"IPL"मध्ये "UP"ची टीम
By admin | Published: April 4, 2017 05:55 PM2017-04-04T17:55:46+5:302017-04-04T17:55:46+5:30
सत्ताकारणात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या उत्तर प्रदेशानं यावेळी क्रिकेटच्या मैदानातही आपली गाडी सुसाट सोडली आहे.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 4 - राजकारणानंतर मैदानातील सत्तेतही वर्चस्व राखणार? देशाच्या राजकारणात उत्तर प्रदेशानं नेहमीच सत्तेचं समीकरण जुळवलं आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकांतही ते प्रकर्षानं नजरेस आलं आणि सत्तेची सारी समिकरणंही झर्रर्रकन बदलून गेली. सत्ताकारणात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या उत्तर प्रदेशानं यावेळी क्रिकेटच्या मैदानातही आपली गाडी सुसाट सोडली आहे. उद्यापासून सुरू होणाऱ्या आयपीएलच्या दहाव्या संग्रामात याची प्रचिती येईल. यंदाच्या आयपीएलमध्ये विविध संघांतून खेळताना तब्बल दहा खेळाडूंनी मैदानात उडी घेतली आहे. यातले अर्थातच काही जुने आहेत, तर काहींनी नव्यानंच एंट्री घेतली आहे. काही असलं तरी आपलं संख्याबळ त्यांनी इथेही दाखवून दिलं आहे.
१. ‘चायनामॅन कुलदीप यादव- आॅस्ट्रेलियाविरुद्ध नुकत्याच झालेल्या कसोटी मालिकेत कुलदीपनं धरमशाला कसोटीत पदार्पण केलं आणि पहिल्याच सामन्यात कांगारुंना सळो की पळो करून सोडलं. देशाचा हा पहिला ‘चायनामॅन’ खेळाडू यंदाच्या आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सला बळ पुरवतो आहे.
२. अंकित राजपूत- अंकित हे नाव रसिकांच्या फारसं परिचित नसलं तरी त्यानं आयपीएलमध्ये आतापर्यंत सहा सामने खेळले आहेत आणि चार विकेट घेतल्या आहेत. या डावखुऱ्या जलदगती गोलंदाजाकडून यंदा कोलकाता नाईट रायडर्सला बऱ्यापैकी अपेक्षा आहेत.
३. रिंकू सिंह- उत्तर प्रदेशचा रिंकू पहिल्यांदाच आयपीएलमध्ये पदार्पण करतोय. किंंग्ज इलेवन पंजाबला त्याच्याकडून ‘सरप्राईज’ खेळीची अपेक्षा आहे.
४. प्रवीण कुमार- आयपीएलमध्ये प्रवीण कुमारनं नेहमीच चांगलं प्रदर्शन केलं आहे. गुजरात लायन्स संघाकडून प्रतिस्पर्धी फलंदाजांवर गुरकावताना तो यंदा दिसेल.
५. सुरेश रैना- सुरेश रैना भारतीय संघातून कायम आतबाहेर होत असला तरी आयपीएलचा तो हुकमी एक्का आणि गुजरात लायन्सचा कर्णधार आहे. आयपीएलमध्ये त्यानं आतापर्यंत १४७ सामन्यांत जवळपास पाच हजार धावा लुटल्या आहेत आणि २४ विकेट्सही घेतल्या आहेत.
६. एकलव्य द्विवेदी- नवोदित एकलव्य महेंद्रसिंह धोनीची गादी चालवू पाहतो. तो विकेटकिपर आणि चांगला फलंदाजही आहे. तथापि आयपीएलमध्ये त्याला अद्याप फारशी चमक दाखवता आलेली नाही. आयपीएलच्या चार सामन्यांत त्याला केवळ २४ धावा जमवता आल्या आहेत.
७. पियूष चावला- आपल्या लेग स्पिनची जादू दाखवायला पियूष फारच उत्सुक आहे. बॉलिंगबरोबरच गरजेच्या वेळी आपली बॅटही तो फिरवू शकतो. कोलकाता नाईट रायडर्सच्या या खेळाडूनं आयपीएलच्या १२३ सामन्यांत ५१३ रन्सही काढल्या आहेत.
८. मोहम्मद शमी- या उभरत्या खेळाडूची आंतरराष्ट्रीय कारकीर्द उभरतीला येत असताना अचानक दुखापतीमुळे त्याला भारतीय संघाबाहेर व्हावं लागलं आणि त्याच्या कामगिरीलाही अचानक ब्रेक लागला. आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत धर्मशाला कसोटीसाठीही त्याला आमंत्रित करण्यात आलं होतं, पण अंतिम अकरामध्ये खेळण्याची संधी त्याला मिळाली नाही. दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून खेळताना तो पुन्हा मैदान गाजवण्याची अपेक्षा करतोय.
९. भुवनेश्वर कुमार- आपल्या तेज गोलंदाजीनं फलंदाजांची भंबेरी उडवण्यात तो पटाईत आहे. आयपीएलमध्ये आतापर्यंत ८५ विकेट्स त्यानं घेतल्या आहेत. सनरायजर्स हैदराबादकडून खेळताना पहिल्याच मॅचमध्ये आपला जलवा दाखवण्यासाठी तो उत्सुक आहे.
१०. अक्षदीप नाथ- गुणी फलंदाज. आयपीएलमध्ये तो अगोदर खेळलाही आहे, पण अजूनही चाहत्यांसाठी तो अपरिचितच आहे. या डावऱ्या फलंदाजानं आयपीएलमध्ये आतापर्यंत चार सामन्यांत कसेबसे वीस रन जमवले आहेत, पण गुजरात लायन्सला त्याच्याकडून खूप अपेक्षा आहेत.