...तर पाकला खेळावी लागू शकते पात्रता फेरी
By admin | Published: September 6, 2016 01:55 AM2016-09-06T01:55:03+5:302016-09-06T01:55:03+5:30
इंग्लंडविरुद्धच्या पाच वन-डे सामन्यांच्या मालिकेत १-४ने पराभव स्वीकारावा लागल्यामुळे पाकिस्तानची आयसीसी वनडे क्रमवारीत नवव्या स्थानावर घसरण
दुबई : इंग्लंडविरुद्धच्या पाच वन-डे सामन्यांच्या मालिकेत १-४ने पराभव स्वीकारावा लागल्यामुळे पाकिस्तानची आयसीसी वनडे क्रमवारीत नवव्या स्थानावर घसरण झाली आहे. ते सध्या विंडीजपेक्षा ८ गुणांनी आणि एका स्थानांनी मागे असून अशीच परिस्थिती राहीली, तर २०१९च्या वर्ल्डकपसाठी पात्रता फेरी खेळावी लागू शकते.
मालिका प्रारंभ होण्यापूर्वी पाकच्या खात्यावर ८७ मानांकन गुणांची नोंद होती, आता त्यांच्या खात्यावर ८६ मानांकन गुणांची नोंद आहे. सध्या अस्तित्वात असलेली मानांकन पद्धत २००१मध्ये सुरू झाल्यापासून मानांकन गुणांचा विचार केला, तर पाकची ही सर्वांत निराशाजनक स्थिती आहे. पाकला आता विंडीज आणि आॅस्ट्रेलियाविरुद्ध वनडे सामन्यांची मालिका खेळायची असून, २०१९च्या वर्ल्डकप स्पर्धेसाठी थेट पात्रता मिळविण्यासाठी घाम गाळावा लागेल. आॅस्ट्रेलिया आणि इंग्लंड या संघांनी अनुक्रमे श्रीलंका व पाकिस्तानविरुद्ध ४-१ अशा समान फरकाने विजय मिळवून आयसीसी वनडे क्रमवारीत आपली स्थिती मजबूत केली आहे. पल्लेकलमध्ये श्रीलंकेविरुद्ध ५ गडी राखून विजय मिळविणाऱ्या आॅस्ट्रेलियाच्या खात्यावर आता १२४ मानांकन गुणांची नोंद आहे, तर दुसऱ्या स्थानावर असलेल्या न्यूझीलंडच्या तुलनेत आॅस्ट्रेलियाच्या खात्यावर ११ मानांकन गुण अधिक आहेत. श्रीलंकेने सहावे स्थान कायम राखले असले, तरी आता त्यांच्या खात्यावर १०१ मानांकन गुण आहेत.
श्रीलंकेला एका मानांकन गुणाचे नुकसान सोसावे लागल्यामुळे आता बांगलादेश आणि त्यांच्यात केवळ ३ मानांकन गुणांचे अंतर आहे. बांगलादेशाला आता अफगाणिस्तान व इंग्लंड संघांविरुद्ध प्रत्येकी ३ सामन्यांच्या मालिका खेळायच्या आहेत. अफगाणिस्तानविरुद्ध तिन्ही सामन्यांत विजय मिळविण्यात यश आले व इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत सरशी साधली, तर बांगलादेशाला मानांकनामध्ये कारकिर्दीतील सर्वोत्तम सहावे स्थान पटकावण्याची संधी आहे. (वृत्तसंस्था)