संघ कमकुवत नाही
By admin | Published: January 14, 2015 02:30 AM2015-01-14T02:30:18+5:302015-01-14T02:30:18+5:30
कसोटी मालिकेत ०-२ ने पराभव स्वीकारावा लागला असला, तरी पुढील महिन्यात प्रारंभ होणाऱ्या विश्वकप स्पर्धेत भारतीय संघ चमकदार सुरुवात करेल
सिडनी : कसोटी मालिकेत ०-२ ने पराभव स्वीकारावा लागला असला, तरी पुढील महिन्यात प्रारंभ होणाऱ्या विश्वकप स्पर्धेत भारतीय संघ चमकदार सुरुवात करेल, असे मत आॅस्ट्रेलियाचा माजी फलंदाज मायकल हसीने व्यक्त केले. कसोटी मालिकेतील पराभवामुळे भारतीय संघ कमकुवत असल्याचे समजू नये, असा इशारा हसीने अन्य संघांना दिला आहे.
हसी म्हणाला, ‘गेल्या दोन महिन्यांपासून भारतीय संघ आॅस्ट्रेलियात आहे, ही त्यांच्यासाठी सकारात्मक बाब आहे. भारतीय संघ येथील वातावरण, खेळपट्ट्या व चेंडूला मिळणाऱ्या उसळीला सरावला आहे. भारतीय संघ येथे तिरंगी मालिकाही खेळणार असून, त्यात तिसरा संघ इंग्लंड आहे. विश्वकप स्पर्धेपूर्वी भारताला येथे चांगली संधी मिळाली असून, कसोटी मालिकेतील निकालामुळे त्यांना कमकुवत समजता येणार नाही.’
भारतीय संघाच्या कामगिरीबाबत बोलताना हसी म्हणाला, ‘पाहुण्या संघाच्या फलंदाजांनी चांगली कामगिरी केली, पण गोलंदाजांना मात्र कामगिरीत सातत्य राखता आले नाही. भारताची फलंदाजी बदललेली आहे. त्यांनी चांगली कामगिरी केली. विराट कोहली शानदार खेळाडू असून, त्याने खोऱ्याने धावा वसूल केल्या आहेत. भविष्यातही तो कामगिरीत सातत्य राखण्यात यशस्वी ठरेल. मुरली विजय व अजिंक्य रहाणे यांची कोहलीला चांगली साथ लाभली. सन २०११च्या तुलनेत या वेळी नवा संघ दिसला. भारतीय संघात के.एल. राहुलसारख्या प्रतिभावान खेळाडूचा समावेश आहे. या युवा खेळाडूने आॅस्ट्रेलियात पहिले कसोटी शतक झळकाविले, हे विसरता येणार नाही.’
विश्वकप स्पर्धेला प्रारंभ होण्यास जवजवळ महिन्याभराचा कालावधी शिल्लक आहे. दरम्यान, भारतीय प्रशिक्षक डंकन फ्लेचर यांचा करार संपणार आहे. भारतीय प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत हसीचे नाव आले होते, पण हसीने या शर्यतीत नसल्याचे सांगितले.
हसी म्हणाला, ‘माझे नाव प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत असल्याचे वृत्त बघितल्यानंतर आश्चर्य वाटले. मी अनेक वर्षांपासून महेंद्रसिंह धोनीला ओळखतो आणि त्याने मला प्रशिक्षकपदासाठी पसंती दर्शविल्यामुळे मला अभिमान वाटतो. मी अद्याप त्याच्यासोबत याबाबत चर्चा केलेली नाही. या वृत्तामध्ये किती सत्य आहे, याबाबत मला कल्पना नाही. मी अद्याप या मुद्यावर कुणासोबतही चर्चा केलेली नसून बीसीसीआयनेही माझ्यासोबत अद्याप संपर्क केलेला नाही.’
बीसीसीआयने जर चर्चा केली तर प्रशिक्षकपद स्वीकारण्याची तयारी आहे का? याबाबत बोलताना हसी म्हणाला, ‘प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास मी अद्याप याबाबत विचार केलेला नाही. कारकिर्दीच्या या वळणावर मी अद्याप क्रिकेटमध्ये खेळाडू म्हणून सक्रिय आहे. येथे बिग बॅश लीगमध्ये व इंडियन प्रीमिअर लीगमध्ये खेळत आहे. त्यामुळे सध्यातरी प्रशिक्षकपदाबाबत विचार केलेला नाही.’
भारत क्रिकेटप्रेमी, क्रिकेट चाहत्यांचा देश आहे. भारतात कोट्यवधी चाहते संघांचे समर्थन करतात. (वृत्तसंस्था)