचे मनोबल उंचावल्याने मालिका बरोबरी करण्याच्या तयारीने यजमान संघ उतरेल. दुसरीकडे, भारतीय संघ पराभवाची परतफेड करण्याच्या निर्धारासह खेळणार, हेदेखील निश्चित. (वृत्तसंस्था)
उभय संघ असे-
भारत : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, अजिंक्य रहाणे, युवराजसिंग, महेंद्रसिंह धोनी, केदार जाधव, हार्दिक पांड्या, रविचंद्रन आश्विन, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, कुलदीप यादव, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, मोहंमद शमी आणि रवींद्र जडेजा.
वेस्ट इंडीज : जेसन होल्डर (कर्णधार), सुनील अंबरीष, देवेंद्र बिशू, रोस्टन चेज, मिगुएल कमिन्स, केली होप, शाय होप, अल्जारी जोसेफ, एव्हिन लुईस, जेसन मोहंमद, अॅश्ले नर्स, रोवमॅन पॉवेल आणि केसरिक विल्यम्स.
स्थळ : सबीना पार्क, किंग्सटन, जमैका
सामन्याची वेळ : सायं. ७.३० वा.