सांघिक कामगिरीच्या जोरावर जेतेपद पटकावता येते : रोहित

By admin | Published: May 23, 2017 04:42 AM2017-05-23T04:42:42+5:302017-05-23T04:42:42+5:30

वैयक्तिक कामगिरीच्या जोरावर संघासाठी काही सामने जिंकता येतात, पण स्पर्धेत जेतेपद पटकावण्यासाठी सांघिक कामगिरीची गरज असते

With the team performance, the title can be won: Rohit | सांघिक कामगिरीच्या जोरावर जेतेपद पटकावता येते : रोहित

सांघिक कामगिरीच्या जोरावर जेतेपद पटकावता येते : रोहित

Next

हैदराबाद : वैयक्तिक कामगिरीच्या जोरावर संघासाठी काही सामने जिंकता येतात, पण स्पर्धेत जेतेपद पटकावण्यासाठी सांघिक कामगिरीची गरज असते, अशी प्रतिक्रिया मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने व्यक्त केली. रविवारी आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाने तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावले.
मुंबई इंडियन्सने आपल्या गोलंदाजांच्या चमकदार कामगिरीच्या जोरावर रविवारी रात्री कमी धावसंख्येच्या अंतिम लढतीत रायझिंग पुणे सुपरजायंटचा एका धावेने पराभव करीत जेतेपद पटकावले.
सामन्यानंतर पत्रकारांसोबत बोलताना रोहित म्हणाला, ‘‘माझ्या मते वैयक्तिक कामगिरीच्या जोरावर तुम्ही संघासाठी काही सामने जिंकू शकता, पण चॅम्पियन होण्यासाठी सांघिक कामगिरी महत्त्वाची ठरते. संघाची तिन्ही विजेतीपदे विशेष आहेत. स्पर्धेपूर्वीच संघाचा योग्य समतोल साधणे महत्त्वाचे आहे.’’
रोहितने आॅस्ट्रेलियाचा डावखुरा वेगवान गोलंदाज मिशेल जॉन्सनची प्रशंसा करताना सांगितले, ‘आमच्या संघात स्वत:ला सिद्ध केलेले मॅचविनर आहेत. मिशेल जॉन्सनने यापूर्वी अनेकदा सिद्ध केले आहे.’ ‘आॅस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व करताना त्याने अनेकदा संघाला विजय मिळवून दिला आहे. मुंबईचे प्रतिनिधित्व करतानाही पुन्हा एकदा त्याची प्रचिती आली. अखेरचे षटक महत्त्वाचे होते. मोक्याच्या क्षणी त्याने लौकिकाला साजेशी कामगिरी केली. पूर्ण मोसमात त्याची उपस्थिती महत्त्वाची ठरली.’
मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना ८ बाद १२९ धावांची मजल मारली. रोहितच्या मते या खेळपट्टीवर आम्ही ३०-४० धावा कमी केल्या.
रोहित म्हणाला, ‘‘या खेळपट्टीवर १४०-१६० धावा फटकावण्याचे आमचे लक्ष्य होते. कृणाल पांड्याने ४७ धावांची खेळी केल्यामुळे संघाला १२९ धावांची मजल मारता आली. कृणाल सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. लसिथ मलिंगा व जसप्रीत बुमराह डेथ ओव्हर्समध्ये सर्वोत्तम गोलंदाज आहेत.’’
भारतीय संघाचे कर्णधारपद भूषविण्याची इच्छा आहे का, याबाबत बोलताना रोहित म्हणाला, ‘‘हा प्रश्न फार पुढचा विचार करण्यासारखा आहे. मी फार पुढील विचार करीत नाही. ज्या वेळी संधी मिळते त्या वेळी त्याचे सोने करण्यास प्रयत्नशील असतो.’’
(वृत्तसंस्था)

Web Title: With the team performance, the title can be won: Rohit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.