सांघिक कामगिरी निर्णायक
By admin | Published: February 10, 2016 01:30 AM2016-02-10T01:30:59+5:302016-02-10T01:30:59+5:30
प्रो-कबड्डीच्या तिसऱ्या सत्रात बंगाल वॉरियर्सने आपले पहिले चार सामने दणक्यात जिंकताना स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच गुणतालिकेत अग्रस्थानी झेप घेतली. पहिल्या दोन सत्रांतील
- रोहित नाईक, कोलकाता
प्रो-कबड्डीच्या तिसऱ्या सत्रात बंगाल वॉरियर्सने आपले पहिले चार सामने दणक्यात जिंकताना स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच गुणतालिकेत अग्रस्थानी झेप घेतली. पहिल्या दोन सत्रांतील संघाची कामगिरी पाहता बंगालने यंदा सर्वांनाच चकित केले. विशेष म्हणजे या बंगाल वॉरियर्सची धुरा महाराष्ट्राचा वाघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नीलेश शिंदेच्या हाती असून तो संघाच्या चमकदार कामगिरीचे यश सांघिक कामगिरी व प्रशिक्षकांना देतो.
पहिल्या दोन सत्रांत झालेली कामगिरी पाहता यंदा आम्हाला धडाकेबाज सुरुवात करायची होती. त्यानुसार प्रशिक्षक प्रकाश शेट्टी यांनी संपूर्ण संघाला तयार केले आहे. रोज सकाळी ५-६ कि.मी. धावल्यानंतर फिजिओ टे्रनिंग व्हायची. त्या वेळी आम्ही तंदुरुस्तीवर जास्त लक्ष देताना दुखापतीपासून दूर कसे राहता येईल यावर अधिक भर दिला. आज जे काही यश मिळत आहे ते सांघिक कामगिरीमुळे असून यामध्ये संपूर्ण संघाचा मोलाचा सहभाग आहे, असे नीलेशने ‘लोकमत’ला सांगितले.
पहिल्या तीन सामन्यांत बचावावर अधिक भर दिल्यानंतर दिल्ली विरुद्धच्या चौथ्या सामन्यात पहिल्या चढाईपासून बंगालने आक्रमक पवित्रा घेतला होता. याबाबत नीलेश म्हणाला की, याआधीच्या सामन्यात प्रतिस्पर्धी आक्रमक खोलवर चढाया करीत नव्हते. त्यामुळे आम्ही बचावात्मक पवित्रा घेत पकडीवर भर घेतला. मात्र दिल्लीला आमच्याविरुद्ध कोणत्याही परिस्थितीमध्ये विजय आवश्यक असल्याने त्यांनी पहिल्या चढाईपासून खोलवर चढाई केली आणि आम्ही त्याचा फायदा घेऊन यशस्वी पकडी केल्या. यापुढेही हीच रणनीती कायम ठेवण्याचा आमचा प्रयत्न असेल.
बंगालचा प्रमुख खेळाडू असलेल्या नीलेशच्या फॅन्सची संख्या वाढत आहे. शिवाय स्टेडियममध्ये त्याच्या नावाचा जयघोष सतत सुरू असतो. याविषयी नीलेश सांगतो की, मी याआधी कधीच बंगालमध्ये आलो नव्हतो. संघाने स्वत:हून माझी निवड केली. इथल्या प्रेमाने मी भारावून गेलो आहे. त्याचवेळी मराठी असल्याचा मोठा अभिमान आहे. माझ्या कामगिरीमुळे महाराष्ट्राचे नाव मोठे होत आहे. महाराष्ट्राच्या तुलनेत बंगालमध्ये कबड्डी कमी प्रमाणात खेळली जाते. आपल्याकडे सातत्याने स्पर्धा होत असतात. विशेष म्हणजे आपल्या मुलांमध्ये कबड्डी अंगात भिनली असल्याने बेसिक शिकवावे लागत नाही. त्याउलट इथे मात्र सुरुवातीपासून खेळाडूंना शिकवावे लागते.
- महाराष्ट्राच्या तुलनेत बंगालमध्ये कबड्डी कमी प्रमाणात खेळली जाते. आपल्याकडे सातत्याने स्पर्धा होत असतात. विशेष म्हणजे आपल्या मुलांमध्ये कबड्डी अंगात भिनली असल्याने बेसिक शिकवावे लागत नाही.
जँग कुन ली आमचा अत्यंत महत्त्वाचा खेळाडू आहे. तो खूप शिस्तबद्ध असून मेहनती आहे. आमच्यामध्ये संवादाची समस्या असली तरीही आम्ही कबड्डीच्या भाषेतून एकमेकांना सावरतो. तो चढाईमध्ये गुण आणतो आणि संरक्षणामध्ये माझ्या हाताशी असल्याने त्याची मोलाची साथ मिळते. - नीलेश शिंदे