संघव्यवस्थापनाने मानसिकता बदलावी

By Admin | Published: January 13, 2015 02:34 AM2015-01-13T02:34:16+5:302015-01-13T02:34:16+5:30

विदेशातील दौ-यात अंतिम एकादशमध्ये गोलंदाजांची निवड करताना बीसीसीआयच्या संघव्यवस्थापनाने स्वत:च्या मानसिकतेत बदल करण्याची गरज असल्याचे भारताचा माजी कर्णधार अनिल कुंबळे याने म्हटले आहे.

Team management will change the mindset | संघव्यवस्थापनाने मानसिकता बदलावी

संघव्यवस्थापनाने मानसिकता बदलावी

googlenewsNext

नवी दिल्ली : विदेशातील दौ-यात अंतिम एकादशमध्ये गोलंदाजांची निवड करताना बीसीसीआयच्या संघव्यवस्थापनाने स्वत:च्या मानसिकतेत बदल करण्याची गरज असल्याचे भारताचा माजी कर्णधार अनिल कुंबळे याने म्हटले आहे.
आॅस्ट्रेलियाविरुद्ध संपलेल्या ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय गोलंदाजांची कामगिरी ढिसाळ झाली; त्यामुळे संघावर टीका झाली होती. ही टीका ग्राह्य असल्याचे सांगून कुंबळे म्हणाला, ‘‘आमच्याकडे अनेक चांगले गोलंदाज आहेत. त्यांपैकी कसोटी सामन्यात कोण सामंजस्य राखून मारा करू शकतो, हे समजण्याची गरज आहे. २० गडी बाद करू शकतील, अशा ४ सर्वश्रेष्ठ गोलंदाजांची निवड करावी. विदेशात अंतिम एकादशची निवड करताना लवचिकता आवश्यक आहे. प्रत्येक वेळी ३ वेगवान आणि १ फिरकी गोलंदाज यशस्वी होतीलच असे नाही.’’
देशासाठी कसोटी आणि वन डेत सर्वाधिक बळी घेणारा कुंबळे पुढे म्हणाला, ‘‘विमानात बसतानाच आम्ही मनात निर्धार करतो, की ३ वेगवान आणि एका फिरकीपटूची अंतिम संघात निवड करणार! ही मानसिकता योग्य नव्हे. दोन वेगवान आणि दोन फिरकीपटू २० बळी घेण्यास सक्षम असतील, तर तो फार्म्युला अमलात आणण्यास काय हरकत आहे?’’
अ‍ॅडिलेड कसोटीचे उदाहरण देऊन कुंबळेने सांगितले, की सुरुवातीला येथे फलंदाजांना मदत मिळत होती, तर सामना पुढे गेल्यानंतर फिरकी गोलंदाज प्रभावी ठरले. भारतीय संघात त्या वेळी कर्ण शर्मा हाच एकमेव फिरकीपटू होता. आॅस्ट्रेलियाचा आॅफस्पिनर नाथन लियॉन याने मालिकेत सर्वाधिक २३ बळी घेतले आहेत. वन डे क्रिकेट अधिक खेळल्यामुळे भारतीय गोलंदाज कसोटीत बळी घेण्यात अपयशी ठरत असल्याचे कुंबळेचे मत आहे. फलंदाज आपले शॉट खेळेल, असा अंदाज बांधून गोलंदाजी करणे घातक असते. वन-डे क्रिकेटमुळे ही धारणा निर्माण होते. कसोटी क्रिकेटमध्ये अनुभव लागतो. सातत्याने खेळल्यानंतरच अनुभवात भर पडते. कसोटीत दबाव बनविणे गरजेचे असते. जितका वेळ दबाव वाढवाल, तितकीच विकेट मिळण्याची अधिक शक्यता असेल, असे कुंबळेने स्पष्ट केले. (वृत्तसंस्था)

> गोलंदाजीत सुधारणा आवश्यक : द्रविड
भारतीय संघाची सध्या गोलंदाजांची बाजू कमकुवत आहे. जर आपली गोलंदाजी सातत्याने कमकुवत होत असेल आणि आपल्याकडे जागतिकस्तरावरील वेगवान आणि फिरकी गोलंदाज नसतील तर आपण गोलंदाजी मानांकनात नक्कीच खालच्या क्रमांकावर जाऊ. गोलंदाजीत सुधारणा करणे आवश्यक आहे. परदेशात आपण कसोटी सामने जिंकणे महत्त्वाचे आहे. आपल्या देशात आपण चांगली कामगिरी करतो, फलंदाजांची चांगली फौज आहे. काही फिरकी गोलंदाजसुद्धा चांगले आहेत, की जे परदेशात चांगली गोलंदाजी करू शकतील. मी मानांकनाला जास्त महत्त्व देत नाही. ते मानांकन पाचवे असो किंवा सहावे असो त्यात काही फरक पडत नाही. अधिक काळ जर आपण परदेशात खेळलो नाही तर आपल्या मानांकनात नक्कीच फरक पडणार आहे. विराटची ही सुरूवात आहे. त्याने दाखवून दिले आहे की तो कर्णधारपद सांभाळू शकतो. त्याने या कसोटी मालिकेत चांगली कामगिरी केली हे सुद्धा महत्त्वाचे आहे, असे राहुल द्रविड शेवटी म्हणाला.

Web Title: Team management will change the mindset

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.