संघ निवडण्यासाठी ‘कसोटी’
By admin | Published: October 18, 2015 11:15 PM2015-10-18T23:15:39+5:302015-10-18T23:15:39+5:30
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील अखेरचे दोन सामने बाकी असून आज संदीप पाटील यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीची भारतीय
नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील अखेरचे दोन सामने बाकी असून आज संदीप पाटील यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीची भारतीय संघाची निवड करताना मोठी कसोटी लागेल. त्याचवेळी पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठीही या वेळी भारतीय संघ निवडला जाईल. वेगवान गोलंदाज इशांत शर्माच्या अनुपस्थितीमुळे निवड समितीला वेगवान गोलंदाजासाठी उत्तम पर्याय निवडण्यासाठी खूप विचार करावा लागेल.
राष्ट्रीय निवड समिती आगामी एकदिवसीय सामन्यांसाठी रविचंद्रन आश्विनला पर्यायी गोलंदाजाचा विचार करेल. मात्र त्याचवेळी कसोटी मालिकेसाठी गोलंदाजांची बाजू तयार करताना निवड समितीची खरी कसोटी लागेल. कारण, दिल्लीकडून हरियानाविरुद्ध रणजी सामना खेळताना हुकमी गोलंदाज इशांतच्या मांसपेशी ताणल्या गेल्या होत्या.
२२ वर्षांनंतर श्रीलंकेत पहिल्यांदा कसोटी मालिका जिंकलेल्या भारतीय संघातील बहुतेक खेळाडूंचे मोहाली व बंगळुरू येथे होणाऱ्या सामन्यांसाठी संघातील स्थान निश्चित मानले जात आहे. मुरली विजय, शिखर धवन, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा आणि रोहित शर्मा या फलंदाजांची निवड जवळजवळ निश्चित आहे. त्याचवेळी के. एल. राहुलला राखीव फलंदाज म्हणून निवडले जाऊ शकते. (वृत्तसंस्था)