‘दहा हजारी मनसबदार होण्याचे लक्ष्य होते’
By admin | Published: June 1, 2016 03:35 AM2016-06-01T03:35:41+5:302016-06-01T03:35:41+5:30
दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडल्यामुळे चर्चेत असलेला इंग्लंडचा कर्णधार अॅलिस्टर कुकने कारकिर्दीत १० हजार धावा फटकावण्याचे लक्ष्य होते आणि त्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्नशील होतो
डरहॅम : दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडल्यामुळे चर्चेत असलेला इंग्लंडचा कर्णधार अॅलिस्टर कुकने कारकिर्दीत १० हजार धावा फटकावण्याचे लक्ष्य होते आणि त्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्नशील होतो, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
श्रीलंकेचा दुसऱ्या कसोटी सामन्यात ९ गड्यांनी पराभव करीत मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेणारा इंग्लंड संघाचा कर्णधार अॅलिस्टर कुकने सर्वांत लहान वयात कसोटी क्रिकेटमध्ये १० हजार धावांचा पल्ला गाठण्याचा पराक्रम केला. कुक म्हणाला,‘‘१० हजार धावांचा पल्ला गाठण्याचे लक्ष्य होते. गेल्या काही वर्षांपासून त्यासाठी प्रयत्नशील होतो. माझ्यासाठी ही विशेष बाब आहे. संघाच्या विजयामुळे आनंद झालाच, पण वैयक्तिक यशामुळेही सुखावलो. विजय मिळवणे आणि धावा फटकावणे या दोन्ही बाबी विशेष असतात. दहा हजार धावांचा पल्ला गाठण्याचा पराक्रम करताना माझे कुटुंबीय स्टेडियममध्ये उपस्थित होते. त्यामुळे माझ्यासाठी हा विशेष दिवस आहे.’’ इंग्लंडतर्फे १२८ कसोटी सामन्यांत प्रतिनिधित्व करणारा कुक पुढे म्हणाला, ‘‘सलामीवीर फलंदाजाला वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये खेळावे लागते आणि मी प्रदीर्घ कालावधीपासून संघासोबत जुळलेलो आहे. मी संघातील स्थान गमावलेले नाही. येथील खेळपट्टी आव्हानात्मक होती. अखेरच्या षटकांमध्ये खेळपट्टी पाटा वाटत होती. ही खेळपट्टी चेस्टर ली स्ट्रीटपेक्षा कोलंबोची भासत होती.’’(वृत्तसंस्था)