पुण्यासह सहा ठिकाणी पहिल्यांदाच कसोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2016 03:47 AM2016-06-10T03:47:03+5:302016-06-10T03:47:03+5:30
पुणे, धर्मशाळा आणि रांचीसह सहा नव्या कसोटी केंद्रांवर सप्टेंबरपासून सुरू होत असलेल्या भारतीय संघाच्या स्थानिक दौऱ्याचे आयोजन होणार आहे
मुंबई : पुणे, धर्मशाळा आणि रांचीसह सहा नव्या कसोटी केंद्रांवर सप्टेंबरपासून सुरू होत असलेल्या भारतीय संघाच्या स्थानिक दौऱ्याचे आयोजन होणार आहे.
बीसीसीआय सचिव अजय शिर्के यांनी ही माहिती देताना सांगितले की राजकोट, विशाखापट्टणम, पुणे, धर्मशाळा, रांची आणि इंदूर ही सहा केंद्रे कसोटीसाठी अपग्रेड आली आहेत. या सर्व केंद्रांवर पहिल्यांदा कसोटी सामन्यांचे आयोजन होईल.
न्यूझीलंडविरुद्ध तीन कसोटी आणि पाच वन-डे सामन्यांच्या मालिकेद्वारे स्थानिक मोसमाला सुरुवात होईल. त्यानंतर इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी, तीन वन-डे आणि तीन टी-२० सामने खेळविले जातील.
आॅस्ट्रेलिया संघ फेब्रुवारी-मार्चमध्ये भारत दौऱ्यावर येईल. या दौऱ्यात चार कसोटी सामने खेळले जातील. बांगलादेश संघ भारतात पहिल्यांदा एकमेव कसोटी सामना खेळणार आहे. सर्व सहा स्टेडियममध्ये प्रेक्षक क्षमता तसेच बीसीसीआयचे दिशानिर्देशांचे पालन झाल्यानंतरच सामन्यांचे आयोजन होणार आहे.
स्थानिक मोसमाला सप्टेंबरमध्ये दुलिप करंडकाद्वारे सुरुवात होईल. ही स्पर्धा प्रथमच गुलाबी चेंडूद्वारे विद्युत प्रकाशझोतात होणार आहे. या मोसमात ९१८ सामन्यांचे आयोजन बोर्डाद्वारे होणार असून त्यात रणजी, दुलिप, विजय हजारे, मुस्ताक अली, देवधर, इराणी ट्रॉफी तसेच महिला क्रिकेटचा समावेश राहील. छत्तीसगड संघाला पहिल्यांदा रणजी करंडकात खेळण्याची परवानगी बहाल करण्यात आली आहे.
बीसीसीआय अध्यक्ष अनुराग ठाकूर म्हणाले, ‘आम्हाला स्थानिक मोसमाची उत्सुकता अधिक आहे. दुलिप करंडकाचे सामने प्रथमच विद्युत प्रकाशझोतात गुलाबी चेंडूने खेळविले जातील. याशिवाय पहिल्यांदा समावेश करण्यात आलेल्या छत्तीसगड संघाचे आम्ही स्वागत करतो.’ (वृत्तसंस्था)
ईडनवर डे-नाईट कसोटी ?
ईडन गार्डन्सचे ऐतिहासिक स्टेडियम न्यूझीलंडविरुद्ध भारतातील पहिल्या दिवस-रात्र क्रिकेट कसोटी सामन्याच्या यजमानपदाचे प्रबळ दावेदार आहे, पण कॅबचे अध्यक्ष सौरव गांगुली यांच्या मते १८ जूनपासून येथे गुलाबी चेंडूवर ‘डे-नाईट’ होणाऱ्या दुलीप ट्रॉफी स्पर्धेच्या यशावर ते अवलंबून राहील.
गांगुलीने कुठल्याही प्रकारचा खुलासा न करता सांगितले की, ‘अद्याप कसल्याच प्रकारचा दुजोरा मिळालेला नाही. दिवस-रात्र कसोटी सामन्याचे यजमानपद दुलीप ट्रॉफी स्पर्धेच्या यशावर अवलंबून राहील. आम्ही प्रायोगिक तत्त्वावर १८ ते २१ जून या कालावधील गुलाबी कुकाबुरा चेंडूने देशात प्रथमच चार दिवसीय रात्रीच्या सामन्याचे (कॅब सुपर लीग फायनल) आयोजन करीत आहे. हा प्रयोग कितपत यशस्वी ठरतो, हे बघावे लागेल.’
बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, न्यूझीलंडविरुद्ध जर दिवस-रात्र कसोटीचे आयोजन करण्यात आले तर या लढतीचे यजमानपद ईडन गार्डन्सला मिळवण्याची शक्यता आहे.
सूत्राने सांगितले की,‘याबाबतचा निर्णय २४ जून रोजी होणाऱ्या बीसीसीआय कार्यसमितीच्या बैठकीमध्ये घेण्यात येईल. सामन्याचे यजमानपद ईडन गार्डन्सला मिळावे, अशी आम्हाला आशा आहे. त्याचप्रमाणे दिवस-रात्र सामन्याच्या आयोजनावर कॅबचे उत्तरही मिळेल.’
ईडनला यजमानपद मिळण्याची शक्यता अधिक आहे. कारण न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतील उर्वरित दोन कसोटी सामने इंदूर आणि कानपूरमध्ये खेळल्या जाणार आहेत.
कानपूरमध्ये फ्लड लाईटबाबत अडचण आहे तर ऐतिहासिक लढतीसाठी इंदूर कदाचित सर्वोत्तम स्थळ ठरू शकणार नाही.
कॅबने पुढील आठवड्यात होणाऱ्या सुपर लीग फायनलसाठी एक डझन गुलाबी कुकाबुरा चेंडू मागविले आहेत. या सामन्याचे टीव्हीवर थेट प्रसारण करण्यात येणार आहे.
कॅबचे सचिव अविषेक दालमिया म्हणाले,‘चेंडू स्पष्टपणे दिसावा यासाठी अधिक हिरवळ ठेवण्यात येईल. कुकाबुराचे जगातील व उपखंडातील प्रमुख या लढतीसाठी येत आहेत. बीसीसीआय या लढतीबाबत काय विचार करते, हे बघावे लागेल. भविष्यातील वाटचालीबाबत हा एक प्रयोग आहे. आम्ही प्रयोग करीत असून इतिहास आमच्या साथीला आहे. आम्ही अंतिम फेरी गाठणाऱ्या संघांना सरावासाठी प्रत्येकी दोन चेंडू देणार आहोत. सुरुवातीचे दोन दिवस हे संघ सरावादरम्यान या चेंडूंचा वापर करतील.’ (वृत्तसंस्था)
>संघ व त्यांच्या लढती...
न्यूझीलंड - २०१६
कसोटी : इंदूर, कानपूर, कोलकाता
वन-डे : धर्मशाळा, दिल्ली, मोहाली, रांची, विशाखापट्टणम
इंग्लंड - २०१६
कसोटी : मोहाली, राजकोट, मुंबई, विशाखापट्टणम, चेन्नई
वन-डे : पुणे, कटक, कोलकाता
टी-२० : बंगलोर, नागपूर, कानपूर
आॅस्ट्रेलिया - २०१७
कसोटी : बंगलोर, धर्मशाळा,
रांची, पुणे
बांगलादेश - २०१७
कसोटी : हैदराबाद