टीम इंडियाची ‘फिरकी’

By admin | Published: March 16, 2016 08:39 AM2016-03-16T08:39:50+5:302016-03-16T08:39:50+5:30

जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला गेलेला भारतीय संघ न्यूझीलंडच्या फिरकी माऱ्यात अलगद अडकल्यामुळे टी-२०विश्वचषकाच्या सलामीलाच मंगळवारी न्यूझीलंडकडून ४७ धावांनी पराभूत झाला.

Team India's 'spin' | टीम इंडियाची ‘फिरकी’

टीम इंडियाची ‘फिरकी’

Next

- किशोर बागडे,  नागपूर
जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला गेलेला भारतीय संघ न्यूझीलंडच्या फिरकी माऱ्यात अलगद अडकल्यामुळे टी-२०विश्वचषकाच्या सलामीलाच मंगळवारी न्यूझीलंडकडून ४७ धावांनी पराभूत झाला.
विदर्भ क्रिकेट संघटनेच्या जामठा मैदानावरील खेळपट्टीवर फिरकीपटूंचेच वर्चस्व होते. भारतीय फिरकीपटूंनी न्यूझीलंडला अवघ्या १२६ धावांत रोखले खरे; मात्र कमी धावसंख्येचे लक्ष्य गाठताना भारताचीही दमछाक झाली. अवसानघातकी फलंदाजीमुळे १८.१ षटकांत केवळ ७९ धावांत संघ गारद होताच न्यूझीलंडविरुद्ध पराभवाचा इतिहास कायम राहिला. न्यूझीलंडचे फिरकी गोलंदाज ईश सोधी, मिशेल सॅन्टनर आणि नाथन मॅक्युलम यांनी नऊ फलंदाज बाद केले. त्यात सॅन्टनरने चार व ईश सोधीने तीन बळी घेतले. मॅक्युलमला दोन गडी बाद करण्यात यश आले. भारताने चार चौकार आणि एकच षटकार मारला. १८ धावांचे योगदान दिल्यानंतर चार षटकांत चार गडी बाद करणारा फिरकी गोलंदाज मिशेल सॅन्टनर याला सामनावीरचा पुरस्कार देण्यात आला. विजयासाठी १२७ धावांचा पाठलाग करणाऱ्या भारताने पाचव्या षटकात २६ धावांत चार गडी
गमावले होते. रोहित शर्मा (५), शिखर धवन (१), सुरेश रैना (१) आणि युवराजसिंग (४) हे सर्व जण संयमी खेळण्यात अपयशी ठरले. सॅन्टनर आणि मॅक्युलम यांच्या माऱ्यापुढे त्यांनी सहज नांगी टाकली. यानंतर आक्रमक विराट कोहली आणि ‘कॅप्टन कूल’ धोनी यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. १३ धावांची भागीदारी होत नाही तोच २७ चेंडंूत २३ धावांचे योगदान देणाऱ्या कोहलीला लेगब्रेक गोलंदाज ईश सोधी याने यष्टिमागे झेल देण्यास भाग पाडल्यामुळे भारताचा अर्धा संघ ८.१ षटकांत ३९ धावांत बाद झाला होता. हार्दिक पंड्या (१) सॅन्टनरच्या चेंडूवर पायचित झाला. जडेजा आणि नेहरा हे भोपळाही फोडू शकले नाहीत. आश्विन दहा धावा काढून बाद झाला. सहाव्या स्थानावर आलेल्या धोनीने दयनीय अवस्थेतही ३० चेंडूंत ३० धावा करीत एकाकी संघर्ष केला. अखेरच्या काही षटकांत टी-२० ची ही लढत भारतासाठी कसोटी सामन्यासारखीच बनली होती. सामना हातचा गेला असे ध्यानात येताच त्याचाही संयम सुटला. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात धोनी नवव्या स्थानावर बाद होताच खच्चून भरलेल्या स्टेडियममधील गर्दीने काढता
पाय घेतला. चाहत्यांच्या चेहऱ्यांवर भारतीय संघाच्या पराभवाची निराशा स्पष्टपणे दिसत होती. घरच्या चाहत्यांच्या अपेक्षांच्या ओझ्याखाली भारतीय संघ दडपणात येऊ शकतो, हे आजच्या पराभवावरून स्पष्ट झाले.
तत्पूर्वी, अश्विन, रैना आणि जडेजा यांची फिरकीची जादू आणि नेहरा, पंडया आणि बुमराह या वेगवान गोलंदाजांची त्यांना साथ लाभताच न्यूझीलंड संघ सुरुवातीपासूनच बॅकफूटवर आला. त्यांच्याकडून सर्वाधिक ३४ धावा कोरी अ‍ॅण्डरसनने केल्या. ल्यूक रोंची २१ धावा काढून नाबाद राहीला. संपूर्ण २० षटकांत न्यूझीलंडने नऊ चौकार व केवळ तीन षटकार मारले.

राष्ट्रगीताने सुरुवात
सामन्याच्या सुरुवातीला दोन्ही संघातील खेळाडूंना स्थानिक दिल्ली पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी मैदानात आणले. सोबतीला आयसीसी ध्वजासह दोन्ही देशांचे राष्ट्रध्वज होते. उभय संघाचे राष्ट्रगीत सुरू असताना संपूर्ण स्टेडियम स्तब्ध होते. भाारतीय राष्ट्रगीत संपताच भारत माता की जय... असा एकच जल्लोष झाला.

क्रो यांना श्रद्धांजली
राष्ट्रगीतापूर्वी न्यूूझीलंडचे महान खेळाडू मार्टिन क्रो यांना सामना सुरू होण्याआधी दोन्ही संघाचे खेळाडू आणि स्टेडियममध्ये उपस्थित प्रेक्षकांनी मौन पाळून श्रद्धांजली वाहिली.

१ फेब्रुवारी २००८
मेलबोर्न येथे आॅस्ट्रेलियाविरुद्ध भारताचा डाव १७.३ षटकांत ७४ धावांत संपुष्टात आला होता.
१५ मार्च २०१६.....
नागपूर येथील लढतीत न्यूझीलंडने भारताला ४७ धावांनी पराभूत केले.
११ सप्टेंबर २०१२.....
चेन्नई येथे झालेल्या सामन्यात न्युुझिलंडने भारताचा १ धावेने पराभव केला होता.
२७ फेब्रुवारी २००९...
वेलिग्टोन येथे झालेल्या सामन्यात न्युझिलंडने भारताचा ५ विकेटने पराभव केला होता.
२५ फेब्रुवारी २००९..
क्राईस्टचर्च येथे न्युझिलंडने भारताला ७ विकेटने नमविले होते.
१६ सप्टेंबर २००७...
जोहान्सबर्ग येथे न्युझिलंडने भारताला १० धावांनी नमविले होते.

धावफलक :
न्यूझीलंड : मार्टिन गुप्तिल पायचित गो. अश्विन ६, केन विलियम्सन यष्टिचित (धोनी) गो. रैना ८, कोलिन मुन्रो झे. पंड्या गो. नेहरा ७, कोरी अ‍ॅण्डरसन त्रि.गो. बुमराह ३४, रॉस टेलर धावबाद (रैना)१०, मिशेल सॅटनर झे. धोनी गो. जडेजा १८, ग्रांट इलियट धावबाद ९, ल्यूक रोंची नाबाद २१, नाथन मॅक्यूलम नाबाद ००, अवांतर : १३ , एकूण : २० षटकांत ७ बाद १२६. गोलंदाजी : अश्विन ४-०-३२-१, नेहरा ३-०-२१-१, बुमराह ४-०-१५-१, रैना ४-०-१५-१, जडेजा ४-०-२६-१, हार्दिक पंड्या १-०-१०-०.

भारत : रोहित शर्मा यष्टिचित राँची गो. सॅन्टनर ५, शिखर धवन पायचित मॅक्युलम १, विराट कोहली झे. राँची गो. सोधी २३, सुरेश रैना झे. गुप्तिल गो. सॅन्टनर १, युवराजसिंग झे. आणि गो. मॅक्युलम ४, महेंद्रसिंह धोनी झे. मॅक्युलम गो. सॅन्टनर ३०, पंड्या पायचित गो. सॅन्टनर १, रवींद्र जडेजा झे. आणि गो. सोधी ००, रविचंद्रन आश्विन झे. राँची गो. सोधी १०, नेहरा त्रि. गो. मिल्ने ००, बुमराह नाबाद ००, अवांतर : ४ एकूण : १८.१ षटकांत सर्व बाद ७९ धावा. गोलंदाजी : नाथन मॅक्युलम ३-०-१५-२, कोरी अ‍ॅण्डरसन ३-०-१८-०, मिशेल सॅन्टनर ४-०-११-४, अ‍ॅडम मिल्ने २.१-०-८-१, इलियट २-०-९-०, ईश सोधी ४-०-१८-३.

Web Title: Team India's 'spin'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.