ठरलं...! आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत खेळणार
By admin | Published: May 7, 2017 01:10 PM2017-05-07T13:10:32+5:302017-05-07T13:16:57+5:30
आयसीसी चॅम्पियन्स स्पर्धेत खेळण्याचा भारतीय संघाचा मार्ग मोकळा झाला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) चॅम्पियन्स ट्रॉफीत खेळण्यासाठी भारतीय संघाला हिरवा कंदील
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 7 - आयसीसी चॅम्पियन्स स्पर्धेत खेळण्याचा भारतीय संघाचा मार्ग मोकळा झाला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) चॅम्पियन्स ट्रॉफीत खेळण्यासाठी भारतीय संघाला हिरवा कंदील दिला आहे. आज रविवारी आयोजित विशेष आमसभेमध्ये हा निर्णय घेण्यात आला. येत्या दोन दिवसात संघ जाहीर करू, संघनिवडीसाठी निवड समितीची बैठक 8 मे रोजी होईल असं बीसीसीआयने स्पष्ट केलं.
आयसीसीच्या नव्या आर्थिक मॉडेलमध्ये महसुलीत मोठा वाटा मिळावा यासाठी दबावतंत्राचा वापर म्हणून जगातील सर्वांत श्रीमंत मानल्या जणाऱ्या बीसीसीआयने संघ पाठविण्याची २५ एप्रिलची ‘डेडलाइन’देखील पाळली नव्हती. आयसीसीने बीसीसीआयचा वाटा ५७ लाख डॉलरवरून कमी करून २९.३ लाख डॉलरवर आणला आहे.आमसभेपूर्वी शनिवारी सीओएने राज्य संघटनांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली होती. भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीतून माघार घेतल्यास संभाव्य गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशारा प्रशासकांच्या (सीओए) समितीने बीसीसीआयला दिला होता.
एक जूनपासून चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरूवात होणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघ निवड करण्यास हेतुपुरस्सर विलंब करीत असलेल्या बीसीसीआयची कानउघाडणी करीत प्रशासकांच्या समितीने (सीओए) लवकरात लवकर संघ निवड करण्याचे निर्देश दिले होते. सीओएने सर्व पदाधिकाऱ्यांना पाठविलेल्या ई-मेलमध्ये संघ निवड टाळल्यामुळे बीसीसीआयची प्रतिमा नकारात्मक होत असल्याचे सूचित केले. चॅम्पियन्स ट्रॉफीत भारताचे प्रतिनिधित्व करणारा संघ पाठविण्याची अखेरची तारीख २५ एप्रिल होती, पण संघाची अद्याप निवड झाली नाही, हे आपणा सर्वांना माहिती आहे. निवड समितीची त्वरित बैठक बोलवून संघ निवडा.भारतीय संघ जगात सर्वोत्कृष्ट आहे, हे लक्षात असू द्या. स्पर्धेतून माघार घेण्याआधी याचा विचार करा. बीसीसीआयची प्रतिमा नकारात्मक होऊ देण्याऐवजी टीम इंडियाच्या भल्यासाठी काम करा. खेळाडूंचे हित सर्वतोपरी असल्याचे भान ठेवा, असे सीओएने पत्रात म्हटले होते.