जिथून सुरुवात केली, तिथेच थांबवला खेळ; सानिया मिर्झाने दिला टेनिसला निरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2023 08:18 AM2023-03-06T08:18:02+5:302023-03-06T08:19:00+5:30
भारताची महान टेनिस खेळाडू सानिया मिर्झा हिने रविवारी एक खेळाडू म्हणून आपल्या शानदार कारकिर्दीचा समारोप केला आहे.
हैदराबाद : भारताची महान टेनिस खेळाडू सानिया मिर्झा हिने रविवारी एक खेळाडू म्हणून आपल्या शानदार कारकिर्दीचा समारोप केला आहे. जिथे सानियाने टेनिस खेळण्यास सुरुवात केली. तिथेच तिने तिच्या कारकिर्दीचा समारोप देखील केला. सानियाने लाल बहादूर टेनिस स्टेडिअममध्ये प्रदर्शनीय सामना खेळत दोन दशकांच्या कारकिर्दीला पूर्णविराम दिला आहे.
तिने जवळपास दोन दशकांपूर्वी पहिले ऐतिहासिक डब्लूटीए एकेरी विजेतेपद पटकावत मोठ्या मंचावर आगमन केले होते. या प्रदर्शनीय सामन्यात रोहन बोपन्ना आणि तिची जवळची मैत्रीण बेथानी मॅटेक सॅण्ड्स यांचा समावेश होता.
या सामन्यासाठी केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रिजीजू आणि भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन उपस्थित होते. सानिया निरोपाच्या भाषणाच्या वेळी चांगलीच भावुक झाली होती. तिने मिश्र दुहेरीचे दोन प्रदर्शनीय सामने खेळले आणि दोन्ही जिंकले. सानियाच्या चाहत्यांनी यावेळी प्लेकार्ड हाती घेतले होते.