ठाणेकर विघ्नेशचे रौप्य पदक
By admin | Published: November 4, 2016 04:01 AM2016-11-04T04:01:21+5:302016-11-04T04:01:21+5:30
आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेच्या पुरुष दुहेरी गटात ठाणेकर विघ्नेश देवळेकरने रोहन कपूरच्या साथीने अंतिम फेरीत धडक मारली
मुंबई : नुकत्याच बहारीन येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेच्या पुरुष दुहेरी गटात ठाणेकर विघ्नेश देवळेकरने रोहन कपूरच्या साथीने अंतिम फेरीत धडक मारली. मात्र, मोक्याच्यावेळी झालेल्या चुकांचा फटका बसल्याने विघ्नेश - रोहन यांना रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. अंतिम सामन्यात विघ्नेश-रोहन जोडीला सोव्हिएत रशियाच्या इव्हेगनीज ड्रीमन-डेनिस ग्रेचेव्ह जोडीकडून १८-२१,१७-२१ असा पराभव पत्कारावा लागला.
ठाणे महपालिकेच्या सय्यद मोदी बॅडमिंटन अकादमीत विघ्नेश प्रशिक्षणाचे धडे गिरवत आहे. स्पर्धेत लक्षवेधी कामगिरी केलेल्या विघ्नेश - रोहन यांनी इंडोनेशियाच्या जाफर इब्राहिम आणि हरी सेतीवान जोडीचा सरळ गेममध्ये २१-१५, २१-१८ असा पराभव करुन विजयी सुरुवात केली. यानंतर भारतीय जोडीने उपांत्य फेरीत इंडोनेशियाच्या अदनान इब्राहिम-वाहिद तक्वेऊद्दीन जोडीवर २१-१२, १९-२१, २१-९ अशी मात करत अंतिम फेरीत धडक मारली. अंतिम सामन्यात मात्र, विघ्नेश-रोहन यांना मोक्याच्यावेळी केलेल्या चुकांचा फटका बसला. इव्हेगनीज - डेनिस यांच्या वेगवान खेळापुढे दडपणाखाली आल्यानंतर भारतीय जोडीकडून नेट्सजवळ चुका झाल्याने त्यांना अखेर रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. आॅक्टोबर महिन्यात झालेल्या पोलंड आंतरराष्ट्रीय स्पर्धेत विघ्नेशने आपले पहिले आंतरराष्ट्रीय कांस्य पदक पटकावले होते. आगामी बांग्लादेश आंतरराष्ट्रीय स्पर्धा आणि राष्ट्रीय स्पर्धेसाठी प्रशिक्षक श्रीकांत वाड यांच्या मार्गदर्शनाखाली विघ्नेशने तयारी सुरु केली आहे. (क्रीडा प्रतिनिधी)