इंदूरमध्ये २८ वर्षांनंतर होणार कसोटी सामना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2016 05:52 AM2016-06-30T05:52:43+5:302016-06-30T05:52:43+5:30
भारत आणि न्यूझीलंड ८ ते १२ आॅक्टोबरदरम्यान आपल्या जमान्यातील सुरेख फलंदाज सय्यद मुश्ताक अली यांच्या जन्मभूमीत प्रथमच आयोजित होणाऱ्या कसोटी सामन्यासाठी खेळण्यास उतरतील
इंदूर : भारत आणि न्यूझीलंड ८ ते १२ आॅक्टोबरदरम्यान आपल्या जमान्यातील सुरेख फलंदाज सय्यद मुश्ताक अली यांच्या जन्मभूमीत प्रथमच आयोजित होणाऱ्या कसोटी सामन्यासाठी खेळण्यास उतरतील, तेव्हा मध्य प्रदेशच्या या शहरात दोन्ही संघांदरम्यान २८ वर्षांच्या कालखंडानंतर ही दुसरी लढत असेल. तथापि, या वेळेस खेळाचे स्वरूप बदलले असेल आणि स्टेडियमदेखील वेगळे असेल.
याआधी १५ डिसेंबर १९८८ मध्ये भारत आणि न्यूझीलंड संघ एकदिवसीय सामन्यात इंदूर येथे नेहरू स्टेडियमवर आमने-सामने उभे ठाकले होते. त्या वेळेस दिलीप वेंगसरकरच्या नेतृत्वाखालील यजमान संघाने जॉन राइटच्या नेतृत्वाखालील न्यूझीलंड संघावर ५३ धावांनी मात केली होती. कृष्णमाचारी श्रीकांतने या सामन्यात गोलंदाजीत विशेष चमक दाखवताना ३२ धावांत ५ गडी बाद केले होते आणि तेव्हा तो भारताचा दोन वनडे सामन्यात पाच किंवा त्यापेक्षा जास्ती बळी घेणारा गोलंदाज बनला होता.
नेहरू स्टेडियमची स्थिती खराब झाल्यानंतर येथे २00१ नंतर आंतरराष्ट्रीय सामन्यांचे आयोजन होणे बंद झाले होते. त्यानंतर आंतरराष्ट्रीय सामने मध्य प्रदेश क्रिकेट संघटनेच्या (एमपीसीए) होळकर स्टेडियममध्ये होत होते.
जवळपास २७ हजार प्रेक्षकांची क्षमता असणारे होळकर स्टेडियम भारतासाठी खूपच लकी ठरले आहे. गेल्या एक दशकात या स्टेडियमवर भारताने चार एकदिवसीय सामने खेळले आणि हे सर्व सामने जिंकले आहेत. या स्टेडियमवर याआधी एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामना १४ आॅक्टोबर २0१५ ला भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झाला होता. या लढतीत भारताने दक्षिण आफ्रिकेला २२ धावांनी पराभूत केले होते. याच मैदानावर वीरेंद्र सेहवागने ८ डिसेंबर २0११ मध्ये वेस्ट इंडीजविरुद्ध वनडे सामन्यात २१९ धावांची खेळी करून सचिन तेंडुलकरचा वनडेतील एक डावात सर्वाधिक धावांचा त्या वेळेसचा विक्रम मोडला होता.
भारत-न्यूझीलंड सामन्याचे आयोजन येथे होणार असल्याचे संकेत मिळाल्यानंतर संघटनेने आधीच या लढतीची तयारी सुरू केली होती; परंतु सामन्याचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर आता तयारीचा वेग वाढविण्यात आला आहे. आम्हाला होळकर स्टेडियममध्ये भारत-न्यूझीलंड कसोटी सामन्यासाठी आता छोटे बदल करायचे आहेत आणि पाचदिवसीय लढत लक्षात घेऊन प्रेक्षकांसाठी काही सुविधा वाढवायच्या आहेत.
- मिलिंद कनमडीकर,
सचिव एमपीसीए