ठाण्याच्या मावळी मंडळ राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचा आज अंतिम निकाल!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2023 10:54 AM2023-04-21T10:54:56+5:302023-04-21T10:59:10+5:30

श्री मावळी मंडळ तर्फे ७०व्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन

Thane Mawli Mandal State Level Kabaddi Tournament Final Result Today | ठाण्याच्या मावळी मंडळ राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचा आज अंतिम निकाल!

ठाण्याच्या मावळी मंडळ राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचा आज अंतिम निकाल!

googlenewsNext

विशाल हळदे, ठाणे: श्री मावळी मंडळ आयोजित ९८ व्या शिवजयंतीउत्सवानिमित्त ७०व्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या चौथ्या दिवशी  महिला गटात श्री राम पालघर, शिवशक्ती महिला संघ मुंबई शहर, शिवशक्ती क्रीडा मंडळ धुळे, शिवतेज क्रीडा मंडळ ठाणे या संघानी उपांत्य फेरीत प्रवेश केला. तर पुरुष गटाच्या उत्कर्ष क्रीडा मंडळ मुंबई उपनगर, स्वस्तिक क्रीडा मंडळ मुंबई उपनगर, क्रीडा प्रबोधिनी नाशिक, उजाला क्रीडा मंडळ ठाणे या संघानी उपांत्य फेरीत प्रवेश केला.

महिला गटातील पहिल्या उपउपांत्य फेरीत पालघरच्या श्री राम संघाने मुंबई उपनगरच्या स्नेहविकास क्रीडा मंडळाचा अतिशय चुरशीच्या सामन्यात २९-२२ असा ७ गुणांनी पराभव करून उपांत्य फेरीत खेळण्याचा मान मिळवला. सामन्याच्या मध्यंतराला श्री राम संघाकडे १७-९ अशी ८ गुणांची आघाडी होती ती संगीता भारद्वाजच्या सुंदर पक्कडी व तिला चढाईत ऐश्वर्या ठवण हिने दिलेल्या उत्कृष्ट साथीमुळे. सामन्याच्या उत्तरार्धात स्नेहविकास क्रीडा मंडळाच्या रिया तावडे व नम्रता नेवगी या दोन्ही खेळाडूंनी अतिशय आक्रमक खेळ करीत सामना समान गुणांवर आणला. परंतु शेवटच्या पाच मिनिटात श्री राम संघाने शिस्तबद्ध खेळ करीत सामना आपल्या बाजूला झुकवला.

उपउपांत्य फेरीच्या दुसऱ्या सामन्यात मुंबई शहरच्या शिवशक्ती महिला संघाने ठाण्याच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा मंडळाचा ३७-१७ असा २० गुणांनी पराभव करून स्पर्धेत सलग आठव्यांदा उपांत्य फेरीत खेळण्याचा मान मिळवला. सामन्याच्या मध्यंतराला शिवशक्ती महिला संघाकडे १८-१२ अशी ६ गुणांची आघाडी होती ती प्रतीक्षा तांडेल, रिया मडकईकर यांच्या आक्रमक चढायांमुळे. सामन्याच्या उत्तरार्धात छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा मंडळाच्या साक्षी पाटील हिने एकाकी लढत दिली.

पुरुष गटातील उपउपांत्य फेरीतमुंबई उपनगरच्या स्वस्तिक क्रीडा मंडळाने डोम्बिवलीच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा मंडळा चा ३६-२० असा १६ गुणांनी पराभव करून उपांत्य फेरी गाठली. सामना मध्यंतरापर्यंत अतिशय अटीतटीचा झाला. मध्यंतराला स्वस्तिक क्रीडा मंडळाकडे ११-१० अशी फक्त २ गुणांची आघाडी होती. परंतु मध्यंतरानंतर स्वस्तिक क्रीडा मंडळाच्या प्रफुल्ल चव्हाण व अक्षय बडे यांनी चतुरस्त्र खेळ करीत आपल्या संघाची गुणसंख्या  वाढवत आपल्या संघाला विजयी आघाडी मिळवून दिली. पराभूत संघाकडून शुभम शिर्के  याने एकाकी लढत दिली.

Web Title: Thane Mawli Mandal State Level Kabaddi Tournament Final Result Today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.