जळगावात रंगणार कबड्डीचा थरार, राज्यातील महिला व पुरुषांचे ३२ संघ होणार सहभागी
By अमित महाबळ | Published: March 4, 2023 08:41 PM2023-03-04T20:41:22+5:302023-03-04T20:41:53+5:30
या स्पर्धेच्या आयोजन समितीची बैठक शनिवारी, क्रीडामंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली.
अमित महाबळ, जळगाव : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे व महाराष्ट्र कबड्डी असोसिएशन व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या आयोजनाचा मान जळगाव जिल्ह्याला मिळाला आहे. या स्पर्धा ११ ते १५ मार्चदरम्यान सागर पार्कवर होतील.
या स्पर्धांसाठी राज्यातील विविध जिल्ह्यांचे पुरुषांचे १६ व महिलांचे १६, असे एकूण ३२ संघ सहभागी होणार आहेत. या संघांमध्ये विविध राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांत खेळलेल्या खेळाडूंचा समावेश असणार आहे. सागर पार्कवर कबड्डीची चार मैदाने तयार करण्यात येणार आहेत. अंतिम विजेत्या संघाला १ लाख ५० हजार रुपयांचे, तर उपविजेत्या संघाला १ लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. याशिवाय सहभागी व इतर संघांनाही बक्षिसे देण्यात येणार आहेत. प्रेक्षकांसाठी गॅलरी उभारण्यात येणार आहे.
या स्पर्धेच्या आयोजन समितीची बैठक शनिवारी, क्रीडामंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. खासदार उन्मेष पाटील, आमदार किशोर पाटील, आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी अमन मित्तल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी पंकज आशिया, नाशिक विभागाच्या क्रीडा उपसंचालक सुनंदा पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित, श्याम कोगटा, नितीन बरडे, डॉ. प्रदीप तळवेलकर आदी उपस्थित होते. जळगाव शहर महानगरपालिका, जळगाव जिल्हा कबड्डी असोसिएशन, तसेच स्थानिक पदाधिकारी व लोकप्रतिनिधींचेही सहकार्य लाभणार आहे.