तर पंच क्रिकेटपटूंना पाठवणार मैदानाबाहेर
By admin | Published: May 25, 2017 06:28 PM2017-05-25T18:28:06+5:302017-05-25T18:52:47+5:30
खेळाडूने गैरवर्तन केल्यास त्याला पंच लाल किंवा पिवळे कार्ड दाखवून मैदानाबाहेर काढत असल्याचे तुम्ही फुटबॉल आणि हॉकीच्या सामन्यांदरम्यान पाहिले असेल. पण आता
Next
>ऑनलाइन लोकमत
दुबई, दि. 25 - खेळ चालू असताना खेळाडूने गैरवर्तन केल्यास त्याला पंच लाल किंवा पिवळे कार्ड दाखवून मैदानाबाहेर काढत असल्याचे तुम्ही फुटबॉल आणि हॉकीच्या सामन्यांदरम्यान पाहिले असेल. पण आता हे चित्र क्रिकेटच्या मैदानावरही दिसण्याची शक्यता आहे. अनिल कुंबळेच्या नेतृत्वाखालील आयसीसीच्या क्रिकेट कमिटीने गंभीर गैरवर्तन करणाऱ्या खेळाडूला मैदानाबाहेर काढण्याचा अधिकार पंचांना देण्याची, तसेच सर्व आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 सामन्यात डीआरएस अनिवार्य करण्याची शिफारस केली आहे.
आयसीसीच्या क्रिकेट समितीचा प्रमुख असलेल्या अनिल कुंबळेच्या नेतृत्वाखाली या समितीची आज बैठक झाली. यावेळी क्रिकेटला अधिक मनोरंजक बनवण्याच्या दृष्टीने या समितीने काही शिफारशी केल्या आहेत. त्यापैकी खेळ सुरू असताना गंभीर गैरवर्तन करणाऱ्या खेळाडूला मैदानाबाहेर पाठवण्याचा अधिकार पंचांना देण्याची शिफारस वैशिष्ट्यपूर्ण आहे. गेल्या काही काळात क्रिकेटच्या मैदानावर खेळाडूंकडून अरेरावी होण्याचे, प्रतिस्पर्धी खेळाडूंशी भिडण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. त्या पार्श्वभूमीवर पंचांना बेशिस्त खेळाडूंना मैदानाबाहेर पाठवण्याचा अधिकार मिळाल्यास बेशिस्त खेळाडूंना चाप लावणे शक्य होणार आहे.
त्याबरोबरच क्रिकेट समितीने सर्व आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 सामन्यांमध्ये डीआरएस अनिवार्य करण्याची शिफारस केली आहे. सध्या केवळ आयसीसीच्या स्पर्धांमध्येच डीआरएस अनिवार्य आहे. तसेच पायचीतबाबत दाद मागितल्यावर तिसऱ्या पंचांनी मैदानी पंचांचा निर्णय कायम ठेवल्यास डीआरएसची संधी कमी न करण्याची शिफारसही करण्यात आली आहे. आता आयसीसीच्या मुख्य कार्यकारी समितीने या शिफारशींना मंजुरी दिल्यास येत्या 1 ऑक्टोबरपासून हे नियम क्रिकेटच्या मैदानात लागू होतील.
याआधी क्रिकेट सामन्यातील बेशिस्त खेळाडूंना रेड कार्ड दाखवून मैदानाबाहेरचा रस्ता दाखवण्याच्या अधिकार पंचांना देण्यास एमसीसीने मंजुरी दिली होती. येत्या 1 ऑक्टोबर 2017पासून हा नियम लागू केला जाणार असल्याचे मेरिलबोन क्रिकेट क्लब (MCC)ने सांगितले होते.